GuruCharitra.in

Guru Charitra Adhyay 31 | गुरुचरित्र अध्याय इकतीस

गुरुचरित्र अध्याय 31 में गुरु की महिमा और पतिव्रता धर्म के बारे में बताया गया है। यह अध्याय हमें सिखाता है कि गुरु ही सर्वोच्च हैं और हमें उनकी पूजा और सेवा करनी चाहिए। साथ ही, यह अध्याय हमें एक आदर्श पतिव्रता के गुणों के बारे में भी बताता है। इस अध्याय में, हम देखते हैं कि कैसे गुरु की कृपा से एक पतिव्रता स्त्री अपने पति के जीवन को बचा लेती है। स्त्री का पति बहुत सारी बुरी आदतों में फंस गया था और वह अपनी पत्नी के साथ अच्छा व्यवहार नहीं करता था। स्त्री ने अपने पति के सुधार के लिए बहुत प्रयास किए, लेकिन वह सफल नहीं हो पाई। एक दिन, स्त्री गुरु से मिली और उनसे मदद मांगी। गुरु ने स्त्री को बताया कि वह अपने पति के जीवन को बचाने के लिए एक कठिन व्रत करें। स्त्री ने गुरु की आज्ञा का पालन किया और कठिन व्रत किया। व्रत के प्रभाव से स्त्री के पति का जीवन बच गया और वह अपने बुरे कर्मों से छुटकारा पाकर एक अच्छा इंसान बन गया।

श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः ।

सिद्ध म्हणे नामधारका । पुढें अपूर्व झालें ऐका ।

योगेश्र्वर तो कारणिका । सांगे स्त्रियांचे धर्म-कर्म ॥ १

योगेश्र्वर म्हणती तियेसी । स्त्रियांचे आचार मज पुससी ।

सांगेन तुज विस्तारेसी । भवसागर तरावया ॥ २ ॥


पति असतां कवण धर्म । अथवा मेलिया कवण कर्म ।

उभयपक्षीं विस्तारुन । सांगेन ऐक एकचित्तें ॥ ३ ॥


तुज मानेल जें बरवें । तेंचि तुवां अंगीकारावें ।

स्त्रियांची रहाटी मी स्वभावें । सांगेन ऐक एकचित्तें ॥ ४ ॥


कथा स्कंदपुराणांत । काशीखंडीं विस्तारत ।

स्त्रियांचे धर्म असती बहुत । एकचित्तें ऐकावे ॥ ५ ॥


अगस्त्य ऋषि महामुनि । जो कां होता काशीभुवनीं ।

लोपामुद्रा महाज्ञानी । त्याची भार्या परियेसा ॥ ६ ॥


पतिव्रताशिरोमणि । दुसरी नव्हती आणिक कोणी ।

वसतां तेथें वर्तमानीं । झालें अपूर्व परियेसा ॥ ७ ॥


तया अगस्त्याचा शिष्य । विंध्य नाम असे प्रख्यात ।

पर्वतरुपें वर्तत । होता भूमीवरी देखा ॥ ८ ॥


विंध्याचळ म्हणिजे गिरि । अपूर्व वन नानापरी ।

शोभायमान महाशिखरीं । बहु रम्य परियेसा ॥ ९ ॥


ब्रह्मऋषि नारदमुनि । हिंडत गेला तया स्थानीं ।

संतोषी जाहला पाहूनि । स्तुति केली तया वेळीं ॥ १० ॥


म्हणे नारद विंध्यासी । आणिक पर्वत नाहीं तुजसरसी ।

समस्त वृक्ष तुजपाशी । महारम्य स्थळ तुझें ॥ ११ ॥


परी असे एक उणें । मेरुसरसी नोहे जाणे ।

स्थळ सूक्ष्म तूं याकारणें । महत्व नाहीं परियेसा ॥ १२ ॥


ऐसें म्हणतां नारदमुनि । विंध्याचळ कोपोनि ।

वाढता जाहला तत्क्षणीं । मेरुसरिसा होऊं म्हणे ॥ १३ ॥


वाढे विंध्याचळ देखा । सूर्यमंडळासन्मुखा ।

क्रमांतरें वाढतां ऐका । गेला स्वर्गभुवनासी ॥ १४ ॥


विंध्या-दक्षिणभागेसी । अंधकार अहर्निशी ।

सूर्यरश्मी न दिसे कैसी । यज्ञादि कर्में रहिलीं ॥ १५ ॥


ऋषि समस्त मिळोनि । विनवूं आले इंद्रभुवनीं ।

विंध्य-पर्वताची करणी । सांगताति विस्तारें ॥ १६ ॥


इंद्र कोपोनि तये वेळीं । गेला तया ब्रह्मयाजवळी ।

सांगे वृतांत सकळी । तया विंध्य-पर्वताचा ॥ १७ ॥


ब्रह्मा म्हणे इंद्रासी । आहे कारण आम्हांसी ।

अगस्त्य असे पुरीं-काशी । तया दक्षिण दिशे पाठवावें ॥ १८ ॥


दक्षिण दिशा भूमीसी । आधार नाहीं परियेसीं ।

याकारणें अगस्त्यासी । दक्षिण दिशे पाठवावे ॥ १९ ॥


अगस्तीचा शिष्य देखा । विंध्याचळ आहे जो का ।

गुरु येतांचि सन्मुखा । नमितां होय शरणागत ॥ २० ॥


अगस्त्य सांगेल शिष्यासी । वाढों नको म्हणोनि त्यासी ।

नमन करितां शिखरेसीं । भूमीसमान करील देखा ॥ २१ ॥


याकारणें तुम्ही आतां । जावें काशीपुरा त्वरितां ।

अगस्त्यऋषीसी विनवितां । पाठवावें दक्षिणेसी ॥ २२ ॥


येणेंपरी इंद्रासी । सांगे ब्रह्मदेव हर्षी ।

निरोप घेऊनि वेगेसीं । निघता झाला अमरनाथ ॥ २३ ॥


देवांसहित इंद्र देखा । सवें बृहस्पति ऐका ।

ऋषि मिळोनि समस्तिका । त्वरित आलें काशीभुवनासी ॥ २४ ॥


अगस्त्याचे आश्रमासी । पातले इंद्र समस्त ऋषि ।

देवगुरु महाहर्षी । बृहस्पति सवें असे ॥ २५ ॥


देखोनियां अगस्त्य मुनि । समस्तांते वंदोनि ।

अर्घपाद्य देऊनि । पूजा केली भक्तीनें ॥ २६ ॥


देव आणि बृहस्पति । अगस्त्याची स्तुति करिती ।

आणिक सवेंचि वानिती । लोपामुद्रा पतिव्रतेतें ॥ २७ ॥


देवगुरु ब्रहस्पति । सांगे पतिव्रताख्याति ।

पूर्वी पतिव्रता होती । लोपामुद्रासरी नाही ॥ २८ ॥


अरुंधती सावित्री । अनसूया जाणा महाव्रती ।

शांडिल्याची पत्नी होती । पतिव्रता विख्यात ॥ २९ ॥


लक्ष्मी आणि पार्वती । शतरुपा स्वयंभूसती ।

मेनका जाण अतिख्याति । हिमवंताची प्राणेश्र्वरी ॥ ३० ॥


सुनीता जाण ध्रुवाची माता । संज्ञादेवी सूर्यकांता ।

स्वाहादेवी होती ख्याता । यज्ञपुरुषाची प्राणेश्र्वरी ॥ ३१ ॥


यांहूनि अधिक आचार ख्याता । लोपामुद्रा पतिव्रता ।

ऐका देव समस्त म्हणतां । बृहस्पति सांगतसे ॥ ३२ ॥


पतिव्रतेचें आचरण । सांगे गुरु विस्तारुन ।

पुरुष जेवितां प्रसाद जाण । मुख्य भोजन स्त्रियेसी ॥ ३३ ॥


आणिक सेवा असे करणें । उभा पुरुष तैं उभी असणें ।

आज्ञेविणें न बैसणें । अवज्ञा न करी पतीची ॥ ३४ ॥


दिवस अखंड सेवा करणें । अतिथि येतां पूजा करणें ।

पतिनिरोपावीण जाण । दानधर्म न करावा ॥ ३५ ॥


पतीची सेवा निरंतरीं । मनीं भाविजे हाचि हरि ।

शयनकाळीं सर्व रात्रीं । सेवा करावी भक्तीनें ॥ ३६ ॥


पति निद्रिस्त जाहलियावरी । अपण मग शु्यन कीजे नारी ।

चोळी तानवडे ठेवी दूरी । पुरुषशरीरीं न स्पर्शावें ॥ ३७ ॥


स्पर्शे चोळी पुरुषासी । होय उणा तो आयुषीं ।

घेऊं नये नाम त्यासी । पति-आयुष्य उणें होय ॥ ३८ ॥


जागृत न होतां पति देखा । पूर्वी उठिजे सती ऐका ।

करणें सडा-संमार्जनादिका । करणें निर्मळ मंगलप्रद ॥ ३९ ॥

पतिपूजा करणें नित्य । सदा घ्यावें पादतीर्थ ।

चरणावरी ठेवूनि माथा । म्हणावें तूंचि शंकर ॥ ४० ॥


असतां ग्रामीं गृहीं पुरुष । सर्व श्रृंगार करणें हर्ष ।

अथवा जातां ग्रामा पुरुष । श्रृंगार करुं नये ॥ ४१ ॥


पति निष्ठुर बोले जरी । आपण मनीं कोप न करी ।

क्षमा म्हणोनि चरण धरी । राग न धरिजे मनांत ॥ ४२ ॥


पति येतां बाहेरुनि । सामोरी जाय तत्क्षणीं ।

सहस्र नामें त्यजूनि । सन्मुख जावें पतिव्रतें ॥ ४३ ॥


काय निरोप म्हणोनि । पुसावें पतीसी वंदोनि ।

जें जें वसे पतीचे मनीं । तयापरी रहाटावें ॥ ४४ ॥


पतिव्रतेचे लक्षण । सांगेन ऐका देवगण ।

बहिर्द्वारा जातां क्षण । अनेक दोष परियेसा ॥ ४५ ॥


बहिर्द्वारा जाणें जरी । पाहूं नये नर नारी ।

सवेंचि परतावें ते नारी । आपुले घरीं असावें ॥ ४६ ॥


जरी का पाहे परद्वारीं । उलूकयोनि जन्मे नारी ।

याच कारणें व्रत थोरी । लोपामुद्रा पतिव्रतेचें ॥ ४७ ॥


लोपामुद्रा पतिव्रता । बहिर्द्वारा न वचे सर्वथा ।

प्रातःकाळ जों का होतां । सडासंमार्जन करीतसे ॥ ४८ ॥


देवउपकरणीं उजळोनि । गंधाक्षतादि करुनि ।

पुष्पवर्ती, पंचवर्णी- । रंगमालिका देवांसी ॥ ४९ ॥


अनुष्ठानाहूनि पति येतां । सकळ आयती करी त्वरिता ।

धरोनियां पतीचे चित्तवृत्ता । पतिव्रता रहाटतसे ॥ ५० ॥


पति असतां उच्छिष्ट त्याचें । भोजन करावें मनोवाचें ।

नसतील गांवी पुरुष साचे । अतिथिधुप्रसाद घ्यावा ॥ ५१ ॥


अतिथीसी देऊनियां अन्न । अथवा धेनूसी पूजोन ।

भोजन करावें सगुण । पतिव्रता परियेसा ॥ ५२ ॥


गृह निरंतर निर्मळ करी । निरोपावेगळे धर्म न करी ।

व्रतें उपवास येणेंपरी । निरोपावेगळें न करी जाण ॥ ५३ ॥


उत्साह होतां नगरांत । कधीं पहावें न म्हणत ।

तीर्थयात्रा विवाहार्थ । कधीं न वचे परियेसा ॥ ५४ ॥


पुरुष संतोष असतां जरी । दुश्र्चित्त नसावें त्या नारीं ।

पुरुष दुक्ष्चित्त असे तरी । आपण संतोषी नसावें ॥ ५५ ॥


रजस्वला झालिया देखा । बोलूं नये, मौन्य निका ।

न ऐकावी वेदध्वनि देखा । मुख्य मुख्य दाखवूं नये ॥ ५६ ॥


ऐसें चारी दिवसवरी । आचरावें तिणें नारीं ।

सुस्नात होतां अवसरीं । पुरुषमुख अवलोकिजे ॥ ५७ ॥


जरी का नसेल पुरुष भुवनीं । त्याचें रुप ध्यावें मनीं ।

सूर्यमंडल पाहूनि । गृहांत जावें पतिव्रतें ॥ ५८ ॥


पतिआयुष्यवर्धनार्थ । हळदीकुंकुम लाविजे ख्यात ।

सेंदूर काजळ कंठसूत्र । फणी माथां असावी ॥ ५९ ॥


तांबूल घ्यावें सुवासिनीं । असावी तिचे माथां वेणी ।

करी कंकण, तोड कानीं । पुरुषांसमीप येणेंपरी ॥ ६० ॥


न करिजे इष्टती शेजारणीशीं । रजकिणी स्त्री कुहकीसी ।

जैनस्त्री दरिद्रिणीसी । इष्टत्व करितां हानि होय ॥ ६१ ॥


पुरुषनिंदाकरी स्त्रियांशी । बोलो नये पतिव्रता ऐसी ।

बोलतां घडती दोषी । पतिव्रता लक्षण ॥ ६२ ॥


सासू श्र्वशुर नणंदा वहिनी । दीर-भावे त्यजूनि ।

राहूं म्हणे वेगळेनि । श्र्वानयोनि पावे सत्य ॥ ६३ ॥


अंग धुवावें नग्नविणें; । उखळामुसळावरी न बैसणें ।

पाटा वरवंट्यावरी जाण । बैसूं नये पतिव्रता ॥ ६४ ॥


जातेंउंबर्‍यावरी देखा । बैसों नये वडिलाभिमुखा ।

पतिव्रतालक्षण निका । येणेंपरी असावें ॥ ६५ ॥


पतीसवें विवाद देखा । करितां पावे महा दुःखा ।

पतिअंतःकरणीं असे एका । आपण एक करुं नये ॥ ६६ ॥


जरी असेल अभाग्य पुरुष । अथवा दुष्ट नपुंसक ।

असे व्याधिष्ट पुरुष ऐक । देवासमान मानावा ॥ ६७ ॥


तैसा पुरुष असेल जरी । तेचि मानावा श्रीहरि ।

त्याचे बोलें रहाटे जरी । परमेश्र्वरा प्रिय होय ॥ ६८ ॥


पतीचे मनी जे आवडी । तेचि घ्यावी लेणीं-लुगडीं ।

पति दुश्र्चित्त असतां घडीं । आपण श्रृंगार करुं नये ॥ ६९ ॥


सोपस्कार पाहिजे जरी । न सांगावें आपण नारीं ।

असती पुत्र कन्या जरी । तयांमुखीं सांगवावें ॥ ७० ॥


जरी नसेल जवळी कोण । दाखवावी वस्तूची खूण ।

अमुक पाहिजे म्हणोनि । निर्धारुनि न सांगावें ॥ ७१ ॥


जितुकें मिळेल पतीसीं । संतुष्ट करावें मनासी ।

समर्था पाहूनि कांक्षेसी । पतिनिंदा करुं नये ॥ ७२ ॥


तीर्थयात्रेसी जाती लोक । म्हणोनि न जावें कवतुकें ।

पुरुषाचें पादोदक । तेंचि तीर्थ म्हणावें ॥ ७३ ॥


भागीरथीसमान देखा । पतीचें चरणतीर्थ अधिका ।

पतिसेवा करणें सुखा । त्रयमूर्ति संतुष्ट होती ॥ ७४ ॥


व्रत करणें असेल मनीं । करावें पुरुषा पुसोनि ।

आत्मबुद्धीं जरी करिती कोणी । पति-आयुष्य उणें होय ॥ ७५ ॥


आणिक जाय नरकाप्रति । पति घेऊनि सांगातीं ।

ऐसें बोले वेदश्रुति । बृहस्पति सांगतसे ॥ ७६ ॥


पतीसी क्रोधें उत्तर देती । श्र्वानयोनीं जन्म होती ।

जंबुक होऊनि भुंकती । ग्रामाजवळी येऊनियां ॥ ७७ ॥


नित्य नेम करणें नारी । पुरुषोच्छिष्ट भोजन करी ।

पाद प्रक्षाळूनि तीर्थ धरी । तीर्थ घेऊनि मग जेवावें ॥ ७८ ॥


त्यांसी प्रत्यक्ष शंकर । काम्य होतील मनोहर ।

पावतील वैकुंठपुर । पतीसहित परियेसा ॥ ७९ ॥


जाऊं नये वनभोजनासी । अथवा शेजारिया गृहासी ।

इष्टसोयरे म्हणोनि हर्षीं । जाऊं नये प्रतिदिनीं ॥ ८० ॥


आपुले पुरुष दुर्बळ असती । समर्थाची न करावी स्तुति ।

पति असेल अनाचारवृत्तीं । आपण निंदा करुं नये ॥ ८१ ॥


कैसा तरी असो पति । आपण करावी त्याची स्तुति ।

तोचि म्हणावा लक्ष्मीपति । एकोभावेंकरुनियां ॥ ८२ ॥


सासूश्र्वशुर पुरुषांपुढें । नेटें बोलों नये गाढें ।

हांसो नये तयांपुढें । पतिआयुष्य उणें होय ॥ ८३ ॥


सासूश्र्वशुरां त्यजोन । वेगळी असेन म्हणे कवण ।

उलूकयोनीं जन्मोन । अरण्यांत भुंजीतसे ॥ ८४ ॥


पुरुष कोपें मारी जरी । मरो म्हणे मनीं नारी ।

जन्म पावेचि योनि-व्याघ्रीं । महारण्यघोरी वसे ॥ ८५ ॥


परपुरुषांते नयनीं पाहे । उपजतांचि डोळे वरुते होय ।

पुरुषा वंचूनि विशेष खाय । ग्रामसूकर होय जाण ॥ ८६ ॥


तोहि जन्म सोडूनि । उपजे वाघुळी होऊनि ।

आपुली विष्ठा भक्षूनि । वृक्षावरी लोंबतसे ॥ ८७ ॥


पतीसन्मुख निष्ठुरोनि । उत्तर देतां कोपोनि ।

ऊपजे मुकी होऊनि । सप्तजन्म दरिद्रपण ॥ ८८ ॥


पुरुष दुसरी पत्नी करी । तीसवें आपण वैर धरी ।

उपजे सप्तजन्मांवरी । दुर्भाग्य होय अवधारा ॥ ८९ ॥


परपुरुषावरी दृष्टि करी । उपजे ते अंगहीन नारी ।

जन्म पावे पतिताघरीं । दरिद्री होऊनि परियेसा ॥ ९० ॥


पुरुष येतां बाहेरुनी । सामोरें जावें ते भामिनीं ।

उदकें पाद प्रक्षाळुनी । विंझणा करिजे श्रमहर ॥ ९१ ॥


पादसेवन भक्तीसीं । मृदु वाक्य बोलिजे पतीसी ।

पुरुष होतां संतोषी । त्रिमूर्ति संतोषती ॥ ९२ ॥


काय देतील माता पिता । नेदी इष्टवर्गबंधु भ्राता ।

इहपराची जोडी देता । पुरुष आपुला देव जाणा ॥ ९३ ॥


गुरु धर्म देव तीर्थ समस्ती । सर्व जाणावा आपुला पति ।

ऐसी जे निश्र्चये सती । पतिव्रता तेचि जाणा ॥ ९४ ॥


जीव असतां शरीरासी । पवित्र जाणा समस्तांसी ।

जीव जाता क्षणें कैसी । प्रेता आतळु नये जाणा ॥ ९५ ॥


तैसा पति प्राण आपला । पति नसतां अशुचि नातळा ।

याकारणें पतिच स्थूळ- । प्राण आपुला जाणावा ॥ ९६ ॥


पति नसतां स्त्रियांसी । पाहूं नये मुख त्यांसी ।

विधवा म्हणजे प्रेतासरसी । अपुत्री असतां अधिक जाणा ॥ ९७ ॥


ग्रामासी जातां परियेसीं । विधवा येतां सन्मुखेंसी ।

मरण होय सत्य त्यासी । पुत्रवंती अशुभ नव्हे जाणा ॥ ९८ ॥


माता विधवा असे जरी । पुत्रासी शकुन मंगळ करी ।

पुत्राविणें विधवा जे नारी । नमन तिसी करुं नये ॥ ९९ ॥


तिच्या आशीर्वादें आपणा । सर्व मंगळ होय जाणा ।

तिचा शाप हो कां मरणा । तिशीं कोणीं बोलूं नये ॥ १०० ॥


याकारणें पतिव्रता । बरवें पुरुषासवें जातां ।

देहछाया देहसंयुता । केवीं जाय परियेसा ॥ १०१ ॥


चंद्रासवें चांदणें जैसें । मावळतां सवेंचि जातसे ।

मेघासवें विजु असे । तैसे पतीसवें जावें ॥ १०२ ॥

सहगमन करणें मुख्य जाण । धर्म थोर श्रुतिवचन ।

बेचाळीस कुळ-उद्धरण । पतिव्रता परियेसा ॥ १०३ ॥


पुरुष प्रेत झालियावरी । सहगमन करिती ज्या नारी ।

एकेक पदें पादचारी । अश्र्वमेधसहस्त्रपुण्य ॥ १०४ ॥


पापी पुरुष आपुला असे जाण । त्यांते आलें असेल मरण ।

यमदूत नेती जरी बांधून । नरकाप्रति परियेसा ॥ १०५ ॥


पतिव्रता त्याची नारी । जरी आपण सहगमन करी ।

जैसी सर्पासी नेती घारी । तैसी पतीसी स्वर्गा नेई ॥ १०६ ॥


सहगमन केली नारी येतां । यमदूत पळती मागें न पहातां ।

तिचे पतीसी सोडोनि त्वरिता । जाती आपले यमापाशी ॥ १०७ ॥


पतिव्रताशिरोमणि । पतीसी बैसवी विमानीं ।

पावे त्वरित स्वर्गभुवनीं । देवांगना करिती आरति ॥ १०८ ॥


यमदूत पळतां काय बोलती । काळासी आपण न भिऊं ख्याति ।

पतिव्रता देखतां भ्रांति । भीत असों म्हणती देखा ॥ १०९ ॥


सूर्य भितो देखूनि तिसी । तपतो तेज-मंदेसी ।

अग्नि भिऊनि शांतीसी । उष्ण तिसी होऊं न शके ॥ ११० ॥


नक्षत्रें भीती पाहतां तिसी । आपुलें स्थान घेईल ऐशी ।

जाय स्वर्गभुवनासी । पतीसहित परियेसी ॥ १११ ॥


येणेंपरी स्वर्गभुवनीं । जाय नारी संतोषोनि ।

आपुले पतीसी घेऊनि । राहे स्वर्गी निरंतर ॥ ११२ ॥


औट कोटि रोम तिसी । स्वधर्में दिधले अग्नीसी ।

त्याचें फळ आहे कैसी । एकचित्तें परियेसा ॥ ११३ ॥


एकेक रोम-रोमासी । स्वर्गी राहे शतकोटि वर्षीं ।

पुरुषासवें स्वानंदेसीं । पतिव्रता राहे तेथें ॥ ११४ ॥


ऐसें पुण्य सहगमनासी । व्हावी कन्या ऐसी वंशी ।

बेचाळीस कुळें कैसीं । घेऊन जाय स्वर्गातें ॥ ११५ ॥


धन्य तिचीं मातापिता । एकविसांते उद्धार होता ।

धन्य पुरुषवंश ख्याता । बेचाळीस उद्धरिले ॥ ११६ ॥


ऐसें पुण्य सहगमनासी । पतिव्रताफळें तैसीं ।

आणिक सांगेन विस्तारेसीं । देवगुरु म्हणतसे ॥ ११७ ॥


असेल नारी दुराचारी । अथवा जरी व्यभिचारी ।

तिचें फळ आहे थोरी । एकचित्तें परियेसा ॥ ११८ ॥


उभय कुळें बेचाळीस । जरी का असतील स्वर्गास ।

त्यांसी घेऊनि नरकास । प्रेमें जाय परियेसा ॥ ११९ ॥


अंगावरी रोम किती । तितुकी वर्षें ख्याति ।

नरकामध्यें पचे निरुति । तिचें फळ ऐसें असे ॥ १२० ॥


भूमिदेवता ऐसें म्हणे । पतिव्रतेचे असती चरण ।

आपणावरी चालतांक्षण । पुनीत आपण म्हणतसे ॥ १२१ ॥


सूर्य चंद्र ऐसें म्हणती । आपुले किरणीं आहेत ज्योति ।

पतिव्रतेवरी पडती । आपण पावन होतसों ॥ १२२ ॥


वायु आणि वरुण देखा । पतिव्रतेचे स्पर्शें ऐका ।

पावन आपण जाहलों निका । पहातां समस्त पुनीत होती ॥ १२३ ॥


घरोघरीं स्त्रिया असती । काय करावी लावण्यसंपत्ति ।

जिचेनिं वंशा उद्धारगति । तैशी स्त्री घरीं असावी ॥ १२४ ॥


ज्याचे घरीं पतिव्रता । दैवागळा पुरुष ख्याता ।

करावें सुकृत जन्मशतां । तरीच लाधे तैशी सती ॥ १२५ ॥


चतुर्विध पुरुषार्थ देखा । स्त्रियेचेनिं लाधे पुरुषा निका ।

पतिव्रता स्त्री अधिका । पुण्यानुबंधे मिळे जाणा ॥ १२६ ॥


ज्याचे घरी नाही सती । पुण्यें कांहीं त्यासी न होती ।

यज्ञादि कर्में ख्याति । अर्हता नव्हे तो नर ॥ १२७ ॥


सती नाही ज्याचे घरीं । त्यासी नाहीं अरण्य दूरी ।

वृथा जन्मोनि संसारी । कर्मबाह्य तो जाणा ॥ १२८ ॥


ऐसी मिळे ज्यासी । समस्त पुण्यें घडतीं त्यासी ।

पुत्रसंतान परलोकासी । साधन होय सतीचेनिं ॥ १२९ ॥


स्त्रियेवीणें असे जो नर । त्यासी न साधे कर्माचार ।

कर्मविहीन देवपितृ- । कर्मार्ह तो नोहे देखा ॥ १३० ॥


पुण्य जें घडे गंगास्नानें । लाधे सतीचे दर्शनें ।

महापापी होय पावन । सप्तजन्म पापें जातीं ॥ १३१ ॥


पतिव्रतेचा आचार । सांगे बृहस्पति देवगुरु ।

म्हणोनि सरस्वती-गंगाधरु । विनवीतसे श्रोतेजना ॥ १३२ ॥


सिद्ध म्हणे नामधारकासी । गुरुचरित्र पुण्यराशि ।

ऐकतां पावती सद्गतीसी । म्हणे सरस्वतीगंगाधर ॥ १३३ ॥

॥ इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ

श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे


पतिव्रताधर्मनिरुपणं नाम एकत्रिंशोऽध्यायः ॥

श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥

श्री गुरु चरित्र के सभी अध्याय