GuruCharitra.in

Guru Charitra Adhyay 2 | श्री गुरुचरित्र अध्याय दुसरा

गुरुचरित्र अध्याय 2 में बताया गया है कि कैसे गुरु के दर्शन से सभी रोगों से मुक्ति मिलती है। यह अध्याय हमें सिखाता है कि हमें गुरु के चरणों में समर्पण करना चाहिए और उनके दर्शन प्राप्त करने का प्रयास करना चाहिए। गुरु के दर्शन से हमारे सभी रोग नष्ट हो जाते हैं और हम जीवन में सभी तरह के रोगों से मुक्ति प्राप्त करते हैं।

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥

त्रैमूर्तिराजा गुरु तूंचि माझा । कृष्णातिरीं वास करोनि वोजा ।

सुभक्त तेथे करिती आनंदा । ते सुर स्वर्गी पहाती विनोदा ॥ १ ॥

ऐसा श्रीगुरुचरण ध्यात । जातां भक्त ‘ नामांकित ‘ ।

अति श्रमला चालत । राहिला एका वृक्षातळीं ॥ २ ॥

क्षण एक निद्रिस्त । मनीं श्रीगुरु चिंतित।

कृपानिधि अनंत । दिसे स्वप्नीं परियेसा ॥ ३ ॥

रूप दिसे सुषुप्तींत । जटाधारी भस्मांकित ।

व्याघ्रचर्म परिधानित । पीतांबर वास देखा ॥ ४ ॥

येऊनि योगेश्र्वरु जवळी । भस्म लाविलें कपाळीं ।

आश्र्वासूनि तया वेळीं । अभयकर देतसे ॥ ५ ॥

इतकें देखोनि सुषुप्तींत । चेतन झाला नामांकित ।

चारी दिशा अवलोकित । विस्मय करी तये वेळीं ॥ ६ ॥

मूर्ति देखिली सुषुप्तींत । तेचि ध्यातसे मनांत ।

पुढें निघाला मार्ग क्रमित । प्रत्यक्ष देखे तैसाचि ॥ ७ ॥

देखोनियां योगीशातें । करिता झाला दंडवत ।

कृपा भाकी करुणावक्त्र । तारीं तारीं म्हणतसे ॥ ८ ॥

जय जया जी योगाधीशा । अज्ञानतमविनाशा ।

तूंचि ज्योतिःप्रकाशा । कृपानिधि सिद्धमुनी ॥ ९ ॥

तुझे दर्शनें निःशेष । गेले माझे दुरितदोष ।

तूं तारक आम्हांस । म्हणोनि आलासी स्वामिया ॥ १० ॥

कृपणें भक्तालागुनी । येणें झाले कोठोनि ।

तुमचें नाम कवण मुनी । कवण स्थानीं वास तुम्हां ॥ ११ ॥

सिद्ध म्हणे आपण योगी । हिंडूं तीर्थे भूमि-स्वर्गी ।

प्रसिद्ध आमुचा गुरु जगीं । ‘ नृसिंहसरस्वती ‘ विख्यात ॥ १२ ॥

ज्याचें स्थान गाणगापुर । अमरजासंगम भीमातीर ।

त्रयमूर्तीचा अवतार । नृसिंहसरस्वती ॥ १३ ॥

भक्त तारावयालागीं । अवतार त्रयमूर्ति जगीं ।

सदा ध्याती अभ्यासयोगी । भवसागर तरावयासी ॥ १४ ॥

ऐसा श्रीगुरु कृपासिंधु । भक्तजनां सदा वरदु ।

अखिल सौख्य श्रियानंदु । देता होय शिष्यवर्गा ॥ १५ ॥

त्याच्या भक्तां कैचे दैन्य । अखंड लक्ष्मी परिपूर्ण ।

धनधान्यादि गोधन । अष्टैश्र्वर्ये नांदती ॥ १६ ॥

ऐसें म्हणे सिद्ध मुनि । ऐकोनि विनवी नामकरणी ।

आम्ही असतों सदा ध्यानीं । तया श्रीगुरुयतीचे ॥ १७ ॥

ऐशी कीर्ति ब्रीद ख्याति । सांगतसे सिद्ध यति ।

वंशोवंशीं करितों भक्ति । कष्ट आम्हां केवीं पाहें ॥ १८ ॥

तूं तारक आम्हांसी । म्हणोनि मातें भेटलासी ।

संहार करोनि संशयासी । निरोपावें स्वामिया ॥ १९ ॥

सिद्ध म्हणे तये वेळीं । ऐक शिष्या स्तोममौळी ।

गुरुकृपा सूक्ष्मस्थूळी । भक्तवत्सल परियेसा ॥ २० ॥

गुरुकृपा होय ज्यास । दैन्य दिसे कैचे त्यास ।

समस्त देव त्यासी वश्य । कळिकाळासी जिंके नर ॥ २१ ॥

ऐसी वस्तु पूजूनी । दैन्यवृत्ति सांगसी झणी ।

नसेल दृढ तुझे मनीं । म्हणोनि कष्ट भोगितोसी ॥ २२ ॥

त्रयमूर्ति श्रीगुरु । म्हणोनि जाणिजे निर्धारु ।

देऊं शके अखिल वरु । एक भावें भजावें ॥ २३ ॥

एखादे समयीं श्रीहरि । अथवा कोपे त्रिपुरारि ।

राखे श्रीगुरु निर्धारीं । आपुले भक्तजनांसी ॥ २४ ॥

आपण कोपे एखाद्यासी । रक्षूं न शके व्योमकेशी ।

अथवा विष्णु परियेसीं । रक्षूं न शके अवधारीं ॥ २५ ॥

ऐसें ऐकोनि नामकरणी । लागे सिद्धाचिया चरणीं ।

विनवीतसे कर जोडुनी । भावभक्ती करोनियां ॥ २६ ॥

स्वामी ऐसें निरोपिती । संदेह होत माझे चित्तीं ।

गुरुचि केवीं झाले त्रिमूर्ति । ब्रह्मा-विष्णु-महेश्र्वर ॥ २७ ॥

आणीक तुम्ही निरोपिलेति । विष्णु रुद्र जरी कोपती ।

राखों शके गुरु निश्र्चितीं । गुरु कोपलिया न राखे कोणी ॥ २८ ॥

हा बोल असे कवणाचा । कवण शास्त्रपुराणींचा ।

संदेह फेडीं गा मनाचा । जेणें मन दृढ होय ॥ २९ ॥

येणेंपरी नामकरणी । सिद्धासी पुसे वंदोनि ।

कृपानिधि संतोषोनि । सांगतसे परियेसा ॥ ३० ॥

सिद्ध म्हणे शिष्यासी । तुवां पुसिलें आम्हांसी ।

वेदवाक्य-साक्षीसीं । सांगेन ऐक एकचित्तें ॥ ३१ ॥

वेद चारी उत्पन्न । झाले ब्रह्मयाचे मुखेंकरुन ।

त्याचिपासाव पुराण । अष्टादश विख्यात ॥ ३२ ॥

तया अष्टादशांत । ब्रह्मवाक्य असे ख्यात ।

पुराण ‘ ब्रह्मवैवर्त ‘ । प्रख्यात असे त्रिभुवनीं ॥ ३३ ॥

नारायण विष्णुमूर्ति । व्यास झाला द्वापारान्तीं ।

प्रकाश केला हे क्षितीं । ब्रह्मवाक्यविस्तार ॥ ३४ ॥

तया व्यासापासुनी । ऐकिजे समस्त ऋषिजनीं ।

तेचि कथा विस्तारोनि । सांगेन ऐका एकचित्तें ॥ ३५ ॥

चतुर्मुख ब्रह्मयासी । कलियुग पुसे हर्षी ।

गुरुमहिमा विस्तारेंसीं । ब्रह्मदेवें निरुपिला ॥ ३६ ॥

ऐसें म्हणतां नामकरणी । पुनरपि सिद्धासी नमूनि ।

विनवीतसे करद्वय जोडोनि । भावभक्तीकरोनियां ॥ ३७ ॥

म्हणे सिद्धयोगीश्र्वरा । अज्ञानतिमिरभास्करा ।

तूं तारक भवसागरा । भेटलासी कृपासिंधु ॥ ३८ ॥

ब्रह्मदेव कलियुगासी । सांगे केवीं कारणेंसीं ।

आद्यंत विस्तारेसीं । निरोपिजे स्वामिया ॥ ३९ ॥

ऐक शिष्या एकचित्ता । जंघी प्रळयो झाला होता ।

आदिमूर्ति निश्र्चिता । होता वटपत्रशयनीं ॥ ४० ॥

अव्यक्तमूर्ति नारायण । होता वटपत्रशयन ।

बुद्धि उपजे चेतन । आणिक सृष्टि रचावया ॥ ४१ ॥

प्रपंच म्हणजे सृष्टिरचना । करणें म्हणोनि आलें मना ।

जागृत होई या कारणा । आदिपुरुष तये वेळी ॥ ४२ ॥

जागृत होवोनि नारायण । बुद्धि संभवे चेतन ।

कमळ उपजवीं नाभीहून । त्रैलोक्याचें रचनाघर ॥ ४३ ॥

तया कमळामधून । उदयो झाला ब्रह्मा आपण ।

चारी दिशा पाहोन । चतुर्मुख झाला देखा ॥ ४४ ॥

म्हणे ब्रह्मा तये वेळी । समस्तांहूनि आपण बळी ।

मजहून आणिक स्थूळी । कवण नाहीं म्हणतसे ॥ ४५ ॥

हांसोनियां नारायणु । बोले गाढ शब्दवचनु ।

आपण असे महाविष्णु । भज म्हणे तया वेळीं ॥ ४६ ॥

देखोनियां श्रीविष्णूसी । नमस्कारी ब्रह्मा हर्षीं ।

स्तुति केली बहुवसीं । अनेक काळ परियेसा ॥ ४७ ॥

संतोषोनि नारायण । निरोप दिधला अतिगहन ।

सृष्टि रची गा म्हणून । आज्ञा दिल्ही तये वेळीं ॥ ४८ ॥

ब्रह्मा विनवी विष्णूसी । नेणें सृष्टि रचावयासी ।

देखिली नाहीं कैसी । केवीं रचूं म्हणतसे ॥ ४९ ॥

ऐकोनि ब्रह्मयाचें वचनु । निरोप दिला महाविष्णु ।

वेद असती हे घे म्हणोनु । देता झाला तये वेळीं ॥ ५० ॥


सृष्टि रचावयाचा विचार । असे वेदांत सविस्तर ।

तेणेंचिपरी रचूनि स्थिर । प्रकाश करीं म्हणितलें ॥ ५१ ॥

अनादि वेद असती जाण । असे सृष्टिचें लक्षण ।

जैसी आरसा असे खूण । सृष्टि रचावया तैसा वेद ॥ ५२ ॥

या वेदमार्गें सृष्टीसी । रचीं गा ब्रह्मया अहर्निशी ।

म्हणोनि सांगे हृषीकेशी । ब्रह्मा रची सृष्टीतें ॥ ५३ ॥

सृष्टीं प्रजा अनुक्रमे । विविध स्थावरजंगमें ।

स्वेदज अंडज नामें । जारज उद्भिज्ज उपजविले ॥ ५४ ॥

श्रीविष्णूचे निरोपानें । त्रिजग रचिलें ब्रह्मयाने ।

तेणेंपरी सृष्टीक्रमणें । व्यासें असे कथियेलीं ॥ ५५ ॥

सिद्ध म्हणे शिष्यासी । नारायण वेदव्यासीं ।

विस्तार केला पुराणांसी । अष्टादश विख्यात ॥ ५६ ॥

तयांत ब्रह्मवैवर्त । पुराण असे प्रख्यात ।

ऋषेश्र्वरांसी सांगे सूत । तेचि परी सांगतसे ॥ ५७ ॥

सनकादिकांतें उपजवोनि । ब्रह्मनिष्ठ येणें गुणी ।

मरीच्यादि ब्रह्म सगुणी । उपजवी ब्रह्मा तये वेळीं ॥ ५८ ॥

तेथोनि देवदैत्यांसि । उपजवी ब्रह्मा परियेसीं ।

सांगता कथा विस्तारेंसीं । असे, ऐक शिष्योत्तमा ॥ ५९ ॥

कृत-त्रेत-द्वापारयुग । मग उपजवी कलियुग ।

एकेकातें निरोपी मग । भूमीवरी प्रवर्तावया ॥ ६० ॥

बोलावूनि कृतयुगासी । निरोपी ब्रह्मा परियेसीं ।

तुवां जावोनि भूमीसी । प्रकाश करीं आपणांते ॥ ६१ ॥

ऐकोनि ब्रह्मयाचें वचन । कृतयुग आलें संतोषोन ।

सांगेन त्याचे लक्षण । ऐका श्रोते एकचित्तें ॥ ६२ ॥

असत्य नेणे कधीं वाचे । वैराग्यपूर्ण ज्ञानी साचें ।

यज्ञोपवीत आभरण त्याचें । रुद्राक्षमाळा करकंकणे ॥ ६३ ॥

येणें रुपें युग-सत्य । ब्रह्मयासी असे विनवित ।

मातें तुम्ही निरोप देत । केवीं जाऊं भूमीवरी ॥ ६४ ॥

भूमीवरी मनुष्य लोक । असत्य-निंदा-अपवादक ।

मातें न साहे तें ऐक । कवणेपरी वर्तावें ॥ ६५ ॥

ऐकोनि सत्ययुगाचे वचन । निरोपी तो ब्रह्मा आपण ।

तुवां वर्तावें सत्वगुण । क्वचित्काळ येणेंपरी ॥ ६६ ॥

न करीं जड तूंतें जाण । आणिक युग पाठवीन ।

तुवां रहावें सावधान । म्हणूनि पाठवी भूमीवरी ॥ ६७ ॥

वर्ततां येणेंपरी ऐका । झाली अवधि सत्याधिका ।

बोलावूनि त्रेतायुगातें, विवेका । निरोपी ब्रह्मा परियेसा ॥ ६८ ॥

त्रेतायुगाचे लक्षण । ऐक शिष्या सांगेन ।

असे त्याची स्थूल तनु । हातीं असे यज्ञसामग्री ॥ ६९ ॥

त्रेतायुगीं याचि कारणें । यज्ञ करिती सकळ जनें ।

धर्मशास्त्र प्रवर्तणें । कर्ममार्ग ब्राह्मणांसी ॥ ७० ॥

हातीं देखा वृषभ असे । धर्मप्रवर्तक सदा वसे ।

ऐसें युग गेलें हर्षे । निरोप घेऊनि भूमीवरी ॥ ७१ ॥

बोलावूनि ब्रह्मा हर्षी । निरोप देत द्वापारासी ।

सांगेन तयाचे रुपासी । ऐका श्रोते एकचित्ते ॥ ७२ ॥

खड्ग खट्वांग धरोनि हातीं । धनुष्य बाण येरा हातीं ।

लक्ष्य उग्र असे शांति । निष्ठुर दया दोनी असे ॥ ७३ ॥

पुण्य पाप समान देखा । स्वरुपें द्वापार ऐसा निका ।

निरोप घेऊनि कौतुका । आला आपण भूमीवरी ॥ ७४ ॥

त्याचे दिवस पुरल्यावरी । कलियुगातें पाचारी ।

जावें त्वरित भूमिवरी । म्हणोनि सांगे ब्रह्मा देखा ॥ ७५ ॥

ऐसें कलियुग देखा । सांगेन लक्षणें ऐका ।

ब्रह्मयाचे सन्मुखां । केवीं गेलें परियेसा ॥ ७६ ॥

विचारहीन अंतःकरणीं । पिशाचासारखा वदनी ।

तोंड खालतें करुनी । ठायीं ठायीं पडतसे ॥ ७७ ॥

क्रूर आपण विरागहीन । कलह द्वेष सवें घेऊन ।

वाक हातीं धरुनि शिस्न । येत ब्रह्मयासन्मुख ॥ ७८ ॥

जिव्हा धरोनि उजवे हातीं । नाचे कली अतिप्रीतीं ।

दोषोत्तरें करी स्तुति । पुण्यपापसंमिश्रित ॥ ७९ ॥

वांकुल्या दावी हांसे रडे । जिव्हा तोंड करुनि वांकुडें ।

उभा ठेला ब्रह्मयापुढें । काय निरोप म्हणतसे ॥ ८० ॥

देखोनि तयाचें लक्षण । ब्रह्मा हांसे अतिगहन ।

पुसतसे अति विनोदानें । लिंग जिव्हा कां धरिली ॥ ८१ ॥

कलियुग म्हणे ब्रह्मयासी । जिंकीन समस्त लोकांसी ।

लिंग जिव्हा रक्षणारांसी । हारी असे आपणांते ॥ ८२ ॥

याकारणें लिंग जिव्हा । धरोनि नाचें ब्रह्मदेवा ।

जेथें जाईन मी स्वभावा । आपण न भिेयें कवणिया ॥ ८३ ॥

ऐकोन कलीचें वचन । निरोप देतो ब्रह्मा आपण ।

भूमीवरी जाऊन । आपुले गुण प्रकाशी ॥ ८४ ॥

कलि म्हणे ब्रह्मयासी । मज पाठवितां भूमीसी ।

आपुले गुण आहेत कैसी । सांगेन ऐका स्वामिया ॥ ८५ ॥

छेद करीन धर्मासी । आपण असें निरंकुशी ।

निरानंद परियेसीं । निद्रा-कलह माझे प्राण ॥ ८६ ॥

परद्रव्यहारक परस्त्रीरत । हे दोघे माझे भ्रात ।

प्रपंच-मत्सर-दंभक । प्राणसखे माझे असती ॥ ८७ ॥

बकासारिखे संन्यासी । तेचि माझे प्राण परियेसीं ।

छळ करोनि उदरासी । मिळविती पोषणार्थ ॥ ८८ ॥

तेचि माझे सखे प्राण । आणीक असतील पुण्यजन ।

तेचि माझे वैरी जाण । म्हणोनि विनवी ब्रह्मयासी ॥ ८९ ॥

ब्रह्मा म्हणे कलियुगासी । सांगेन तुज उपदेशीं ।

तुझ्या युगीं आयुष्य नरासी । स्वल्प असे एक शत ॥ ९० ॥

पूर्व युगायुगीं देखा । आयुष्य बहु मनुष्यलोकां ।

तप अनुष्ठान ऐका । करिती अनेक दिवसवरी ॥ ९१ ॥

मग होय तयांसी गति । आयुष्य असे अखंडिती ।

याकारणें कष्टती क्षितीं । बहु दिवसपर्यंत ॥ ९२ ॥

आतां ऐसें नव्हे जाण । स्वल्प आयुष्य मनुष्यपणें ।

करिती तप अनुष्ठानें । शीघ्र पावती परमार्था ॥ ९३ ॥

जे जन असती ब्रह्मज्ञानी । पुण्य करिती जाणोनि ।

त्यांसी तुवां साह्य होऊनि । वर्तत असे म्हणे ब्रह्मा ॥ ९४ ॥

ऐकोनि ब्रह्मयाचें वचन । कली म्हणतसे नमून ।

स्वामींनीं निरोपिले जे जन । तेचि माझे वैरी असती ॥ ९५ ॥

ऐसे वैरी जेथ असती । केवीं जाऊं तिये क्षितीं ।

ऐकतां होते मज भीति । केवीं पाहूं तयांसी ॥ ९६ ॥

पंचाशत भूमंडळांत । भरतखंडीं पुण्य बहुत ।

मातें मारितील देखत । कैसा जाऊं म्हणतसे ॥ ९७ ॥

ऐकोनि कलीचें वचन । ब्रह्मा निरोपी हांसोन ।

काळात्म्यातें मिळोन । तुवां जावें भूमीसी ॥ ९८ ॥

काळात्म्याचे ऐसे गुण । छेदन करील धर्मवासना ।

पुण्यात्म्याचे अंतःकरणा । उपजेल बुद्धि पापाविषयीं ॥ ९९ ॥

कली म्हणे ब्रह्मयासी । वैरी सांगेन माझे कैसी ।

वसताति भूमंडळासी । सांगेन स्वामी ऐक पां ॥ १०० ॥


उपद्रविती मातें बहुत । कृपा न ये मज देखत ।

जे जन शिवहरि ध्यात । धर्मरत मनुष्य देखा ॥ १०१ ॥

आणिक असती माझे वैरी । वास करिती गंगातीरीं ।

आणिक वाराणशीपुरीं । जाऊनि धर्म करिती देखा ॥ १०२ ॥

तीर्थें हिंडती आ-चरण । आणिक ऐकती पुराण ।

जे जन करिती सदा दान । तेचि माझे वैरी ॥ १०३ ॥

ज्यांचे मनीं असे शांति । तेचि माझे वैरी ख्याति ।

अदांभिकपणें पुण्य करिती । त्यांसी देखतांचि भीतसें ॥ १०४ ॥

नासाग्रीं दृष्टि देऊनी । जप करिती अनुष्ठानीं ।

त्यांसि देखतांचि नयनीं । प्राण माझा जातसे ॥ १०५ ॥

स्त्रियापुत्रांवरी प्रीति । मायापाशें आचरती ।

त्यांवरी माझी बहु प्रीति । परम इष्ट माझे जाणा ॥ १०६ ॥

वेदशास्त्रांतें दूषिती । हरिहरांतें भेद पाहती ।

अथवा शिवविष्णु दूषिती । परम आप्त माझे जाणा ॥ १०७ ॥

जितेंन्द्रिय असतील जे नर । सदा भजती हरिहर ।

रागद्वेषविवर्जित धीर । त्यांसि देखतां मज भय ॥ १०८ ॥

ब्रह्मा म्हणे कलियुगासी । तुझा प्रकाश बहुवसीं ।

तुवां जातांचि भूमीसी । तुझे इच्छें रहाटती ॥ १०९ ॥

एखादा विरळागत । होईल नर पुण्यवंत ।

त्यातें तुवां साह्य होत । वर्तत असें म्हणे ब्रह्मा ॥ ११० ॥

ऐकोनि ब्रह्मयाचें वचन । कली करीतसे नमन ।

करसंपुट जोडोन । विनवीतसे परियेसा ॥ १११ ॥

माझा स्वभाव-दुर्वृत्तीसी । केवीं साह्य होऊं धर्मासी ।

सांगा स्वामी उपाय यासी । कवणेपरि रहाटावें ॥ ११२ ॥

कलीचें वचन ऐकोनि । ब्रह्मा हांसे अतिगहनी ।

सांगतसे विस्तारोनि । उपाय कलीसी रहाटावया ॥ ११३ ॥

काळ-मल असती दोनी । तुज साह्य होऊनि ।

येत असती निर्गुणी । तेचि दाविती तुज मार्ग ॥ ११४ ॥

निर्मळ असती जे जन । तेचि तुझे वैरी जाण ।

मळमूत्रें वेष्टिले जन । तुझे इष्ट परियेसीं ॥ ११५ ॥

याचि कारणें पापपुण्यासी । विरोध असे परियेसीं ।

अधिक होय पुण्यराशी । तेचि जिंकिती परियेसा ॥ ११६ ॥

याकारणें विरळागत । होईल नर पुण्यवंत ।

तेचि जिंकिती हें निश्र्चित । बहुतेक तुज वश्य होती ॥ ११७ ॥

एखादा विवेकी जन । तुझा उपद्रव साहील पूर्ण ।

जो न साहे तुझे दारुण । तुज वश्य जाण जाहला ॥ ११८ ॥

या कलियुगाभीतरीं । जन होतील येणेंपरी ।

जे जन साहतील तुझी क्रूरी । तेंचि ईश्र्वरीं ऐक्य होती ॥ ११९ ॥

ऐकोनि ब्रह्मयाचें वचन । कलियुग करितसे प्रश्र्न ।

कैसें साधूचें अंतःकरण । कवण अंश निरोपावें ॥ १२० ॥

ब्रह्मा म्हणे तये वेळीं । एकचित्तें ऐक कली ।

सांगेन ऐका श्रोते सकळी । सिद्ध म्हणे शिष्यासी ॥ १२१ ॥

धैर्य धरोनि अंतःकरण । शुद्ध बुद्धीं वर्तती जन ।

दोष न लागती कधीं जाण । लोभवर्जित नरांसी ॥ १२२ ॥

जे जन भजती हरिहरांसी । अथवा असती काशीवासी ।

गुरु सेविती निरंतरेसीं । त्यांसी तुझा न लगे दोषु ॥ १२३ ॥

मातापितासेवकांसी । अथवा सेवी ब्राह्मणासी ।

गायत्रि कपिला-धेनूसी । भजणारांसी न लगे दोष तुझा ॥ १२४ ॥

वैष्णव अथवा शैवासी । जे सेविती नित्य तुळसीसी ।

आज्ञा माझी आहे ऐसी । तयांसी बाधूं नको ॥ १२५ ॥

गुरुसेवक असती नर । पुराण श्रवण करणार ।

सर्वसाधनधर्मपर । त्यांसी तूं बाधों नको ॥ १२६ ॥

सुकृती-शास्त्रपरायणांसी । गुरुतें सेविती वंशोवंशीं ।

विवेकें धर्म करणारांसी । त्यांतें तुवां बाधूं नको ॥ १२७ ॥


कलि विनवी ब्रह्मयासी । ‘ गुरु ‘ शब्द म्हणजे आहे कैसी ।

कवण गुरु स्वरुप कैसी । विस्तारावें मजप्रति ॥ १२८ ॥

ऐकोनि कलीचें वचन । ब्रह्मा सांगतसे आपण ।

‘ ग ‘ कार म्हणजे सिद्ध जाण । रेफः पापस्य दाहकः ॥ १२९ ॥

‘ उ ‘ कार विष्णु अव्यक्त । ब्रह्मा रुद्र गुरु निश्र्चित ।

त्रितयात्मक श्रीगुरु सत्य । म्हणोनि सांगे कलीसी ॥ १३० ॥

गणेशो वाऽग्निना युक्तो विष्णुना च समन्वितः ।

वर्णद्वयात्मको मंत्रश्र्चतुर्वर्गफलप्रदः ॥ १३१ ॥

गणेशातें म्हणती गुरु । तैसाचि असे वैश्र्वानरु ।

ऐसाचि जाण शार्ङ्गधरु । गुरुशब्द वर्ते इतुके ठायीं ॥ १३२ ॥

गुरुः पिता गुरुर्माता गुरुरेव परः शिवः ।

शिवे रुष्टे गुरुस्त्राता गुरौ रुष्टे न कश्र्चन ॥ १३३ ॥

गुरु पिता, गुरु माता । गुरु शंकरु निश्र्चिता ।

ईश्र्वर होय जरी कोपता । गुरु रक्षील परियेसा ॥ १३४ ॥

गुरु कोपेल एखाद्यासी । ईश्र्वर न राखे परियेसीं ।

ईश्र्वरु कोपेल जरी त्यासी । श्रीगुरु राखेल निश्र्चित ॥ १३५ ॥

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्र्वरः ।

गुरुरेव परं तत्वं तस्माद् गुरुमुपाश्रयेत् ॥ १३६ ॥

गुरु ब्रह्मा सत्य जाण । तोचि रुद्र महाविष्णु ।

गुरुचि तत्व कारण । म्हणोनि गुरु आश्रावा ॥ १३७ ॥

हरौ प्रसन्नेऽपि च वैष्णवा जनाः, संप्रार्थयंन्ते गुरुभक्तिमव्ययाम् ।

गुरौ प्रसन्ने जगतामधीश्र्वरः, जनार्दनस्तुष्यति सर्वसिद्धिदः ॥ १३८ ॥

ईश्र्वर जरी प्रसन्न होता । त्यासी होय गुरु ओळखविता ।

गुरु आपण प्रसन्न होतां । ईश्र्वर होय आधीन आपुल्या ॥ १३९ ॥

गुरुं भजञ्शास्त्रमार्गान् प्रवेत्ति, तीर्थं व्रतं योगतपादिधर्मान् ।

आचारवर्णादिविवेकयज्ञान्, ज्ञानं परं भक्तिविरागयुक्तम् ॥ १४० ॥

याकारणें श्रीगुरुसी । भजावें शास्त्रमार्ग ऐसी ।

तीर्थव्रतयोगतपासी । ज्योतिःस्वरुप असे जाणा ॥ १४१ ॥

आचारधर्मवर्णाश्रमांसी । विवेकी कर्ममार्गासी ।

भक्तिविरागयुक्तांसी । गुरुचि मार्ग दाखविणार ॥ १४२ ॥

इतुकें ऐकोनि कलि आपण । विनवीतसे कर जोडून ।

गुरु सर्व देवांसमान । केवीं झाला सांग मज ॥ १४३ ॥

ब्रह्मा म्हणे कलीसी । सांगेन तुज विस्तरेसीं ।

एकचित्तें परियेसीं । गुरुविणें पार नाहीं ॥ १४४ ॥

गुरुं विना न श्रवणं भवेत्कस्यापि कस्यचित् ।

विनाकर्णेन शास्त्रस्य श्रवणं तत्कुतो भवेत् ॥ १४५ ॥

गुरुवीण समस्तांसी । श्रवण कैचें परियेसीं ।

श्रवण होता मनुष्यांसी । समस्त शास्त्रें ऐकती ॥ १४६ ॥

शास्त्रें ऐकतां परियेसीं । तरतील संसारापाशीं ।

याकारणे गुरुचि प्रकाशी । ज्योतिःस्वरुप जाणावा ॥ १४७ ॥

गुरु सेवितां सर्व सिद्धि । होती परियेसा सर्वऋद्धि ।

कथा वर्तली अनादि । अपूर्व तुज सांगेन ॥ १४८ ॥

पूर्वी गोदावरीचे तीरीं । आंगिरस ऋषीचा आश्रम थोरी ।

वृक्ष असती नानापरी । पुण्य नाभीमृग वसती ॥ १४९ ॥

ब्रह्मऋषि आदिकरोनी । तप करिती तया स्थानीं ।

तयांत ‘ वेदधर्म ‘ म्हणोनि । पैलपुत्र होता द्विज ॥ १५० ॥

तया शिष्य बहु असती । वेदशास्त्र अभ्यासिती ।

त्यांत ‘ दीपक ‘ म्हणिजे ख्याति । शिष्य होता परियेसा ॥ १५१ ॥

होता शिष्य गुरुपरायण । केला अभ्यास शास्त्रपुराण ।

झाला असे अतिनिपुण । तया गुरु सेवा करितां ॥ १५२ ॥

वेदधर्म एके दिनीं । समस्त शिष्यांसी बोलावुनी ।

पुसतसे संतोषोनि । ऐका सकळजन ॥ १५३ ॥

बोलावूनि शिष्यांसी । म्हणे गुरु परियेसी ।

प्रीति असेल जरी तुम्हांसी । तरी माझे वाक्य परिसावें ॥ १५४ ॥

शिष्य म्हणती गुरुसी । जें जें स्वामी निरोप देसी ।

अंगीकारुं भरंवसीं । आम्हांसी तूं तारक ॥ १५५ ॥

गुरुचें वाक्य जोन करी । तोचि पडे रौरव-घोरीं ।

आविद्यामायासागरीं । बुडोन जाय तो नर ॥ १५६ ॥

मग तया कैंची गति । नरकीं पचे तो सततीं ।

गुरु तारक हे ख्याति । बोलती वेदपुराणें ॥ १५७ ॥

ऐकोनि शिष्यांचें वचनी । संतोष जाहला वेदधर्म मुनि ।

संदीपकातें बिलावूनि । सांगतसे परियेसा ॥ १५८ ॥

ऐका हो शिष्य सकळिक । आमचें पूर्वार्जित असे एक ।

जन्मांतरीं सहस्त्रेक । केलें होतें महापातक ॥ १५९ ॥

आमुचें अनुष्ठान करितां । बहुत गेलें प्रक्षाळितां ।

कांहीं शेष असे आतां । भोगिल्यावांचूनि नवचे जाणा ॥ १६० ॥

तपसामर्थें जरी उपेक्षा करित । तरी पाप मोक्षासी आड रिघत ।

याचि कारणें निष्कृति करित । तया पापघोरासी ॥ १६१ ॥

न भोगितां आपुले देहीं । आपले पापा निष्कृतीसी ।

हें निश्र्चत करोनि पाहीं । भोगावें आम्हीं परियेसा ॥ १६२ ॥

या पापाचे निष्कृतीसी । जावें आम्हीं वाराणशीसी ।

जाईल पाप शीघ्रतेसीं । प्रख्यात असे अखिल शास्त्रीं ॥ १६३ ॥

याकारणें आपणासी । न्यावें वाराणसी पुरीसी ।

पाप भोगीन स्वदेहासीं । मातें तुम्हीं सांभाळावें ॥ १६४ ॥

या समस्त शिष्यांत । कवणा असेल सामर्थ्य ।

अंगीकारावें त्वरित । म्हणोनि पुसे शिष्यांसी ॥ १६५ ॥

या शिष्यांमध्यें एकु । नाम असे ‘ संदीपकु ‘ ।

बोलतसे अतिविवेकु । तया गुरुप्रति देखा ॥ १६६ ॥

दीपकु म्हणे श्रीगुरुसी । पाप करितां देह नाशी ।

न करावा संग्रहो दुःखासी । शीघ्र करावा प्रतीकारु ॥ १६७ ॥

वेदधर्म म्हणे तयासी । दृढ-देह असतां मनुष्यासी ।

क्षालन करावें पापासी । अथवा वाढे विषापरी ॥ १६८ ॥

अथवा तीर्थ-प्रायश्र्चित । अपुले देहीं भोगोनि त्वरित ।

पापावेगळें न होता निरुते । आपुले आपण न भोगितां ॥ १६९ ॥

देव अथवा ऋषेश्र्वरांसी । मनुष्यादि जंतूंसी ।

क्षालन न होय पापासी । आपुले आपण न भोगितां ॥ १७० ॥

दिपक म्हणे गुरुसी । स्वामी निरोपावें आपणासी ।

सेवा करीन स्वशक्तीसी । न करितां अनुमान, सांगिजे ॥ १७१ ॥

ऐकोनि दीपकाचे वचन । वेदधर्म म्हणे आपण ।

कुष्ठी होईन अंगहीन । अंध पांगुळ परियेसा ॥ १७२ ॥

संवत्सर एकविंशत । मातें सांभाळावें बहुत ।

जरी असेल दृढ-व्रत । तरीच अंगीकार करावा ॥ १७३ ॥

दीपकु म्हणे गुरुसी । कुष्ठी होईन आपण हर्षी ।

अंध होईन एकवीस वर्षी । पापनिष्कृति करीन ॥ १७४ ॥

तुमचे पापाची निष्कृति । मी करीन निश्र्चतीं ।

स्वामी निरोपावें त्वरिती । म्हणोनि चरणीं लागला ॥ १७५ ॥

ऐकोनि शिष्याचें वचन । संतोषला वेदधर्म मुनि आपण ।

सांगतसे विस्तारोन । लक्षण तया पापाचें ॥ १७६ ॥

आपुलें पाप आपणासी । नोहे पुत्रशिष्यांसी ।

न भोगितां स्वदेहासी । नवचे पाप परियेसा ॥ १७७ ॥

याकारणें आपण देखा । भोगीन आपुले पापदुःखा ।

बापा आम्हांसी सांभाळीं तूं दीपका । एकवीस वर्षेपर्यंत ॥ १७८ ॥

जे पीडिती रोगें देखा । प्रतिपाळणारासी कष्ट अधिका ।

मजहूनि संदीपका । तुज कष्ट अधिक जाण ॥ १७९ ॥

याकारणें आपुले देहीं । भोगीन पाप निश्र्चयीं ।

तुवां प्रतिपाळावें पाहीं । काशीपुरीं नेऊनियां ॥ १८० ॥

तया काशीपुरीं जाण । पापावेगळा होईन ।

आपण शाश्र्वतपद पावेन । तुजकरितां शिष्योत्तमा ॥ १८१ ॥

दीपकु म्हणे श्रीगुरुसी । अवश्य नेईन पुरी काशी ।

सेवा करीन एकवीस वर्षी । विश्र्वनाथासम तुम्ही ॥ १८२ ॥

ब्रह्मा म्हणे कलीसी । एक शिष्य होता कैसा त्यासी ।

कुष्ठ होतांचि गुरुसी । नेलें काशीपुराप्रति ॥ १८३ ॥

मनकर्णिका उत्तरदिशीं । कंबळेश्र्वर-संनिधेसी ।

राहिले तेथें परियेसीं । गुरु शिष्य दोघेजण ॥ १८४ ॥

स्नान करुनि मनकर्णिकेसी । पूजा करिती विश्र्वेशासी ।

प्रारब्धभोग त्या गुरुसी । भोगीत होता तया स्थानीं ॥ १८५ ॥


कुष्ठरोगें व्यापिलें बहुत । अक्षहीन अति दुःखित ।

संदीपक सेवा करित । अतिभक्तीकरुनि ॥ १८६ ॥

व्यापिलें देहीं कुष्ठ बहुत । पू कृमि पडे रक्त ।

दुःखे व्यापला अत्यंत । अपस्मारी झाला जाण ॥ १८७ ॥

भिक्षा मागोनि संदीपकु । गुरुसी आणोनि देत नित्यकु ।

करी पूजा भावें एकु । विश्र्वनाथस्वरुप म्हणत ॥ १८८ ॥

रोगेंकरुनि पीडिती नरु । साधुजन होती क्रूरु ।

तेचि रीतीं द्विजवरु । होय क्रूर व्याधिबळें ॥ १८९ ॥

भिक्षा आणितां एके दिनीं । न जेवी श्रीगुरु कोपेनीं ।

स्वल्प आणिलें म्हणोनी । क्लेशें सांडोनि देत भूमीवरी ॥ १९० ॥

येरे दिवशीं जाऊनि शिष्य । आणी अन्न बहुवस ।

मिष्टान्न नाणिसी म्हणोनि क्लेश । करिता झाला परियेसा ॥ १९१ ॥

परोपरीचीं पक्वान्नें । कां नाणिशी म्हणे ।

जाय, कोपें मारुं ये आपण । शाका परोपरी मागतसे ॥ १९२ ॥

तितुकेंही आणी मागोनियां । सर्वस्व करीतसे वायां ।

कोपें देतसे शिविया । परोपरी परियेसा ॥ १९३ ॥

एखादें समयीं शिष्यासी । म्हणे ताता ज्ञानराशी ।

मजनिमित्त कष्टलासी । शिष्योत्तम-शिखामणी ॥ १९४ ॥

सवेंचि म्हणे पापी क्रूरा । मातें गांजिलें अपारा ।

पू-मांस विण्मूत्रा । क्षणाक्षणां धूत नाही ॥ १९५ ॥

खाताति मज मक्षिका । कां न निवारिसी संदीपका ।

सेवा करितां म्हणे ऐका । भिक्षा नाणिसी म्हणतसे ॥ १९६ ॥

याकारणें पापगुण । ऐसेंचि असे जाण ।

वोखटें वाक्य निर्गुण । पाप म्हणोनि जाणावें ॥ १९७ ॥

पाप जेथें असे बहुत । दैन्य मात्सर्यसहित वसत ।

शुभाशुभ नेणे क्वचित । पापरुप तें जाणावें ॥ १९८ ॥

एखादे दैत्यकासी । दुःखप्राप्ति होय कैसी ।

अपस्मार होय जयासी । पापरुप तोचि जाणा ॥ १९९ ॥

समस्त रोग असती देखा । कुष्ठ-सोळा भाग नव्हती का ।

वेदधर्म द्विजु ऐका । कष्टतसे येणेपरी ॥ २०० ॥

ऐसे गुरुचे गुणदोष । मना नाणी तो शिष्य ।

सेवा करी एकमानस । तोचि ईश्र्वर म्हणोनि ॥ २०१ ॥

जैसे जैसें मागे अन्न । आणूनि देतो परिपूर्ण ।

जैसा ईश्र्वर असे विष्णु । तैसा गुरु म्हणतसे ॥ २०२ ॥

काशीसारखे क्षेत्र असतां । कदा न करी तीर्थयात्रा ।

न वचे देवाचिये यात्रा । गुरुसेवेवांचूनि ॥ २०३ ॥

न तीर्थयात्रा न च देवयात्रा, न देहयात्रा न च लोकयात्रा ।

अहर्निशं ब्रह्महरीबुद्धया, गुरुं प्रपन्नो नहि सेव्यमन्यत ॥ २०४ ॥

आपुला देह संरक्षण । कधी न करी शिष्यराणा ।

लय लावूनि श्रीगुरुचरणा । कवणासवें न बोलेचि ॥ २०५ ॥

अहोरात्र येणेपरी । ब्रह्मा विष्णु त्रिपुरारि ।

गुरुचे होय निर्धारीं । म्हणोनि सेवा करीतसे ॥ २०६ ॥

गुरु बोले निष्ठुरेसीं । आपण मनी संतोषी ।

जें जें त्याचे मानसीं । पाहिजे तैसा वर्ततसे ॥ २०७ ॥

वर्ततां येणेपरी देख । प्रसन्न होवोनि पिनाक ।

येवोनि उभा सन्मुख । वर माग म्हणतसे ॥ २०८ ॥

अरे गुरुभक्ता दीपका । महाज्ञानी कुलदीपका ।

तुष्टलों तुझे भक्तीसी निका । प्रसन्न झालों माग आतां ॥ २०९ ॥

दीपक म्हणे ईश्र्वरासी । हे मृत्युंजय व्योमकेशी ।

न पुसतां आपण गुरुसी । वर न घें परियेसा ॥ २१० ॥

म्हणोनि गेला गुरुपाशीं । विनवीतसे तयासी ।

विश्र्वनाथ आम्हांसी । प्रसन्न होऊनि आलासे ॥ २११ ॥

निरोप झालिया स्वामीचा । मागेन उपशम व्याधीचा ।

वर होतां सदाशिवाचा । होईल बरवें तुम्हांसी ॥ २१२ ॥

ऐकोनि शिष्याचे वचन । बोले गुरु कोपोन ।

माझे व्याधीनिमित्त जाण । नको प्रार्थूं ईश्र्वरासी ॥ २१३ ॥

भोगिल्यावांचोनि । निवृत्ति नव्हे गा परियेसीं ।

जन्मांतरी बाधिती ऐसी । धर्मशास्त्र असे जाण ॥ २१४ ॥

मुक्ति-अपेक्षा ज्याचे मनीं । निवृत्ति करावी पापधुनी ।

शेष राहिलिया निर्गुणी । विघ्न करी मोक्षासी ॥ २१५ ॥

ऐसेपरी शिष्यासी । गुरु सांगे परियेसीं ।

निरोप पुसोनि श्रीगुरुसी । गेला ईश्र्वरासन्मुख ॥ २१६ ॥

जाऊनि म्हणे ईश्र्वरासी । नलगे वर आपणासी ।

नये गुरुचे मानसीं । केवीं घेऊं म्हणतसे ॥ २१७ ॥

विस्मय करोनि व्योमकेशी । गेला निर्वाणमंटपासी ।

बोलावून समस्त देवांसी । सांगे वृत्तांत विष्णूपुढ़ें ॥ २१८ ॥

श्रीविष्णु म्हणे शंकरास । कैसा गुरु कैसा शिष्य ।

कोठे त्यांचा असे वास । सांगावें मज प्रकाशोनि ॥ २१९ ॥

सांगे ईश्र्वर विष्णूसी । आश्र्चर्य देखिलें परियेसीं ।

दीपक ‘ म्हणिजे बाळ कैसी । गुरुभक्ति करितो अभिनव ॥ २२० ॥

गोदावरीतीरवासी । ‘ वेदधर्म ‘ म्हणिजे तापसी ।

त्याची सेवा अहर्निशी । करितो भावें एकचित्तें ॥ २२१ ॥

न ऐकिला देखिला कोणीं । गुरुभक्ति करणार निर्वाणी ।

त्यातें देखोनि माझे मनीं । अतिप्रीति वर्ततसे ॥ २२२ ॥


वर देऊं म्हणोनि आपणु । गेलों होतों ऐक विष्णु ।

गुरुचा निरोप नाहीं म्हणोनु । न चे वर परियेसा ॥ २२३ ॥

अनेक दिव्य सहस्त्रवर्षी । तप करिती महाऋषि ।

वर मागती अहर्निशी । नाना कष्ट करोनियां ॥ २२४ ॥

तैसे तापसी योगियांसी । नव्हे मन वर द्यावयासी ।

बलात्कारें देतां कैसी । वर न घे तो दीपक ॥ २२५ ॥

तनुमन गुरुसी समर्पूनि । सेवा करितो संतोषोनि ।

त्रिमूर्ति गुरुचि म्हणोनि । निश्र्चय केला मानसीं देखा ॥ २२६ ॥

समस्त देव माता पिता । गुरुचि होय ऐसें म्हणतां ।

निश्र्चय केला असे चित्ता । गुरु परमात्मा म्हणोनि ॥ २२७ ॥

किती म्हणोनि वर्णूं त्यासी । अविद्या-अंधकारासी ।

तोचि दीप परियेसीं । कुलदीपक नाम सत्य ॥ २२८ ॥

धर्म ज्ञान सर्व एक । गुरुचि म्हणे तो दीपक ।

चरणसेवा मनःपूर्वक । करितो गुरुची भक्तीनें ॥ २२९ ॥

इतुकें एकोनि शार्ङगधरु । पहावया गेला शिष्य-गुरु ।

त्यांचा भक्तिप्रकारु । पाहता झाला तये वेळीं ॥ २३० ॥

सांगितले होतें विश्र्वनाथें । अधिकत्व दिसे आणिक बहुतें ।

संतोषोनि दीपकातें । म्हणे विष्णु परियेसा ॥ २३१ ॥

बोलावूनि दीपकासी । म्हणतसे हृषीकेशी ।

तुष्टलों तुझ्या भक्तीसी । वर माग म्हणतसे ॥ २३२ ॥

दीपक म्हणे विष्णूसी । काय भक्ति देखोनि आम्हांसी ।

वर देसी परियेसीं । कवण कार्या सांग मज ॥ २३३ ॥

दिव्य कोटी सहस्त्र वरुषीं । तप करिती अरण्यवासी ।

त्यांसी करितोसि उदासी । वर नेदिसी नारायणा ॥ २३४ ॥

मी तर तुज भजत नाहीं । तुझें नामस्मरण नाहीं ।

बलात्कारें येवोनि पाहीं । केवीं देसी वर मज ॥ २३५ ॥

ऐकोनि दीपकाचें वचनु । संतोषी जाहला महाविष्णु ।

सांगतसे विस्तारोनु । तया दीपकाप्रती देखा ॥ २३६ ॥

गुरुभक्ति करिसी निर्वाणेसीं । म्हणोनि जाहलों संतोषी ।

जे भक्ति केलीस गुरुसी । तेचि आम्हांसी पावली ॥ २३७ ॥

जो नर असेल गुरुभक्त जाण । तोचि माझा असे प्राण ।

त्यासी वश्य झालों आपण । जें जें मागेल तें तें म्यां द्यावें ॥ २३८ ॥

सेवा करिती मातापितीं । तेचि सेवा मज पावती ।

पतिसेवा स्त्रिया करिती । तेचि मज पावतसे ॥ २३९ ॥

एखादे भल्या ब्राम्हणासी । यति-योगेश्र्वर-तापसी ।

नमन करिती भक्तीसीं । तेंचि मज पावे जाणा ॥ २४० ॥

ऐसें ऐकोनि दीपक । नमिता झाला आणिका ।

विनवीतसे ऐक । सिद्ध म्हणे द्विजासी ॥ २४१ ॥

ऐक विष्णु हृषीकेशी । निश्र्चय असे माझे मानसीं ।

वेदशास्त्रादिमीमांसी । गुरु आम्हांसी देणार ॥ २४२ ॥

गुरुपासोनि सर्व ज्ञान । त्रयमूर्ति होती आम्हां अधीन ।

आमुचा देव गुरुचि जाण । अन्यथा नाहीं आपणासी ॥ २४३ ॥

सर्व देव सर्व तीर्थ । गुरुचि आम्हां असे सत्य ।

त्याचेनि आम्हां परमार्थ । केवीं दूर असे सांग ॥ २४४ ॥

समस्त योगी सिद्धजन । गुरुवांचूनि नाही ज्ञान ।

ज्ञान होतांचि ईश्र्वर आपण । केवीं दूर असे सांग मज ॥ २४५ ॥

जो वर द्याल तुम्ही मज । श्रीगुरु देतां काय चोज ।

याकारणें श्रीगुरुराज । भजतसें परियेसा ॥ २४६ ॥

संतोषोनि महाविष्णु । म्हणे धन्य धन्य माझा प्राणु ।

तूंचि शिष्य शिरोरत्न । भोळा भक्त तूंचि माझा ॥ २४७ ॥

कांहीं तरी माग आतां । वर देईन सर्वथा ।

विश्र्वनाथ आला होता । दुसरेन आलों आपण देखा ॥ २४८ ॥

आमचे मन संतोषी । वर माग जो तुझे मानसीं ।

आम्ही जाहलों तुज वशी । जें पाहिजे तें देऊं आतां ॥ २४९ ॥

दीपक म्हणे विष्णूसी । जरी वर आम्हां देसी ।

गुरुभक्ति होय अधिक मानसीं । तैसें ज्ञान आणिक द्यावें ॥ २५० ॥

गुरुस्वरुप आपण ओळखें । तैसे ज्ञान देईं सुखें ।

यापरतें न मागें आणिकें । म्हणोनि चरणीं लागला ॥ २५१ ॥

दिधला वर शार्ङगपाणी । संतोषोनि बोले वाणी ।

ऐके दीपक शिष्यशिरोमणि । माझा प्राणसखा होसी ॥ २५२ ॥

तुवा ओळखिलें गुरुसी । देखिलें दृष्टीं परब्रह्मासी ।

आणीक जरी आम्हां पुससी । सांगेन ऐक एकचित्तें ॥ २५३ ॥

लौकिक सुबुद्धि असे जैशी । धर्माधर्मसुमनेसी ।

उत्कृष्टाहूनि उत्कृष्टेसीं । स्तुति करीं गा श्रीगुरुतें ॥ २५४ ॥

जे जे समयी श्रीगुरुसी । तूं भक्तीनें स्तुति करिसी ।

तेणें आम्ही होऊं । तेंचि आमुची स्तुति जाण ॥ २५५ ॥

वेद वाचिती साङगेसी । वेदान्त-भाष्य अहर्निशी ।

वाचिती जन भक्तीसीं । आम्हां पावे निर्धारीं ॥ २५६ ॥

बोलती वेद सिद्धांत । गुरुचि ब्रह्म ऐसें म्हणत ।

याचिकारणें गुरु भजतां । सर्व देव तुज वश्य ॥ २५७ ॥

‘ गुरु ‘ म्हणजे अक्षरें दोन । अमृताचा समुद्र जाण ।

तयामध्यें बुडतांचि क्षण । केवीं होय परियेसा ॥ २५८ ॥

जयाचे हृदयीं श्रीगुरुस्मरण । तोचि त्रैलोक्यपूज्य जाण ।

अमृतपान सदा सगुण । तोचि शिष्य अमर होय ॥ २५९ ॥

यदा मम शिवस्यापि ब्रह्मणो ब्राह्मणस्य हि ।

अनुग्रहो भवेन्नृणां सेव्यते सद्गुरुस्तदा ॥ २६० ॥

आपण अथवा ईश्र्वरु । ब्रह्मा देत जो का वरु ।

फलप्राप्ति होय गुरु । गुरु त्रिमूर्ति याचिकारणें ॥ २६१ ॥

ऐसा वर दीपकासी । दिधला विष्णूनें परियेसीं ।

ब्रह्मा सांगतसे कलीसी । एकचित्तें परियेसा ॥ २६२ ॥

वर लाधोनियां दीपक । गेला गुरुचे सन्मुख ।

पुसतसे गुरु ऐक । तया शिष्या दीपकासी ॥ २६३ ॥

ऐक शिष्या कुळदीपका । काय दिधलें विनायकें ।

विस्तारोनि सांगे निकें । माझें मन स्थिर होय ॥ २६४ ॥

दीपक म्हणे गुरुसी । वर दिधला हृषीकेशीं ।

म्यां मागितलें ऐसी । गुरुभक्ति व्हावी म्हणोनि ॥ २६५ ॥

गुरुची सेवा तत्परेसीं । अंतःकरणीं दृढ शुद्ध ऐशी ।

वर दिधला संतोषीं । दृढभक्ति तुमचे चरणीं ॥ २६६ ॥

संतोषोनि तो गुरु । प्रसन्न झाला साक्षात्कारु ।

जीविते होय तूं स्थिरु । काशीपुरीं वास करीं ॥ २६७ ॥

तुझे वाक्यें सर्वसिद्धि । तुझे द्वारीं नवनिधि ।

विश्र्वनाथ तुझे स्वाधी । म्हणे गुरु संतोषें ॥ २६८ ॥

तुझे स्मरण जे करिती । त्यांचे कष्ट निवारण होती ।

श्रियायुक्त ते नांदती । तुझ्या स्मरणमात्रेसीं ॥ २६९ ॥

येणेपरी शिष्यासी । प्रसन्न झाला परियेसीं ।

दिव्यदेह तत्क्षणेसीं । झाला गुरु वेदधर्म ॥ २७० ॥

शिष्याचा पहावया वासु । कुष्ठी झाला होता क्लेशु ।

तो तापसी अतिविेशेषु । त्यासी कैंचें पाप राहे ॥ २७१ ॥

लोकानुग्रह करावयासी । गेला होता पुरी काशीं ।

काशीक्षेत्रमहिमा आहे ऐसी । पाप जाय सहस्त्रजन्मींचे ॥ २७२ ॥

तया काशीनगरांतु । धर्म अथवा अधर्म-रतु ।

वास करिती नर क्वचितु । पुनर्जन्म नाहीं जाणा ॥ २७३ ॥

सूत म्हणे ऋषीश्र्वरासी । येणेंपरी कलीसी ।

सांगे ब्रह्मा परियेसीं । शिष्यदीपकआख्यान ॥ २७४ ॥

सिद्ध म्हणे नामकरणी । दृढ मन असावें याचिगुणीं ।

तरीच तरेल भवार्णी । गुरुभक्ति असे ॥ २७५ ॥

यत्र यत्र दृढा भक्तिर्यदा यस्य महात्मनः ।

तत्र तत्र महादेवः प्रकाशमुपगच्छति ॥ २७६ ॥

दृढ भक्ति असे जयापाशीं । त्रिकरणसह मानसीं ।

तोचि लाधे ईश्र्वरासी । ईश्र्वर होय तया वश्य ॥ २७७ ॥

गंगाधराचा नंदनु । करीतसे श्रोतयां नमनु ।

न म्हणावें न्यून-पूर्ण । माझे बोबडे बोलांसी ॥ २७८ ॥

इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने

सिद्धनामधारकसंवादे शिष्यदीपकाख्याने नाम द्वितीयोऽध्यायः ॥

श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥

इस अध्याय में, हम देखते हैं कि कैसे एक बहुत ही बीमार व्यक्ति को गुरु के दर्शन से सभी रोगों से मुक्ति मिलती है। वह व्यक्ति बहुत बीमार था और वह अपने रोग से बहुत दुःखी था। एक दिन, वह व्यक्ति गुरु से मिला और उनसे मदद मांगी। गुरु ने उस व्यक्ति को बताया कि वह उसे सभी रोगों से मुक्ति दिला देंगे। गुरु ने उस व्यक्ति को अपने चरणों में समर्पण करने और उनके दर्शन प्राप्त करने का प्रयास करने की सलाह दी। उस व्यक्ति ने गुरु की आज्ञा का पालन किया और गुरु के दर्शन प्राप्त किए। गुरु के दर्शन से उस व्यक्ति के सभी रोग नष्ट हो गए और वह स्वस्थ हो गया।

श्री गुरु चरित्र के सभी अध्याय