GuruCharitra.in

Guru Charitra Adhyay 13 | गुरुचरित्र अध्याय 13

गुरुचरित्र अध्याय 13 में बताया गया है कि कैसे गुरु की दृष्टि से सभी रोगों से मुक्ति मिलती है। यह अध्याय हमें सिखाता है कि हमें गुरु के चरणों में समर्पण करना चाहिए और उनकी दृष्टि प्राप्त करने का प्रयास करना चाहिए। गुरु की दृष्टि से हम जीवन में सभी तरह के रोगों से मुक्ति प्राप्त कर सकते हैं और स्वस्थ रह सकते हैं।

श्रीगणेशाय नमः II श्रीसरस्वत्यै नमः II श्रीगुरुभ्यो नमः II

नामधारक शिष्यराणा I लागे सिद्धाचिया चरणां I

करसंपुट जोडूनि जाणा I विनवीतसे परियेसा II १ II

जय जया सिद्ध मुनी I तूं तारक या भवार्णीं I

सांगितलें ज्ञान प्रकाशोनि I स्थिर जाहलें मन माझें II २ II

गुरुचरित्रकथामृत I सेवितां तृष्णा अधिक होत I

शमन करणार समर्थ I तूंचि एक कृपानिधि II ३ II


गुरुचरित्र कामधेनु I सांगितलें तुम्हीं विस्तारोनु I

तृप्त नव्हे माझें मनु I आणखी अपेक्षा होतसे II ४ II


क्षुधेंकरूनि पीडिलें ढोर I जैसें पावे तृणबिढार I

त्यातें होय मनोहर I न वचे तेथोनि परतोनि II ५ II


एखादा न देखे तक्र स्वप्नीं I त्यासी मिळे क्षीरबरणी I

नोहे मन त्याचे धणी I केवीं सोडी तो ठाव II ६ II


तैसा आपण स्वल्पज्ञानी I नेणत होतों गुरु-निर्वाणी I

अविद्यामाया वेष्टोनि I कष्टत होतों स्वामिया II ७ II


अज्ञानतिमिररजनीसी I ज्योतिस्वरूप तूंचि होसी I

प्रकाश केलें गा आम्हांसी I निजस्वरूप श्रीगुरूचें II ८ II


तुवां केले उपकारासी I उत्तीर्ण काय होऊं सरसी I

कल्पवृक्ष दिल्हेयासी I प्रत्युपकार काय द्यावा II ९ II


एखादा देता चिंतामणी I त्यासी उकार काय धरणीं I

नाहीं दिधलें न ऐकों कानीं I कृपामूर्ति सिद्धराया II १० II


ऐशा तुझिया उपकारासी I उत्तीर्ण नोहे जन्मोजन्मेसीं I

म्हणोनि लागतसे चरणांसी I एकोभावेंकरोनियां II ११ II


स्वामींनीं निरोपिला धर्म-अर्थ I अधिक झाला मज स्वार्थ I

उपजला मनीं परमार्थ I गुरुसी भजावें निरंतर II १२ II


प्रयागी असतां गुरुमूर्ति I माधवसरस्वतीस दीक्षा देती I

पुढें काय वर्तली स्थिति I आम्हांप्रती विस्तारावें II १३ II


ऐकोनि शिष्याचें वचन I सिद्धमुनि संतोषोन I

मस्तकीं हस्त ठेवून I आश्वासिती तया वेळीं II १४ II


धन्य धन्य शिष्या सगुण I तुज लाधले श्रीगुरुचरण I

संसार तारक भवार्ण I तूंचि एक परियेसा II १५ II


तुवां ओळखिली श्रीगुरुची सोय I म्हणोनि पुससी भक्तिभावें I

संतोष होतो आनंदमय I तुझ्या प्रश्नेंकरूनियां II १६ II


सांगेन ऐक एकचित्तें I चरित्र गुरुचें विख्यातें I

उपदेश देऊनि माधवातें I होते क्वचीत्काळ तेथेंचि II १७ II


असतां तेथें वर्तमानीं I प्रख्यात झाली महिमा सगुणी I

शिष्य झाले अपार मुनि I मुख्य माधवसरस्वती II १८ II


तया शिष्यांची नामें सांगतां I विस्तार होईल बहु कथा I

प्रख्यात असतीं नामें सात I सांगेन ऐक एकचित्तें II १९ II


बाळसरस्वती कृष्णसरस्वती I उपेंद्र-माधवसरस्वती I

पांचवा असे आणीक यति I सदानंदसरस्वती देखा II २० II


ज्ञानज्योतिसरस्वती एक I सातवा सिद्ध आपण ऐक I

अपार होते शिष्य आणिक I एकाहूनि एक श्रेष्ठ पैं II २१ II


त्या शिष्यांसमवेत I श्रीगुरू निघाले दक्षिणपंथ I

समस्त क्षेत्रें पावन करित I आले पुन्हा कारंजनगरासी II २२ II


भेटी झाली जनकजननी I येवोनि लागताति चरणीं I

चतुर्वर्ग भ्राते भगिनी I समस्त भेटिती स्वामिया II २३ II


देखोनियां श्रीगुरुमूर्तीसी I नगरलोक अत्यंत हर्षी I

आले समस्त भेटीसी I पूजा करिती परोपरी II २४ II


घरोघरीं श्रीगुरूसी I पाचारिती भिक्षेसी I

जाहले रूपें बहुवसी I घरोघरीं पूजा घेती II २५ II


समस्त लोक विस्मय करिती I अवतार हा श्रीविष्णु निश्चितीं I

वेषधारी दिसतो यति I परमपुरुष होय जाणा II २६ II


यातें नर जे म्हणती I तें जाती नरकाप्रती I

कार्याकारण अवतार होती I ब्रह्माविष्णुमहेश्वर II २७ II


जननीजनक येणें रीतीं I पूजा करिती भावभक्तीं I

श्रीगुरू झाले श्रीपादयति I जातिस्मृति जननीसी II २८ II


देखोनी जननी तये वेळीं I माथा ठेवी चरणकमळीं I

सत्यसंकल्प चंद्रमौळी I प्रदोषपूजा आली फळा II २९ II


पतीस सांगे तया वेळीं I पूर्वजन्माचें चरित्र सकळीं I

विश्ववंद्द्य पुत्र प्रबळी I व्हावा म्हणोनि आराधिलें म्यां II ३० II


याचि श्रीपाद-ईश्वराचें I पूजन केलें मनोवाचें I

प्रसिद्ध झालें जन्म आमुचें I साफल्य केलें परियेसा II ३१ II


म्हणोनि नमिती दोघेजणीं I विनविताति कर जोडूनि I

उद्धारावें या भवार्णी I जगन्नाथा यतिराया II ३२ II


श्रीगुरू म्हणती तयांसी I एखादे काळी परियेसीं I

पुत्र होय संन्यासी I उद्धरील कुळें बेचाळीस II ३३ II


त्यासी शाश्वत ब्रह्मलोक I अचळ पद असे देख I

त्याचे कुळीं उपजतां आणिक I त्यासीही ब्रह्मपद परियेसा II ३४ II


यमाचे दुःखें भयाभीत I नोहे त्याचे पितृसंततींत I

पूर्वज जरी नरकीं असत I त्यांसी शाश्वत ब्रह्मपद II ३५ II


याकारणें आम्हीं देखा I घेतला आश्रम विशेखा I

तुम्हां नाही यमाची शंका I ब्रह्मपद असे सत्य II ३६ II


ऐसें सांगोनि तयांसी I आश्वासीतसे बहुवसी I

तुमचे पुत्र शतायुषी I अष्ट ऐश्वर्ये नांदती II ३७ II


त्यांचे पुत्रपौत्र तुम्ही I पहाल सुखें तुमचे नयनी I

पावाल क्षेम काशीभुवनी I अंतःकाळी परियेसा II ३८ II


मुक्तिस्थान काशीपुर I प्रख्यात असे वेदशास्त्र I

न करा मनी चिंता मात्र I म्हणोनि सांगती तये वेळी II ३९ II


त्यांची कन्या असे एक I नाम तिचें ‘रत्नाई ‘ विशेष I

श्रीगुरूसी नमूनि ऐक I विनवीतसे परियेसा II ४० II


विनवीतसे परोपरी I स्वामी मातें तारीं तारीं I

बुडोनि जात्यें भावसागरीं I संसारमाया वेष्टोनियां II ४१ II


संसार-तापत्रयासी I आपण भीतसें परियेसीं I

निर्लिप्त करी गा आम्हांसी I आपण तपासी जाईन II ४२ II


ऐकोनि तियेचें वचन I श्रीगुरू निरोपिताति आपण I

स्त्रियांसी पतिसेवाचरण I तेंचि तप परियेसा II ४३ II


येणें या भवार्णवासी I कडे पडती परियेसीं I

जैसा भाव असे ज्यासी I तैसें होईल परियेसा II ४४ II


उतरावया पैल पार I स्त्रियांसी असे तो भ्रतार I

मनें करोनि निर्धार I भजा पुरुष शिवसमानी II ४५ II


त्यासी होय उद्धार गति I वेदपुराणें वाखाणिती I

अंतःकरणीं न करी खंती I तूंतें गति होईल जाण II ४६ II


ऐकोनि श्रीगुरूचें वचन I विनवीतसे कर जोडून I

श्रीगुरुमूर्ति ब्रह्मज्ञान I विनवीतसें अवधारीं II ४७ II


तूं जाणसी भविष्यभूत I कैसें मातें उपदेशीत I

माझें प्रालब्ध कवणगत I विस्तारावें मजप्रति II ४८ II


श्रीगुरू म्हणती तियेसी I तुझी वासना असे तपासी I

संचित पाप असे तुजसी I भोगणें असे परियेसा II ४९ II


पूर्वजन्मीं तूं परियेसी I चरणीं लाथिलें धेनूसी I

शेजारी स्त्रीपुरुषांसी I विरोधें लाविला कलह जाणा II ५० II


तया दोषास्तव देखा I तूंतें बाधा असे अनेका I

गायत्रीसी लाथिलें ऐका I तूं सर्वांगीं कुष्टी होसील II ५१ II

विरोध केला स्त्रीपुरुषांसी I तुझा पुरुष होईल तापसी I

तूंतें त्यजील भरंवसीं I अर्जित तुझें ऐसें असे II ५२ II


ऐकोनि दुःख करी बहुत I श्रीगुरुचरणीं असे लोळत I

मज उद्धरावें गुरुनाथा त्वरित I म्हणोनि चरणीं लागली II ५३ II


श्रीगुरु म्हणती ऐक बाळे I क्वचित्काळ असाल भले I

अपरवयसा होतांचि काळें I पति तुझा यति होये II ५४ II


तदनंतर तुझा देह I कुष्टी होईल अवेव I

भोगूनि स्वदेही वय I मग होईल तुझ गति II ५५ II


नासतां तुझा देह जाण I भेटी होईल आमुचे चरण I

तुझें पाप होईल दहन I सांगेन क्षेत्र ऐक पां II ५६ II


भीमातीर दक्षिण देशीं I असे तीर्थ पापविनाशी I

तेथें जाय तूं भरंवसीं I अवस्था तुज घडलियावरी II ५७ II


या भूमंडळीं विख्यात I तीर्थ असे अति समर्थ I

गंधर्वपुर असे ख्यात I अमरजासंगम प्रसिद्ध जाण II ५८ II


ऐसें सांगोनि तियेसी I श्रीगुरु निघाले दक्षिण देशीं I

त्र्यंबक-क्षेत्रासी I आले, गौतमी-उद्भव जेथें II ५९ II


शिष्यांसहित गुरुमूर्ति I आले नासिकक्षेत्राप्रती I

तीर्थमहिमा असे ख्याति I पुराणांतरीं परियेसा II ६० II


तीर्थमहिमा सांगता I विस्तार होईल बहु कथा I

संक्षेपमार्गे तुज आतां I सांगतसें परियेसीं II ६१ II


त्या गौतमीची महिमा I सांगतां अपार असे आम्हां I

बहिरार्णव-उदक उगमा I ब्रह्मांडाव्यतिरिक्त II ६२ II


जटामुकुटीं तीर्थेश्वर I धरिली होती प्रीतिकर I

मिळोनी समस्त ऋषीश्वर I उपाय केला परियेसा II ६३ II


ब्रह्मऋषि गौतम देखा I तपस्वी असे विशेषा I

व्रीहि पेरिले वृत्तीं ऐका I अनुष्ठानस्थानाजवळी II ६४ II


पूर्वी मुनी सकळी I नित्य पेरूनि पिकविती साळी I

ऐसे त्यांचे मंत्र बळी I महापुण्यपुरुष असती II ६५ II


समस्त ऋषि मिळोनि I विचार करिती आपुले मनीं I

ऋषिगौतम महामुनी I सर्वेश्वराचा मुख्य दास II ६६ II


त्यासी घालितां सांकडें I गंगा आणील आपुलें चाडें I

समस्तां आम्हां पुण्य घडे I गंगास्नानें भूमंडळी II ६७ II


(श्लोक) या गतिर्योगयुक्तानां मुनीनामूर्ध्वरेतसाम् I

सा गतिः सर्व जंतूनां गौतमीतीरवासिनाम् II ६८ II


(टीका) ऊर्ध्वरेत मुनीश्वरांसी I कोटिवर्षे तपस्वियांसी I

जे गति होय परियेसीं I ते स्नानमात्रें गौतमीच्या II ६९ II


याकारणें गौतमीसी I आणावें यत्नें भूमंडळासी I

सांकडें घालितां गौतमासी I आणितां गंगा आम्हां लाभ II ७० II


म्हणोनि रचिली माव एक I दुर्वेची गाय सवत्सक I

करोनि पाठविली ऐक I गौतमाचे व्रीहिभक्षणासी II ७१ II


ऋषि होता अनुष्ठानीं I देखिलें धेनूसी नयनीं I

निवारावया त्तक्षणी I दर्भ पवित्र सोडिलें II ७२ II


तेचि कुश जाहलें शस्त्र I धेनूसी लागलें जैसे वज्रास्त्र I

पंचत्व पावली त्वरित I घडली हत्या गौतमासी II ७३ II


मिळोनी समस्त ऋषिजन I प्रायश्चित्त देती जाण I

गंगा भूमंडळीं आण I याविणें तुम्हां नाहीं शुद्धि II ७४ II


याकारणें गौतमऋषीं I तप केलें सहस्र वर्षी I

प्रसन्न झाला व्योमकेशी I वर माग म्हणितलें II ७५ II


गौतम म्हणे सर्वेश्वरा I तुवां देशील मज वरा I

उद्धरावया सचराचरा I द्यावी गंगा भूमंडळासी II ७६ II


गौतमाचे विंनतीसी I निरोप दिधला गंगेसी I

घेवोनि आला भूमंडळासी I पापक्षालनार्थ मनुष्यांचे II ७७ II


ऐसी गंगाभागीरथी I कवणा वर्णावया सामर्थ्य I

याचि कारणें श्रीगुरुनाथ I आले ऐक नामधारका II ७८ II


ऐसी गौतमीतटाकयात्रा I श्रीगुरू आपण आचरीत I

पुढें मागुती लोकानुग्रहार्थ I आपण हिंडे परियेसा II ७९ II


तटाकयात्रा करितां देख I आले श्रीगुरू मंजरिका I

तेथें होता मुनि एक I विख्यात ‘माधवारण्य’ II ८० II


सदा मानसपूजा त्यासी I नरसिंहमूर्ति परियेसीं I

देखता झाला श्रीगुरूसी I मानसमूर्ति जैसी देखे II ८१ II


विस्मित होऊनि मानसीं I नमिता झाला श्रीगुरूमूर्तीसी I

स्तोत्र करी बहुवसी I अतिभक्तीकरूनियां II ८२ II


(श्लोक) यद्दिव्यपादद्वयमेवसाक्षाद्, अधिष्ठितं देवनदीसमीपे I

य उत्तरे तीरनिवासिरामो, लक्ष्मीपतिस्त्वं निवसन्स नित्यम् II ८३ II


(ओंव्या) येणेंपरी श्रीगुरूसी I विनवी माधवारण्य हर्षी I

श्रीगुरू म्हणती संतोषीं I तया माधवारण्यासी II ८४ II


अत्यंतमार्गस्थितिमार्गरूपं अत्यंत योगादधिकारतत्त्वम् I

मार्गं च मार्गं च विचिन्वतो मे मार्गोदयं माधव दर्शय ते II ८५ II


(ओंव्या) ऐसें श्रीगुरु तयासी I आश्वासोनि म्हणती हर्षी I

निजस्वरूप तयासी I दाविते झाले परियेसा II ८६ II


श्रीगुरूचें स्वरूप देखोनि I संतोषी झाला तो मुनि I

विनवीतसे कर जोडूनि I नानापरी स्तुति करी II ८७ II


जय जया जगद्गुरू I त्रयमूर्तीचा अवतारू I

लोकां दिससी नरु I परमपुरुषा जगज्योति II ८८ II


तूं तारक विश्वासी I म्हणोनि भूमीं अवतरलासी I

कृतार्थ केलें आम्हांसी I दर्शन दिधलें चरण आपुले II ८९ II


ऐसेपरी श्रीगुरूसी I स्तुति करी तो तापसी I

संतोष होऊन अति हर्षी I आश्वासिती तया वेळीं II ९० II


म्हणती श्रीगुरू तयासी I सिद्धि झाली तुझ्या मंत्रासी I

तुज सद्गती भरंवसीं I ब्रह्मलोक प्राप्त होय II ९१ II


नित्यपूजा तूं मानसीं I करिसी नृसिंहमूर्तीसी I

प्रत्यक्ष होईल परियेसीं I न करीं संशय मनांत II ९२ II


ऐसें सांगोनि तयासी I श्रीगुरू निघाले परियेसीं I

आले वासरब्रह्मेश्वरासी I गंगातीर महाक्षेत्र II ९३ II


तया गंगातटाकांत I श्रीगुरू समस्त शिष्यांसहित I

स्नान करितां गंगेंत I आला तेथें विप्र एक II ९४ II


कुक्षिव्यथा असे बहुत I तटाकीं असे लोळत I

उदर व्यथा अत्यंत I त्यजूं पाहे प्राण देखा II ९५ II


पोटव्यथा बहु त्यासी I नित्य करी तो उपवासासी I

भोजन केलिया दुःख ऐसी I प्राणांतिक होतसे II ९६ II


याकारणें द्विजवर I सदा करी फलाहार I

अन्नासी त्यासी असे वैर I जेवितां प्राण त्यजूं पाहे II ९७ II


पक्षमासां भोजन करी I व्यथा उठे त्याचे उदरीं I

ऐसा किती दिवसवरी I कष्टत होता तो द्विज II ९८ II


पूर्व दिवसीं तया ग्रामीं I आला सण महानवमी I

जेविला मिष्टान्न मनोधर्मी I मासें एक पारणें केलें II ९९ II


भोजन केलें अन्न बहुत I त्याणें पोट असे दुखत I

गंगातीरीं असे लोळत I प्राण त्वरित त्यजूं पाहे II १०० II


दुःख करी द्विज अपार I म्हणे गंगेंत त्यजीन शरीर I

नको आतां संसार I पापरूपें वर्तत II १०१ II


अन्न प्राण अन्न जीवन I कवण असेल अन्नावीण I

अन्न वैरी झालें जाण I मरण बरवें आतां मज II १०२ II


मनीं निर्धार करोनि I गंगाप्रवेश करीन म्हणोनि I

पोटीं पाषाण बांधोनि I गंगेमध्यें निघाला II १०३ II


मनीं स्मरे कर्पूरगौर I उपजलों आपण भूमिभार I

केले नाहीं परोपकार I अन्नदानादिक देखा II १०४ II


न करीं पुण्य इह जन्मांत I जन्मांतरी पूर्वी शत I

पुण्यफळ नसे दिसत I मग हे कष्ट भोगीतसें II १०५ II


ग्रास हरितले ब्राह्मणाचे I किंवा धेनु-कपिलेचे I

घात केले विश्वासियाचे I मग हे भोग भोगीतसें II १०६ II


अपूर्ती पूजा ईश्वराची I केली असेल निंदा गुरूची I

अवज्ञा केली मातापितयांची I मग हे भोगीतसें II १०७ II


अथवा पूर्वजन्मीं आपण I केलें असेल द्विजधिक्कारण I

अतिथी आलिया न घालीं अन्न I वैश्वदेवसमयासी II १०८ II


अथवा मारिलें वोवरांसी I अग्नि घातला रानासी I

वेगळें सांडूनि जनक-जननींसी I स्त्रियेसहित मी होतों II १०९ II


मातापिता त्यजोनियां I असों सुखें जेवूनियां I

पूर्वार्जवापासोनियां I मग हे कष्ट भोगीतसें II ११० II


ऐसीं पापें आठवीत I विप्र जातो गंगेंत I

तंव देखिलें श्रीगुरूनाथें I म्हणती बोलावा ब्राह्मणासी II १११ II


आणा आणा त्या ब्राह्मणासी I प्राण त्यजितो कां सुखेसीं I

आत्महत्या महादोषी I पुसों कवण कवणाचा II ११२ II


श्रीगुरूवचन ऐकोनि I गेले शिष्य धांवोनि I

द्विजवरातें काढोनि I आणिलें श्रीगुरूसन्मुख II ११३ II


अनाथासी कल्पतरू I दुःखिष्टासी कृपासागरू I

पुसतसे श्रीगुरू I तया दुःखिष्ट विप्रासी II ११४ II


श्रीगुरू म्हणती तयासी I प्राण कां गा त्यजूं पाहसी I

आत्महत्या महादोषी I काय वृतांत सांग आम्हां II ११५ II


विप्र म्हणे गा यतिराया I काय कराल पुसोनियां I

उपजोनि जन्म वायां I भूमिभार जाहलों असें II ११६ II


मास-पक्षां भोजन करितों I उदरव्यथेनें कष्टतों I

साहूं न शकें प्राण देतों I काय सांगू स्वामिया II ११७ II

आपणासी अन्न वैरी असतां I केवीं वांचावें गुरुनाथा I

शरीर सर्व अन्नगता I केवीं वांचूं जगद्गुरू II ११८ II


श्रीगुरू म्हणती ब्राह्मणासी I तुझी व्यथा गेली परियेसीं I

औषध असे आम्हांपासीं I क्षण एकें सांगों तुज II ११९ II


संशय न धरीं आतां मनीं I भिऊ नको अंतःकरणीं I

व्याधि गेली पळोनि I भोजन करीं धणीवरी II १२० II


श्रीगुरूवचन ऐकोनि I स्थिर झाला अंतःकरणीं I

माथा ठेवूनि श्रीगुरूचरणीं I नमन केलें तया वेळीं II १२१ II


इतुकिया अवसरीं I तया ग्रामींचा अधिकारी I

विप्र एक अवधारीं I आला गंगास्नानासी II १२२ II


तंव देखिलें श्रीगुरूसी I येऊनि लागला चरणांसी I

नमन केलें भक्तीसीं I मनोवाक्कायकर्मे II १२३ II


आश्वासोनि तये वेळीं I पुसती श्रीगुरू स्तोममौळी I

कवण नाम कवण स्थळीं I वास म्हणती तयासी II १२४ II


ऐकोनि श्रीगुरूचें वचन I सांगतसे तो ब्राह्मण I

गोत्र आपलें कौडिण्य I आपस्तंब शाखेसीं II १२५ II


नाम मज ‘सायंदेव’ असे I वास-स्थळ आपलें ‘कडगंची’स I

आलों असे उदरपूर्तीस I सेवा करितों यवनांची II १२६ II


अधिकारपणें या ग्रामीं I वसों संवत्सर ऐका स्वामी I

धन्य धन्य झालों आम्ही I तुमचे दर्शनमात्रेसीं II १२७ II


तूं तारक विश्वासी I दर्शन दिधलें आम्हांसी I

कृतार्थ झालों भरंवसी I जन्मांतरीचे दोष गेले II १२८ II


तुझा अनुग्रह होय ज्यासी I तरेल या भवार्णवासी I

अप्रयत्नें आम्हांसी I दर्शन दिधलें स्वामिया II १२९ II


( श्लोक ) गंगा पापं शशी तापं दैन्यं कल्पतरूस्तथा I

पापं तापं च दैन्यं च हरेत्श्रीगुरुदर्शनम् II १३० II


( टीका ) गंगा देखितांचि पापें जाती I चंद्रदर्शनें ताप नासती I

कल्पतरूची ऐसी गति I दैन्यावेगळा करी जाण II १३१ II


तैसे नव्हती तुमचे दर्शनगुण I पाप-ताप-दैन्यहरण I

देखिले आजि तुमचे चरण I चतुर्वर्गफल पावलों II १३२ II


ऐशी स्तुति करूनि I पुनरपि लागला श्रीगुरूचरणीं I

जगद्गुरू आश्वासोनि I निरोप देती तया वेळीं II १३३ II


श्रीगुरु म्हणती तयासी I आमुचें वाक्य परियेसीं I

जठरव्यथा ब्राह्मणासी I प्राणत्याग करीतसे II १३४ II


उपशमन याचे व्याधीसी I सांगो औषध तुम्हांसी I

नेवोनि आपुले मंदिरासी I भोजन करवीं मिष्टान्न II १३५ II


अन्न जेवितां याची व्यथा I व्याधि न राहें सर्वथा I

घेऊनि जावें आतां त्वरिता I क्षुधाक्रांत विप्र असे II १३६ II


ऐकोनि श्रीगुरुंचे वचन I विनवीतसे कर जोडून I

प्राणत्याग करितां भोजन I या ब्राह्मणासी होतसे II १३७ II


जेविला काल मासें एका I त्याणें प्राण जातो ऐका I

अन्न देतां आम्हांसी देखा I ब्रह्महत्या त्वरित घडेल II १३८ II


श्रीगुरू म्हणती सायंदेवासी I आम्ही औषधी देतों यासी I

अपूपान्न-माषेसीं I क्षीरमिश्रित परमान्न II १३९ II


अन्न जेवितां त्वरितेसीं I व्याधि जाईल परियेसीं I

संशय न धरीं तूं मानसीं I त्वरित न्यावें गृहासी II १४० II


अंगीकारोनि तया वेळीं I माथा ठेवी चरणकमळीं I

विनवीतसे करुणाबहाळी I यावें स्वामी भिक्षेसी II १४१ II


अंगीकारोनि श्रीगुरुनाथ I निरोप देती हो कां त्वरित I

सिद्ध म्हणे ऐक मात I नामधारक शिष्योत्तमा II १४२ II


आम्ही होतों तये वेळीं I समवेत शिष्य सकळीं I

जठरव्यथेचा विप्र जवळी I श्रीगुरू गेले भिक्षेसी II १४३ II


विचित्र झालें त्याचे घरी I पूजा केली परोपरी I

पतिव्रता त्याची नारी I ‘जाखाई ‘ म्हणिजे परियेसा II १४४ II


पूजा करिती श्रीगुरूसी I षोडशोपचारे परियेसीं I

तेणेचि रीती आम्हांसी I शिष्यां सकळिकां वंदिलें II १४५ II


श्रीगुरूपूजा-विधान I विचित्र केलें अतिगहन I

मंडळ केलें रक्तवर्ण I एकेकासी पृथक्-पृथक् II १४६ II


पद्म रचूनि अष्टदळी I नानापरींचे रंगमाळी I

पंचवर्ण चित्रमाळी I रचिली तियें परियेसा II १४७ II


चित्रासन श्रीगुरूसी I तेणेंचिपरी सकळिकांसी I

मंडळार्चन विधीसी I करिती पुष्पगंधाक्षता II १४८ II


संकल्पोनि विधीसीं I नमन केलें अष्टांगेसीं I

माथा ठेवूनि चरणीं न्यासी I पाद सर्वही अष्टांगी II १४९ II


षोडशोपचार विधीसीं I पंचामृतादि परियेसीं I

रुद्रसूक्तमंत्रेसीं I चरण स्नापिले तये वेळीं II १५० II


श्रीगुरुचरणीं अतिहर्षी I पूजा करीत षोडशी I

तया विप्रा ज्ञान कैसी I चरणतीर्थ धरिता झाला II १५१ II


तया चरणतीर्थासी I पूजा करीत भक्तीसी I

गीतवाद्यें आनंदेसीं I करी आरती नीरांजन II १५२ II


अनुक्रमें श्रीगुरुपूजा I करिता झाला विधिवोजा I

पुनरपि षोडशोपचारें पूजा I करीतसे भक्तीनें II १५३ II


अक्षय वाणें आरती I श्रीगुरूसी ओंवाळिती I

मंत्रघोष अतिभक्तीं I पुष्पांजळी करिता झाला II १५४ II


अनेकपरी गायन करी I नमन करी प्रीतिकरीं I

पतिव्रता असे नारी I पूजा करिती उभयवर्ग II १५५ II


ऐसेपरी श्रीगुरूसी I पूजा केली परियेसीं I

तेणेंची विधीं शिष्यांसी I आम्हां समस्तांसी वंदिलें II १५६ II


संतोषोनि श्रीगुरूमूर्ति I वर देती अतिप्रीती I

तुझी संतती होईल ख्याति I गुरुभक्ति वंशोवंशी II १५७ II


तूं जाणसी गुरुचा वास I अभिवृद्धि होय वंशोवंश I

पुत्रपौत्री नांदाल हर्षी I गुरुभक्ति येणेंपरी II १५८ II


ऐसें बोलोनि द्विजासी I आशीर्वचन देती अतिहर्षी I

नमन करूनि श्रीगुरूसी I ठाय घातले तये वेळीं II १५९ II


नानापरींचे पक्कान्न I अपूपादी माषांन्न I

अष्टविध परमान्न I शर्करासहित निवेदिलें II १६० II


शाक पाक नानापरी I वाढताति सविस्तारीं I

भोजन करिती प्रीतीकरीं I श्रीगुरुमूर्ति परियेसा II १६१ II


जठरव्यथेच्या ब्राह्मणें I भोजन केलें परिपूर्ण I

व्याधि गेली तत्क्षण I श्रीगुरुचे कृपादृष्टीनें II १६२ II


परीस लागतां लोहासी I सुवर्ण होय परियेसीं I

दर्शन होतां श्रीगुरूसी I व्याधि कैंची सांग मज II १६३ II


उदय जाहलिया दिनकरासी I संहार होतो अंधकारासी I

श्रीगुरुकृपा होय ज्यासी I दैन्य कैंचे तया घरीं II १६४ II


ऐसेपरी श्रीगुरुनाथें I भोजन केलें शिष्यासहित I

आनंद झाला तेथें बहुत I विस्मय करिती सकळई जन II १६५ II


अभिनव करिती सकळ जन I द्विजासी वैरी होते अन्न I

औषध झालें तेंची अन्न I व्याधि गेली म्हणताति II १६६ II


सिद्ध म्हणे नामधारकास I श्रीगुरुकृपा होय ज्यास I

जन्मांतरीचे जाती दोष I व्याधि कैंची त्याचे देहीं II १६७ II


गंगाधराचा नंदन I सरस्वती सांगें विस्तारोनि I

गुरुचरित्र कामधेनु I ऐका श्रोते एकचित्तें II १६८ II


जे ऐकती भक्तीनें I व्याधि नसती त्यांचे भुवना I

अखिल सौख्य पावती जाणा I सत्यं सत्यं पुनः सत्यम् II १६९ II

II इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ

श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे

श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु II श्रीगुरुदेवदत्त II

इस अध्याय में, हम देखते हैं कि कैसे एक बीमार व्यक्ति को गुरु की दृष्टि से सभी रोगों से मुक्ति मिलती है। वह व्यक्ति बहुत बीमार था और वह अपने रोग से बहुत दुःखी था। एक दिन, वह व्यक्ति गुरु से मिला और उनसे मदद मांगी। गुरु ने उस व्यक्ति को बताया कि वह उसे सभी रोगों से मुक्ति दिला देंगे। गुरु ने उस व्यक्ति को अपने चरणों में समर्पण करने और अपनी दृष्टि प्राप्त करने का प्रयास करने की सलाह दी। उस व्यक्ति ने गुरु की आज्ञा का पालन किया और गुरु की दृष्टि प्राप्त की। गुरु की दृष्टि से उस व्यक्ति के सभी रोग नष्ट हो गए और वह स्वस्थ हो गया।

श्री गुरु चरित्र के सभी अध्याय