गुरुचरित्र अध्याय पचास
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
सिद्ध म्हणे नामधारका । पुढें अपूर्व झालें ऐका ।
पूर्वी रजक-कथानका । तूंतें आपण निरोपिलें ॥ १ ॥
त्याणें मागितला वरु । राज्यपद धुरंधरु ।
प्रसन्न झाले त्यासी श्रीगुरु । दिधला वर परियेसा ॥ २ ॥
उपजला तो म्लेंच्छयातींत । विदुरानगरीं राज्य करीत ।
पुत्रपौत्रीं अनेक रीतींत । महानंदे परियेसा ॥ ३ ॥
ऐसा राजा तो यवन । होता आपण संतोषोन ।
अश्र्व गज अपार धन । पायभारा मिति नाही ॥ ४ ॥
आपण तरी यातिहीन । पुण्यवासना अंतःकरण ।
दानधर्म करी जाण । समस्त यातीं एकोभावें ॥ ५ ॥
विशेष भक्ति विप्रांवरी । असे पूर्व संस्कारीं ।
असतीं देवालयें भूमिवरी । उपद्रव नेदी तयांसी ॥ ६ ॥
त्याचे घरचे पुरोहित । तया रायासी शिकवीत ।
आपण होऊन म्लेंच्छ यात । देवद्विजां निंदावें ॥ ७ ॥
त्यातें तुम्ही सेवा करितां । त्याणें अपार दोष प्राप्ता ।
यातिधर्म करणें मुख्यता । पुण्य अपार असे जाणा ॥ ८ ॥
मंदमति द्विजयाती । देखा पाषाणपूजा करिती ।
समस्तांते देव म्हणती । काष्ठवृक्षपाषाणासी ॥ ९ ॥
धेनूसी म्हणती देव । म्हणती देव अग्नि सूर्य ।
तीर्थयात्रा नदीतोय । समस्तां देव म्हणती देखा ॥ १० ॥
ऐसे विप्र मंदमती । निराकारा साकार म्हणती ।
त्यांतें म्लेंच्छ जे भजती । अधोगति पावती ते ॥ ११ ॥
ऐसे यवन पुरोहित । रायापुढें सांगती हित ।
ऐकोनि राजा उत्तर देत । कोपेंकरुनि परियेसा ॥ १२ ॥
राजा म्हणे पुरोहितांसी । तुम्हीं निरोपिलें आम्हांसी ।
अणुरेणुतृणकाष्ठेंसी । सर्वेश्र्वर पूर्ण असे ॥ १३ ॥
समस्त सृष्टि ईश्र्वराची । स्थावर जंगम रचिली साची ।
सर्वत्रासि देव एकचि । तर्कभेद असे मतांचे ॥ १४ ॥
समस्त यातींची उत्पत्ति । जाणावी तुम्ही पंचभूतीं ।
पृथ्वी आप तेज वायु रीती । आकाशापासाव परियेसा ॥ १५ ॥
समस्तांसी पृथ्वी एक । आणिती मृत्तिका कुलाल लोक ।
नानापरीची करिती ऐक । भांडीं भेद परोपरी ॥ १६ ॥
नानापरीच्या धेनु असती । क्षीर एकचि वर्ण दिसे श्र्वेती ।
सुवर्ण जाणा तयाच रीतीं । परोपरीचे अलंकार ॥ १७ ॥
तैसे देह भिन्न जाणा । परमात्मा एकचि पूर्ण ।
जैसा चंद्र एकचि गगनीं । नाना घटीं दिसतसे ॥ १८ ॥
दीप असतां एक घरी । लाविती वाती सहस्त्र जरी ।
समस्त होती दिपावरी । भिन्नभाव कोठें असे ॥ १९ ॥
एकचि सूत्र आणोनि । नानापरीचें ओविती मणि ।
एकचि सूत्र जाणोनि । न पहावा भाव भिन्न ॥ २० ॥
तैशा याति नानापरी । असती जाणा वसुंधरी ।
समस्तांसी एकचि हरि । भिन्न भाव करुं नये ॥ २१ ॥
आणिक तुम्ही म्हणाल ऐसें । पूजिती पाषाण देवासरिसे ।
सर्वां ठायीं पूर्ण भासे । विश्र्वात्मा तो एकचि ॥ २२ ॥
प्रतिमापूजा स्वल्पबुद्धि । म्हणोनि सांगताति प्रसिद्धीं ।
आत्माराम पूजा विधीं । त्यांचे मतीं ऐसें असे ॥ २३ ॥
स्थिर नव्हे अंतःकरण । म्हणोनि करिती प्रतिमा खूण ।
नाम ठेवोनि ‘ नारायण ‘ । तया नामें पूजिताति ॥ २४ ॥
त्यांते तुम्हीं निंदा करितां । तरी सर्वां ठायीं परिपूर्ण म्हणतां ।
प्रतिष्ठावया आपुल्या मता । द्वेष आम्हीं कां करावा ॥ २५ ॥
याकारणें ज्ञानवंतीं । करुं नये निंदास्तुति ।
असती नानापरीच्या याती । आपुले रहाटी रहाटती ॥ २६ ॥
ऐशापरी पुरोहितांसी । सांगे राजा विस्तारेंसीं ।
करी पुण्य बहुवसी । विश्र्वास देवद्विजांवरी ॥ २७ ॥
राजा देखा येणेंपरी । होता तया विदुरानगरीं ।
पुढें त्याचे मांडीवरी । स्फोटक एक उद्भवला ॥ २८ ॥
नानापरीचे वैद्य येती । तया स्फोटका लेप करिती ।
शमन नोहे कवणे रीतीं । महादुःखें कष्टतसे ॥ २९ ॥
ऐसें असतां वर्तमानीं । श्रीगुरु होते गाणगाभुवनीं ।
विचार करिती आपुले मनीं । राजा येईल म्हणोनियां ॥ ३० ॥
येथें येती म्लेंच्छ लोक । होईल द्विजां उपबाधक ।
प्रकट जाहलों आतां ऐक । येथें आम्हीं असूं नये ॥ ३१ ॥
प्रकट जहाली महिमा ख्याति । पहावया येती म्लेंच्छ याति ।
आतां आम्हीं रहावें गुप्ती । लौकिकार्थ परियेसा ॥ ३२ ॥
आलें ईश्र्वरनाम संवत्सरु । सिंहराशीं आला असे गुरु ।
गौतमी तीर्थ असे थोरु । यात्राप्रसंगें जावें आता ॥ ३३ ॥
म्हणती समस्त शिष्यांसी । करा आयती वेगेंसीं ।
येतो राजा बोलवावयासी । जावें त्वरित गंगेला ॥ ३४ ॥
ऐकोनि म्हणती शिष्यजन । विचार करिती आपणांत आपण ।
जरी येईल राजा यवन । केवीं होय म्हणताति ॥ ३५ ॥
ऐसें मनीं विचारिती । काय होईल पहावें म्हणती ।
असे नृसिंहसरस्वती । तोचि रक्षील आम्हांसी ॥ ३६ ॥
येणेंपरी श्रीगुरुमूर्ति । होते गाणगापुरीं ख्याति ।
राजा यवना जाहली मति । पूर्वसंस्कारें परियेसा ॥ ३७ ॥
स्फोटकाच्या दुःखें राजा । अपार कष्टला सहजा ।
नानापरीचीं औषधें निजा । करितां तया न होय बरवें ॥ ३८ ॥
मग मनीं विचार करी । स्फोटकें व्यापिलें अपरांपरी ।
वैद्याचेनि नव्हे दूरी । काय करणें म्हणतसे ॥ ३९ ॥
बोलावूनि विप्रांसी । पुसे काय उपाव यासी ।
विप्र म्हणती रायासी । सांगो ऐका एकचित्तें ॥ ४० ॥
पूर्वजन्म पाप करितां । व्याधिरुप होऊनि पीडितां ।
दानधर्म द्यावें तीर्था । व्याधि जाय परियेसी ॥ ४१ ॥
अथवा भल्या सत्पुरुषासी । भजावें आपण भावेंसीं ।
त्याचे दृष्टिसुधारसीं । बरवें होय परियेसा ॥ ४२ ॥
सत्पुरुषाचे कृपादृष्टीं । पापें जातीं जन्म साठी ।
मग कैचा रोग पोटीं । स्फोटकादि त्वरित जाय ॥ ४३ ॥
ऐकोनियां विप्रवचन । राजा करीतसे नमन ।
मातें तुम्ही न म्हणा यवन । दास आपण विप्रांचा ॥ ४४ ॥
पूर्वापार जन्मीं आपण । केली सेवा श्रीगुरुचरण ।
पापास्तव जन्मलों जाण । यवनाचे कुळीं देखा ॥ ४५ ॥
एखादा पूर्ववृत्तांत । मातें निरोपावा त्वरित ।
महानुभावदर्शन होतां । कवणाचा रोग गेला असे ॥ ४६ ॥
रायाचें वचन ऐकोनि । विचार करिती विप्र मनीं ।
सांगू नये इये स्थानीं । एकांतस्थळ पाहिजे ॥ ४७ ॥
तुम्ही राजे म्लेंच्छयाती । समस्त तुम्हां निंदा करिती ।
आम्ही असों द्विजयाती । केवीं सांगणें म्हणताति ॥ ४८ ॥
विप्रवचन ऐकोन । विनवीतसे तो यवन ।
चाड नाहीं यातीवीण । आपणास तुम्ही उद्धरावें ॥ ४९ ॥
ऐसें रायाचें मन । अनुतप्त जहालें असे जाण ।
मग निरोपिती ते ब्राह्मण । तया रायासी परियेसा ॥ ५० ॥
विप्र म्हणती रायासी । स्थान बरवें पापविनाशी ।
जावें तुम्ही सहजेसीं । विनोदार्थ परियेसा ॥ ५१ ॥
तेथें स्थळ असे बरवें । एकांतस्थान पहावें ।
स्नान करावें मनोभावें । एकचित्तें परियेसा ॥ ५२ ॥
ऐकोनिया विप्रवचन । संतोषला राजा आपण ।
निघाला त्वरित तेथोन । पापविनाश तीर्थासी ॥ ५३ ॥
समस्तांतें राहवूनि । एकला गेला तयास्थानीं ।
स्नान करितां तत्क्षणीं । आला एक यति तेथें ॥ ५४ ॥
राजा देखोनि तयासी । नमन केलें भावेंसीं ।
दावीतसे स्फोटकासी । म्हणे उपशमन केवीं होय ॥ ५५ ॥
ऐकोनि तयाचें वचन । सांगता झाला तो विस्तारोन ।
महानुभावाचें होता दर्शन । तुज बरवें होईल ॥ ५६ ॥
पूर्वी याचे आख्यान । सांगेन ऐक विस्तारोन ।
एकचित्त करुनि मन । ऐक म्हणती तये वेळी ॥ ५७ ॥
अवंती म्हणिजे थोर नगरीं । होता एक दुराचारी ।
जन्मोनियां विप्रउदरीं । अन्योन्य रहाटतसे ॥ ५८ ॥
आपण असे मदोन्मत्त । सकळ स्त्रियांसवें रमत ।
संध्यास्नान केले त्यक्त । अन्यमार्गे रहाटतसे ॥ ५९ ॥
ऐसा दुराचारीपणें । रहाटत होता तो ब्राह्मण ।
पिंगला म्हणजे वेश्या जाण । तयेसवें वर्तत असे ॥ ६० ॥
न करी कर्म संध्यास्नान । रात्रंदिवस वेश्यागमन ।
तिचे घरींचें भक्षी अन्न । येणेंपरी नष्टला असे ॥ ६१ ॥
ऐसें असतां वर्तमानीं । ब्राह्मण होता वेश्यासदनीं ।
तेथें आला एक मुनि । ‘ ऋषभ ‘ नामा महायोगी ॥ ६२ ॥
तया देखोनि दोघेंजण । करिती साष्टांगीं नमन ।
भक्तिभावेंकरुन । घेऊनि आलीं मंदिरांत ॥ ६३ ॥
बसों घालिती पीठ बरें । पूजाकरिती षोडशोपचारें ।
अर्घ्यपाद्य देवोनि पुढारें । गंधाक्षता लाविताति ॥ ६४ ॥
नानापरिमळ पुष्पजाती । तया योगियासी पूजिती ।
परिमळ द्रव्य अनेक रीतीं । वाहिलें तया योगेश्र्वरा ॥ ६५ ॥
चरणतीर्थ धरुन । पान करिती दोघेजण ।
त्यासी करविती भोजन । नानापरी पक्वानेसीं ॥ ६६ ॥
करवूनियां भोजन । केलें हस्तप्रक्षालन ।
बरवा पलंग आणोन । देती तया योगियासी ॥ ६७ ॥
तयावरी केलें शयन । तांबूल देती आणोन ।
करिती पादसेवन । भक्तिभावें दोघेजण ॥ ६८ ॥
निद्रिस्त झाला योगेश्र्वर । दोघें करिती नमस्कार ।
उभें राहोनि चारी प्रहर । सेवा केली भावेंसीं ॥ ६९ ॥
उदय झाला दिनकरासी । संतोषला तो तापसी ।
निरोप घेऊनि संतोषी । गेला आपुल्या स्थानासी ॥ ७० ॥
ऐसें विप्रें वेश्याघरीं । क्रमिले क्वचित् दिवसवरी ।
प्राय गेली त्याचे शरीरीं । वृद्धाप्य जाहलें तयासी ॥ ७१ ॥
पुढें तया विप्रासी । मरण आलें परियेसी ।
पिंगला नाम वेश्येसी । दोघे पंचत्व पावली ॥ ७२ ॥
पूर्वकर्मानुबंधेसीं । जन्म झाला राजवंशी ।
दशार्णवाधिपतीच्या कुशीं । वज्रबाहूचे उदरांत ॥ ७३ ॥
तया वज्रबाहूची पत्नी । नाम तिचें असे ‘ सुमती ‘ ।
जन्म जाहला तिचे पोटीं । तोचि विप्र परियेसा ॥ ७४ ॥
तया वज्रबाहूसी । ज्येष्ठ राणी-गर्भेसी ।
उद्भवला विप्र परियेसीं । राजा समारंभ करीतसे ॥ ७५ ॥
देखोनियां तिचे सवतीसी । क्रोध आला बहुवसीं ।
गर्भ झाला सपत्नीसी । म्हणोनि धरिला द्वेष मनीं ॥ ७६ ॥
सर्पगरळ आणोनि । दिल्हें सवतीस नानायत्नीं ।
गरळ भेदिलें अतिगहनीं । तया राया-ज्येष्ठस्त्रियेसी ॥ ७७ ॥
दैवयोगे न ये मरण । भेदिलें विष महादारुण ।
सर्व शरीरीं झाले व्रण । महाकष्ट भोगीतसे ॥ ७८ ॥
ऐशापरी राजपत्नी । झाली प्रसूत बहुकष्टेनीं ।
उपजतां बाळाचे तनीं । सर्वांगी व्रण मातासुतासी ॥ ७९ ॥
महाक्लेशीं पीडित । सर्वांगीं स्फोटक बहुत ।
रात्रंदिवस आक्रंदत । कष्टत होती परियेसा ॥ ८० ॥
विष व्यापिलें सर्वांगासी । म्हणोनि आक्रंदती दिवानिशीं ।
दुःख करी राजा क्लेशी । म्हणे काय करुं आतां ॥ ८१ ॥
देशोदेशींच्या वैद्यांसी । बोलाविती चिकित्सेसी ।
वेंचिती द्रव्य अपारेंसीं । कांही केलिया नव्हे बरवें ॥ ८२ ॥
तिथे माता-बाळकांसी । व्रण झाले बहुवसीं ।
निद्रा नाही दिवानिशीं । सर्वांगीं कृमि पडले जाणा ॥ ८३ ॥
त्यांते देखोनि रायासी । दुःख झालें बहुवसीं ।
निद्रा नाही दिवानिशीं । त्यांचे कष्ट देखोनियां ॥ ८४ ॥
व्यथेंकरुनि मातासुत । शरीर सर्व कृश होत ।
अन्न उदक नवचे क्वचित । क्षीण जाहलीं येणेंपरी ॥ ८५ ॥
राजा येऊनि एके दिवशीं । पाहे आपुले स्त्री-सुतासी ।
देखोनियां महाक्लेशी । दुःख करी परियेसा ॥ ८६ ॥
म्हणे आतां काय करुं । केवीं करणें प्रतिकारु ।
नाना औषध विचारु । करितां स्वस्थ नव्हेचि ॥ ८७ ॥
स्त्रीपुत्रासी ऐशी गति । जिवंत शव झालीं असतीं ।
यांते नव्हे बरवें निश्र्चितीं । केवीं पाहूं म्हणतसे ॥ ८८ ॥
आतां यांसी पहावयासी । कंटाळा येतो आम्हांसी ।
बरवें नव्हे सत्य यासी । काय करणें म्हणतसे ॥ ८९ ॥
यांतें देखतां आम्हांसी । व्रण लागती देहासी ।
हे असती महादोषी । यांतें त्यजूं म्हणतसे ॥ ९० ॥
जे असती पापीजन । त्यांतें जीवित्व अथवा मरण ।
जहाले देहा न सुटे पाप आपण । भोगल्यावांचोनि परियेसा ॥ ९१ ॥
विचार करुनि मानसीं । बोलावोनि कोळियासी ।
सांगतसे विस्तारेसीं । ऐका श्रोते एकचित्तें ॥ ९२ ॥
राजा म्हणे दूतासी । माझे बोल परियेसीं ।
नेऊनि आपुले स्त्री-पुत्रांसी । अरण्यांत टाकावीं ॥ ९३ ॥
मनुष्यांचा संचार । जेथे नसेल विचार ।
तेथें ठेवी वेगवक्त्र । म्हणे राजा स्त्री-सुतांसी ॥ ९४ ॥
येणेंपरी दूतासी । राजा सांगे विस्तारेंसीं ।
रथ दिधला संजोगेंसी । घेऊनि निघाला झडकरी ॥ ९५ ॥
तिचे दासदासी सकळ । दुःख करिती महा प्रबळ ।
माता पिता बंधु कुळ । समस्त प्रलाप करिताति ॥ ९६ ॥
दुःख करिती नगर-नारी । हा हा पापी दुराचारी ।
स्त्री-पुत्रांसी कैसा मारी । केवीं यातें राना पाठवितो ॥ ९७ ॥
रथावरी बैसवोनि । घेऊनि गेला महारानीं ।
जेथें नसे मनुष्य कोणी । तेथें ठेविलीं परियेसा ॥ ९८ ॥
दूत आला परतोन । सांगे रायासी विस्तारोन ।
महारण्य होतें वन । तेथें ठेविलीं म्हणतसे ॥ ९९ ॥
ऐकोनि राजा संतोषला । दुसरे स्त्रियेसी सांगता झाला ।
दोघांसी आनंद जाहला । वनीं राहिले मातासुत ॥ १०० ॥
मातासुत दोघेजण । पीडताति महाव्रणें ।
कष्टती अन्नोदकावीण । महारण्य वनांत ॥ १०१ ॥
राजपत्नी सुकुमार । तयावरी रोग थोर ।
चालूं न शके, रान घोर । महाकंटक भूमीसी ॥ १०२ ॥
कडिये घेवोनि बाळकासी । जातसे मंदमंद गमनेंसीं ।
आठवी आपुले कर्मासी । म्हणे आतां काय करुं ॥ १०३ ॥
तया वनीं मृगजाति । व्याघ्र सिंह दिसताति ।
सर्प थोर अपरिमिति । हिंडताति वनांतरीं ॥ १०४ ॥
म्हणे मातें व्याघ्र कां न मारी । पुरें मातें आतां संसारी ।
ऐसी पापिणी मी थोरी । वांचोनि काय कामासी ॥ १०५ ॥
म्हणोनि जाय पुढतीं पुढतीं । क्षणक्षणा असे पडती ।
पुत्रासहित चिंता करीती । जातसे वनांत ॥ १०६ ॥
उदकाविणें तृषाक्रांत । देहव्रणें असे पीडित ।
व्याघ्रसर्पांते देखत । भयचकित होतसे ॥ १०७ ॥
देखे वेताळ ब्रह्मराक्षस । कोल्हीं भालुवा परियेस ।
केश मोकळे आपणांस । पाय-मोकळें जातसे ॥ १०८ ॥
ऐसी महारण्यांत । राजस्त्री असे हिंडत ।
पुढें जातां देखिला पंथ । गुरें चरती रानांत ॥ १०९ ॥
तयांपाशीं जावोनि । पुसतसे करुणावचनीं ।
गोरक्षकांतें विनवोनि । मागे उदक कुमारकासी ॥ ११० ॥
गोरक्षक म्हणती तियेसी । जावें तुवां मंदिरासी ।
तेथें उदक बहुवसी । अन्नही तूंतें मिळेल ॥ १११ ॥
म्हणोनि मार्ग दाखविती । हळूंहळूं जाय म्हणती ।
राजपत्नी मार्ग क्रमिती । गेली तया ग्रामासी ॥ ११२ ॥
तया ग्रामीं नरनारी । दिसताति अपरांपरी ।
देखोनि झाली मनोहरी । पुसतसे स्त्रियांसी ॥ ११३ ॥
म्हणे येथें कवण राजा । संतोषी दिसती समस्त प्रजा ।
ऐकोनि सांगती वैश्यराजा । महाधनिक पुण्यवंत ॥ ११४ ॥
याचें नांव ‘ पद्माकर ‘ । पुण्यवंत असे नर ।
तूंतें रक्षील अपार । म्हणोनि सांगती तियेसी ॥ ११५ ॥
इतुकिया अवसरीं । तया वैश्याचिया घरीं ।
दासी होती मनोहरी । तीही आली तियेजवळी ॥ ११६ ॥
येवोनि पुसे ती वृतांत्त । घेवोनि गेली मंदिरांत ।
आपल्या स्वामीसी सांगत । आद्यंत विस्तारेंसी ॥ ११७ ॥
देखोनियां वैश्यनाथ । कृपा करी अत्यंत ।
नेली आपुल्या मंदिरांत । दिधलें एक गृह तिसी ॥ ११८ ॥
पुसोनियां वृत्तांत । वाणिज्य जाहला कृपावंत ।
दिल्हें अन्नवस्त्र बहुत । नित्य तिसी रक्षीतसे ॥ ११९ ॥
ऐसी तया वैश्याघरीं । होती रायाची अंतुरी ।
वर्धतसे पीडा भारी । व्रण न वचे परितेसा ॥ १२० ॥
येणेंपरी राजसती । तया वैश्या घरीं होती ।
वाढिन्नले व्रण सुतीं । प्राणांतक होतसे ॥ १२१ ॥
वर्ततां ऐसें एके दिवसीं । प्राण गेला कुमरकासी ।
प्रलाप करी बहुवसी । राजपत्नी परियेसा ॥ १२२ ॥
मूर्छा येऊनि तये क्षणी । राजपत्नी पडे धरणीं ।
आपुलें पूर्व आठवोनि । महाशोक करीतसे ॥ १२३ ॥
तया वाणिज्य-स्त्रिया देखा । संबोखिताति तये बाळिका ।
कवणेंपरी तिचे दुःखा । शमन नव्हे परियेसा ॥ १२४ ॥
नानापरी दुःख करी । आठवीतसे पूर्वापरी ।
म्हणे ताता माझ्या शौरी । कोठें गेलासी बाळका ॥ १२५ ॥
राजकुळीं पूर्णचंद्र । माझा तूं आनंदवर्ध ।
मातें सांडूनि जातां बोध । काय तूंतें बरवें असे ॥ १२६ ॥
मातापिताबंधुजना । सोडोनि आल्यें, माझ्या प्राणा ।
तुझा भरंवसा होता जाण । मज रक्षिसी म्हणोनि ॥ १२७ ॥
मातें अनाथ करुनि । तूं जातोसि सोडोन ।
आतां मज रक्षिल कवण । प्राण त्यजीन म्हणतसे ॥ १२८ ॥
येणेंपरी राजपत्नी ऐका । शोक करी महादुःखा ।
देखोनियां नगर लोक । दुःख करिती परियेसा ॥ १२९ ॥
समस्त दुःखाहुनी । पुत्रशोक महा वन्हि ।
मातापित्यांतें दाहोनि । भस्म करी परियेसा ॥ १३० ॥
येणेंपरी दुःख करितां । ऋषभ योगी आला त्वरिता ।
पूर्वजन्मींच्या उपकारार्था । पातला तेथें महाज्ञानी ॥ १३१ ॥
योगीशातें देखोनि । वंदिता झाला तो वाणी ।
अर्घ्यपाद्य देवोनि । पूजा केली उपचारें ॥ १३२ ॥
तया समयीं योगीश्र्वर । पुसे कवण दीर्घस्वर ।
शोक करीतसे अपार । कवण असे म्हणतसे ॥ १३३ ॥
सविस्तरें वाणी योगियातें । सांगता झाला वृत्तांत ।
योगीश्र्वर कृपावंत । आला तिये जवळिके ॥ १३४ ॥
म्हणे योगी तियेसी । मूढपणें दुःख करिसी ।
कवण जन्मला भूमीसी । कवण मेला सांग मज ॥ १३५ ॥
देह म्हणजे अदृश्य जाण । जैसा गंगेंत दिसे फेण ।
व्यक्तअव्यक्त सवेंचि होणें । जलीं बुदबुद परियेसा ॥ १३६ ॥
पृथ्वी तेज वायु आप । आकाश मिळोनि शरीर व्याप ।
पंच संयुक्त शरीररुप । दिसतसे परियेसा ॥ १३७ ॥
पांच भूतें पांचा ठायीं । मिळोनि जातां शून्य पाहीं ।
दुःख करितां अवकाश नाहीं । वाया कां वो दुःख करिसी ॥ १३८ ॥
रेतापासोनि उत्पत्ति भूतें । निजकर्में होय निरुतें ।
काळनाथ आकर्षत । वासनेपरी तयां जाणा ॥ १३९ ॥
मायेपासोनि माया उपजे । होय गुण सत्तव रज ।
तमोगुण तेथें सहज । देहलक्षण येणेंपरी ॥ १४० ॥
तीन गुणांपासाव । उपजती मनुष्यभाव ।
सत्त्वगुण असे देव । रजोगुणें मनुष्य जाण ॥ १४१ ॥
तामस तोचि राक्षस । जैसा कां गुण वसे ।
तैसा पिंड जन्म भासे । कधीं स्थिर नव्हेचि ॥ १४२ ॥
या संसार वर्तमानीं । उपजती नर कर्मानुगुणीं ।
जैसे आर्जव असे पूर्वगुणीं । सुखदुःख तैसे घडे ॥ १४३ ॥
कल्पकोटि वर्षांवरी । जिवंत असती सुर जरी ।
तेही न राहती स्थिरी । मनुष्यांचा काय पाड ॥ १४४ ॥
याकारणें ज्ञानीजन । उपजतां न होती संतोषमन ।
जरी मेलिया दुःख न करणें । स्थिर नव्हे देह जाणा ॥ १४५ ॥
गर्भ संभवे जिये वेळीं । नाश म्हणोनि जाणिजे सकळीं ।
कोणी मरती यौवनकाळीं । क्वचिद्वार्धक्यपणीं जाण ॥ १४६ ॥
जैसें कर्म पूर्वार्जित । तेणें परी असे घडत ।
मायामोहें पिता सुत । म्हणती देखा नरदेहीं ॥ १४७ ॥
जैसें लिखित ललाटेसी । ब्रह्मदेव लिही परियेसीं ।
कालकर्म-उल्लंघनासी । शक्ति नव्हे कवणा जाणा ॥ १४८ ॥
ऐसें अनित्य शरीरासी । कां वो माते दुःख करिसी ।
तुझें पूर्वापर कैसी । सांग मज म्हणतसे ॥ १४९ ॥
तुझे जन्मांतरीं जाणा । कवणाची होतीस अंगना ।
किंवा झालीस जननी कवणा । कवण सुताची सांग मज ॥ १५० ॥
ऐसें जाणोनियां मानसीं । वायां कां वो दुःख करिसी ।
जरी बरवें तूं इच्छिसी । शरण जाईं शंकरा ॥ १५१ ॥
ऐसें ऐकोनि राजपत्नी । करी योगियासी विनंति ।
आपणासी जाहली ऐसी गति । राज्यभ्रष्ट होऊनि आल्यें ॥ १५२ ॥
मातापिता बंधुजना । सोडोनि आल्यें मी राना ।
पुत्र होता माझा प्राण । भरवंसा मज तयाचा ॥ १५३ ॥
तया जाहली ऐशी गति । वांचोनि आपण काय प्रीति ।
मरण व्हावें मज निश्र्चिती । म्हणोनि चरणीं लागली ॥ १५४ ॥
ऐसें निर्वाण देखोनि । कृपा उपजे योगियामनीं ।
पूर्व उपकार स्मरोनि । प्रसन्न जाहला तये वेळीं ॥ १५५ ॥
भस्म काढूनि तये वेळीं । लाविलें प्रेताचे कपाळीं ।
घालितां त्याचे मुखकमळीं । प्राण आला परियेसा ॥ १५६ ॥
बाळक बैसलें उठोनि । सर्वांग झालें सुवर्णवर्णी ।
माता सुत दोघे जणी । व्रण गेले तात्काळी ॥ १५७ ॥
राजपत्नी पुत्रासहित । करी योगियासी दंडवत ।
ऋषभयोगी कृपावंत । आणिक भस्म प्रोक्षीतसे ॥ १५८ ॥
तात्काळिक दोघेजणासी । शरीर झालें सूर्यसंकाशी ।
शोभायमान दिसे ती कैसी । दिव्य देह उभय वर्ग ॥ १५९ ॥
प्रसन्न झाला योगेश्र्वरु । तये वेळीं दिधला वरु ।
तुम्हां नव्हे कधीं जरु । प्रायरुप चिरंजीव ॥ १६० ॥
तुझा सुत भद्रायुषी । कीर्तिवंत होईल परियेसीं ।
राज्य करील बहुवसी । पित्याहून अधिक जाणा ॥ १६१ ॥
ऐसा प्रसन्न होऊनि । योगी गेला तत्क्षणीं ।
ऐक राया एकोमनीं । सत्पुरुषाचें संनिधान ॥ १६२ ॥
सत्पुरुषाची सेवा करितां । तुझा स्फोटक जाईल त्वरिता ।
आतां न करीं चिंता । दृढ धरीं भाव एक ॥ १६३ ॥
ऐसें राजा ऐकोनि । नमन करी तये क्षणीं ।
विनवीतसे कर जोडूनि । कोठें असे सत्पुरुष ॥ १६४ ॥
मातें निरोपावें आतां । जाईन आपण तेथें त्वरिता ।
त्याचें चरण दर्शन होतां । होईल बरवें म्हणतसे ॥ १६५ ॥
ऐकोनि रायाचें वचन । सांगतसे मुनि आपण ।
भीमातीरीं गाणगाभुवन । असे तेथें परमपुरुष ॥ १६६ ॥
तयापाशीं तुवां जावें । दर्शनमात्रें होईल बरवें ।
ऐकोनि राजा एकोभावें । निघता झाला तये वेळीं ॥ १६७ ॥
एकोभावें राजा आपण । निघाला श्रीगुरुदर्शना ।
प्रयाणांतरी करी प्रयाण । आला गाणगापुरासी ॥ १६८ ॥
ग्रामीं पुसे सकळिकांसी । ऐकों येथें एक तापसी ।
रुप धरी संन्यासी । कोठें आहे म्हणोनियां ॥ १६९ ॥
भयाभीत झालें सकळिक । म्हणती आतां नव्हे निकें ।
श्रीगुरुसी पुसतो ऐक । काय करील न कळे म्हणती ॥ १७० ॥
कोणी न बोलती तयासी । राजा कोपला बहुवसीं ।
म्हणे आलों भेटीसी । दाखवा आपणासी म्हणतसे ॥ १७१ ॥
मग म्हणती समस्त लोक । अनुष्ठानस्थानीं असती निक ।
अमरजासंगमीं माध्याह्निक । करोनि ग्रामीं येताति ॥ १७२ ॥
ऐसें ऐकोनि म्लेंच्छ देखा । समस्तां वर्जूनि आपण एका ।
बैसोनियां आंदोलिका । गेला तया स्थानासी ॥ १७३ ॥
दुरोनि देखतां श्रीगुरुसी । चरणीं चाले म्लेंच्छ परियेंसी ।
जवळी गेला पहावयासी । नमन करुनि उभा राहे ॥ १७४ ॥
श्रीगुरु म्हणती तयासी । कां रे रजका कोठें अससी ।
बहुत दिवसां भेटलासी । आमचा दास होवोनियां ॥ १७५ ॥
ऐसें वचन ऐकोनि । म्लेंच्छ झाला महाज्ञानी ।
पूर्वजन्म स्मरला मनीं । करी साष्टांगी नमस्कार ॥ १७६ ॥
पादुकांवरी लोळे आपण । सद्गदित अंतःकरण ।
अंगीं रोमांचळ उठोन । आनंदबाष्पें रुदन करी ॥ १७७ ॥
पूर्वजन्म आठवोन देखा । रोदन करी अति दुःखा ।
कर जोडूनि विनवी ऐका । नानापरी स्तोत्र करी ॥ १७८ ॥
राजा म्हणे श्रीगुरुसी । कां उपेक्षिलें आम्हांसी ।
झालों आपण परदेशी । चरणावेगळें केलें मज ॥ १७९ ॥
अंधकारसागरांत । मज घातलें कां कूपांत ।
होऊनि मी मदोन्मत्त । विसरलों चरण तुझे ॥ १८० ॥
संसारसागरमायाजाळ । बुडालों आपण दुर्मति केवळ ।
सेवा न करीं श्रीचरणकमळ । दिवांध आपण जाहलों ॥ १८१ ॥
होतासि तूं जवळी निधान । नोळखों आम्ही मतिहीन ।
तमांधकारीं वेष्ठोन । चरण विसरलों आपण तुझे ॥ १८२ ॥
तूं भक्तजनां नुपेक्षिसी । निर्धार होतो माझे मानसीं ।
अज्ञानसागरीं आम्हांसी । कां घातलें स्वामिया ॥ १८३ ॥
उद्धरावें आतां मज । आलों आपण याचि काज ।
होवोनि तुझे चरणरज । असेन आतां जन्म पुरे ॥ १८४ ॥
ऐसें नानापरी देखा । स्तुति केली रायें ऐका ।
श्रीगुरु म्हणती भक्त निका । तुझ्या वासना पुरतील ॥ १८५ ॥
राजा म्हणे श्रीगुरुसी । राजस्फोट आपणासी ।
व्यथा होतसे प्रयासी । कृपादृष्टीनें पहावें ॥ १८६ ॥
ऐसें वचन ऐकोन । श्रीगुरु करिती हास्यवदन ।
स्फोटक नाहीं दाखवीं म्हणोन । पुसताती यवनासी ॥ १८७ ॥
राजा पाहे स्फोटकासी । न दिसे स्फोटक अंगासरसी ।
विस्मय करीतसे मानसीं । पुनरपि चरणीं माथा ठेवी ॥ १८८ ॥
राजा म्हणे स्वामियासी । तुझें प्रसन्नत्व आम्हांसी ।
राज्य पावलों मी संतोषी । अष्टैश्र्वर्य भोगिलें ॥ १८९ ॥
पुत्रपौत्र देखिले नयनीं । जहालों पूर्ण अंतःकरणी ।
आतां असे एक मनीं । ऐश्र्वर्य माझें अवलोकावें ॥ १९० ॥
भक्तवत्सल ब्रीद तुझें । वासना पुरवावी माझी ।
इंद्रियसंसार उतरोनि ओझें । लीन होईन तुझें चरणीं ॥ १९१ ॥
श्रीगुरु म्हणती तयासी । आम्ही तापसी संन्यासी ।
येऊं नये तुझे नगरासी । महापातकें होती तेथें ॥ १९२ ॥
नगरीं नित्य धेनुहत्या । यवनयाति तुम्ही सत्या ।
जीवहिंसा पापकृत्या । वर्जावें आतां निर्धारें ॥ १९३ ॥
सर्व अंगीकार करोनि । राजा लागे दोन्ही चरणीं ।
म्हणे मी दास पुरायनीं । पूर्वांतरीं दृष्टि देणें ॥ १९४ ॥
पूर्व माझा जन्म रजक । स्वामीवचनें राज्य विशेष ।
पावोनि देखिलें नाना सुख । उणें एक म्लेंच्छजाति ॥ १९५ ॥
दर्शन होतां तुझे चरण । संतुष्ट झाले अंतःकरण ।
पुत्रपौत्र दृष्टीनें पाहणें । मग मी राहीन तुझे सेवे ॥ १९६ ॥
ऐसें नानापरी देखा । राजा विनवी विशेखा ।
पायां पडे क्षणक्षणिका । अतिकाकुळती येतसे ॥ १९७ ॥
श्रीगुरु मनीं विचारती । पुढें होणार असे गति ।
कलियुगीं असे दुर्जनयाति । गौप्य असतां पुढें बरवें ॥ १९८ ॥
सहज जावें सिंहस्थासी । महातीर्थ गौतमीसी ।
जावें आतां भरंवसीं । येथोनिया गौप्य व्हावें ॥ १९९ ॥
ऐसें मनीं विचारुनि । श्रीगुरु निघाले संगमाहूनि ।
राजा आपुले सुखासनीं । बैसवी प्रीतीकरुनियां ॥ २०० ॥
पादुका घेतल्या आपुले करीं । सांगातें येतसे चरणचारी ।
श्रीगुरु म्हणती आरोहण करी । लोक निंदा तुज करिती ॥ २०१ ॥
राष्ट्राधिपति तुज म्हणती । जन्म तुझा म्लेंच्छयातीं ।
ब्राह्मणसेवें तुज हांसती । जाति दूषण करितील ॥ २०२ ॥
राजा म्हणे स्वामी ऐक । कैंचा राजा मी रजक ।
तुझे दृष्टीं असे निक । लोह सुवर्ण होतसे ॥ २०३ ॥
समस्तांसी राजा आपण सत्य । परि रजक मी गा तुझा भक्त ।
पूर्ण झाले मनोरथ । तुझें दर्शन झालें मज ॥ २०४ ॥
इतुकिया अवसरीं । समस्त मिळाले दळ भारी ।
मदोन्मत्त असती कुंजरी । वारु नाना वर्णांचे ॥ २०५ ॥
उभा राहोनि राजा देखा । समस्त दाखवी सैन्यका ।
संतोषोनि अति हर्षका । आपुलें ऐश्र्वर्य दावीतसे ॥ २०६ ॥
श्रीगुरु निरोपिती यवनासी । आरोहण करी वारुवेसी ।
दूरी जावें नगरासी । निरोप आमुचा नको मोडूं ॥ २०७ ॥
श्रीगुरुवचन ऐकोन । समस्त शिष्यांतें आरोहण ।
देता झाला तो यवन । आपण वाजीं आरुढला ॥ २०८ ॥
आनंद बहु यवनाचे मनीं । हर्षनिर्भर न माये गगनीं ।
श्रीगुरुभेटी झाली म्हणोनि । अत्योल्हास करीतसे ॥ २०९ ॥
श्रीगुरु बोलती यवनासी । म्हणती जाहलों अतिसंतोषी ।
तुवां भक्ति केलियासी । संतोषलों आपण आजि ॥ २१० ॥
आम्ही संन्यासी तापसी । नित्य करावें अनुष्ठानासी ।
तुम्हांसमागमें मार्गासी । न घडे वेळ संधीसमयो ॥ २११ ॥
यासी उपाय सांगेन । अंगीकारीं तूं ज्ञानें ।
पुढें जाऊं आम्ही गहन । स्थिर यावें तुम्ही मागें ॥ २१२ ॥
पापविनाशी तीर्थासी । भेटी होईल तुम्हांसी ।
ऐसें म्हणोनि रायासी । अदृश्य झाले श्रीगुरुमूर्ति ॥ २१३ ॥
समस्त शिष्यांसमवेत । श्रीगुरु गौप्य झाले त्वरित ।
मनोवेगें मार्ग क्रमीत । गेले विदुरानगरासी ॥ २१४ ॥
पापविनाशी तीर्थासी । श्रीगुरु पातले त्वरितेंसी ।
राहिले तेथें अनुष्ठानासी । समस्त येती भेटीतें ॥ २१५ ॥
साखरे सायंदेवाचा सुत । आला भेटीस नागनाथ ।
नानापरी पूजा करीत । समाराधना आरंभिली ॥ २१६ ॥
नेऊनियां आपुले घरा । पूजा केली षोडशोपचारा ।
आरती करी एक सहस्त्र । समाराधना केली बहुत ॥ २१७ ॥
इतुकें होतां झाली निशी । श्रीगुरु म्हणती नागनाथासी ।
सांगोनि म्लेंच्छासी । पापविनाशीं भेटों म्हणोनि ॥ २१८ ॥
जावें आम्हीं तया स्थानासी । येथें राहतां परियेसीं ।
उपद्रव होईल ब्राह्मणांसी । विप्रगृहा म्लेंच्छ येतां ॥ २१९ ॥
ऐसें सांगोनि आपण । गेले पापविनाशीं जाण ।
बैसोनियां शुभासन । अनुष्ठान करीत होते ॥ २२० ॥
इतुकिया अवसरीं । राजा इकडे काय करी ।
श्रीगुरु न दिसती दळभारीं । म्हणोनि चिंता करीतसे ॥ २२१ ॥
म्हणे कटकटा काय झालें । श्रीगुरुनाथें मज उपेक्षिलें ।
काय माझी चुकी देखिली । म्हणोनि गेले निघोनियां ॥ २२२ ॥
मागुती मनीं विचारी । पुढें जातों म्हणोनि येरी ।
पापविनाशतीर्थातीरी । भेटीं देवो म्हणती मज ॥ २२३ ॥
न कळे महिमा श्रीगुरुचा । कवण जाणती अंत त्याचा ।
दैव बरवें होतें आमुचें । चरणदर्शन झालें आजि ॥ २२४ ॥
राजस्फोटक होता मज । आलों होतों याचि काज ।
कृपानिधि श्रीगुरुराज । भेटी झाली पुण्य माझें ॥ २२५ ॥
पुढें गेले हें निश्र्चित । म्हणोनि निघाला त्वरित ।
दिव्य वारुवरी आरुढत । निघाला शीघ्र परियेसा ॥ २२६ ॥
चतुश्र्चत्वारि क्रोश देखा । राजा पातला दिवसें एका ।
पापविनाशीं तीर्था निका । अवलोकीतसे श्रीगुरुसी ॥ २२७ ॥
विस्मय करी अति मानसीं । येऊनि लागला चरणासी ।
विनवीतसे भक्तीसीं । गृहाप्रति यावें म्हणतसे ॥ २२८ ॥
नगर सर्व श्रृंगारिलें । प्रवाळ-मोतींतोरण केलें ।
गुडिया मखर बांधविलें । समारंभ करी नगरांत ॥ २२९ ॥
बैसवोनियां पालखींत । आपण चरणचालीं चालत ।
नवरत्नें असे ओंवाळीत । नगर लोक आरत्या आणिती ॥ २३० ॥
ऐशा समारंभे राजा देखा । घेऊनि गेला श्रीगुरुनायका ।
विस्मय करिती सकळिक । महदाश्र्चर्य म्हणताति ॥ २३१ ॥
लोक म्हणती म्लेंच्छयाति । पहा हो विप्रपूजा करिती ।
राजा अनाचारी म्हणती । जातिधर्म सांडिला आजि ॥ २३२ ॥
ज्याचें पाहूं नये मुख । त्याची सेवा करितो हरिखें ।
राजा नष्ट म्हणोनि सकळिक । म्लेंच्छयाति बोलती ॥ २३३ ॥
विप्रकुळ समस्त देखा । संतोष करिती अतिहरुषा ।
राजा झाला विप्रसवेक । आतां बरवें राज्यासी ॥ २३४ ॥
ऐसा राजा असतां बरवें । ज्ञानवंत असे स्वभावें ।
ब्रह्मद्वेषी नव्हे पहा वो । पुण्यश्र्लोक म्हणती तयासी ॥ २३५ ॥
नगरलोक पहावया येती । नमन करिती अतिप्रीतीं ।
राजे चरण चालती । लोक म्हणती आश्र्चर्य ॥ २३६ ॥
एक म्हणती हा होय देव । म्हणोनि भजतो म्लेंच्छराव ।
या कलियुगीं अभिनव । देखिलें म्हणती सकळिक ॥ २३७ ॥
सवें वाजंत्र्यांचे गजर । बंदीजन वाखाणिती अपार ।
राजा आपण हर्षनिर्भर । घेऊनि जातो श्रीगुरुसी ॥ २३८ ॥
नानापरी दिव्यवस्त्रें । द्रव्य ओंवाळी अमितें ।
टाकीतसे राजा तेथें । भिक्षुक तुष्तले बहुत देखा ॥ २३९ ॥
ऐशा समारंभें देखा । घेऊनि गेला राजा ऐका ।
महाद्वारा पातला सुखा । पायघडी आंथुरती ॥ २४० ॥
नानापरेंचीं दिव्यांबरे । मार्गी आंथुरिती पवित्र ।
वाजती भेरी वाजंतरे । राजगृहा पातले ॥ २४१ ॥
महासिंहासनस्थानीं । श्रृंगार केला अतिगहनीं ।
जगद्गुरुतें नेऊनि । सिंहासनीं बैसविलें ॥ २४२ ॥
समस्त लोक बाहेर ठेवोन । श्रीगुरु गेले एकले आपण ।
सवें शिष्य चवघेजण । जवळी होते परियेसा ॥ २४३ ॥
अंतःपुरींचे कुलस्त्रियांसी । पुत्रपौत्र सहोदरांसी ।
भेटविले राजें परियेसीं । साष्टांगीं नमस्कारिती ॥ २४४ ॥
राजा विनवी स्वामियासी । पौष्ये देखिलें चरणांसी ।
न्याहाळावें कृपादृष्टीसीं । म्हणोनि चरणा लागला ॥ २४५ ॥
संतोषले श्रीगुरुमूर्ति । त्यासी आशीर्वाद देती ।
राजयातें बोलाविती । पुसताति गृहवार्ता ॥ २४६ ॥
श्रीगुरु म्हणती रायासी । संतुष्ट झालास कीं मानसीं ।
अजूनि व्हावें की भाविसी । विस्तारोनि सांग म्हणती ॥ २४७ ॥
राजा विनवी स्वामियासी । अंतर पडलें श्रीचरणांसी ।
राज्य केलें बहुवसीं । आतां द्यावी चरणसेवा ॥ २४८ ॥
ऐसें ऐकोनि श्रीगुरु म्हणती । आमुची भेटी श्रीपर्वती ।
तुझे पुत्र राज्य करिती । तुवां यावें भेटीसी ॥ २४९ ॥
ऐसा निरोप देऊनि । श्रीगुरु निघाले तेथोनि ।
राजा विनवी चरण धरोनि । ज्ञान मजला असावे ॥ २५० ॥
कृपासिंधु श्रीगुरुनाथ । ज्ञान होईल ऐसें म्हणत ।
आपण निघाले त्वरित । गेले गौतमी-यात्रेसी ॥ २५१ ॥
स्नान करोनि गौतमीसी । आले गाणगापुरासी ।
आनंद झाला समस्तांसी । श्रीगुरुचरणदर्शनें ॥ २५२ ॥
संतोषी जाहले समस्त लोक । पाहों येती कौतुक ।
वंदिताति सकळिक । आरति करिती मनोभावें ॥ २५३ ॥
समस्त शिष्यांते बोलाविती । श्रीगुरु त्यांसी निरोपिती ।
प्रगट झाली बहु ख्याति । आतां रहावें गौप्य आम्हीं ॥ २५४ ॥
यात्रारुपें श्रीपर्वतासी । निघालों आतां परियेसीं ।
प्रगट बोल हाचि स्वभावेंसीं । गौप्यरुपें राहूं येथेंचि ॥ २५५ ॥
स्थान आमुचें गाणगापुर । येथून न वचों निर्धार ।
लौकिकमतें अवधारा । बोल करितों श्रीशैलयात्रा ॥ २५६ ॥
प्रगट निघों यात्रेसी । वास निरंतर गाणगाभुवनासी ।
भक्तजन तारावयासी । राहूं आम्ही निरंतर ॥ २५७ ॥
कठिण दिवस युगधर्म । म्लेंच्छराज्य क्रूरकर्म ।
प्रगट असतां घडे अधर्म । समस्त म्लेंच्छ येथें येती ॥ २५८ ॥
राजा आला म्हणोनि । ऐकिलें जाती यवनीं ।
सकळ येतील मनकामनी । म्हणोनि गौप्य राहों आतां ॥ २५९ ॥
ऐसें म्हणोनि शिष्यांते । सांगते झाले श्रीगुरुनाथ ।
सिद्ध सांगे नामधारकाप्रत । चरित्र ऐसें श्रीगुरुचें ॥ २६० ॥
पुढें येतील दुर्दिन । कारण राज्य यवन ।
समस्त येतील करावया भजन । म्हणोनि गौप्य राहों आतां ॥ २६१ ॥
लोकिकार्थ दाखवावयासी । निघाले आपण श्रीशैल्यासी ।
कथा असे अति विशेषी । सिद्ध म्हणे नामधारका ॥ २६२ ॥
गंगाधराचा सुत । सरस्वती असे विनवीत ।
प्रत्यक्ष असे श्रीगुरुनाथ । देखिला आम्ही दृष्टांत गाणगापुरीं ॥ २६३ ॥
जे भजतील भक्तजन । त्यांच्या पुरतील मनकामना ।
संदेह न धरावा अनुमान । त्वरित सिद्धि असे जाणा ॥ २६४ ॥
न लागतां कष्ट सायासी । अप्रयासें काम्यवशी ।
त्वरित जावें गाणगापुरासी । कल्पवृक्ष तेथें असे ॥ २६५ ॥
जें जें कल्पितील फळ । त्वरित पावतील सकळ ।
धनधान्यादि पुत्रफळ । शीघ्र पावतील निर्धारें ॥ २६६ ॥
सिद्ध म्हणे नामधारकासी । हें गुरुचरित्र दिनीं निशीं ।
मनोभावें वाचनेंसीं । सकळ कामना पुरतील ॥ २६७ ॥
॥ इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ
श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे
सार्वभौमस्फोटकशमनऐश्र्वर्यावलोलोकनं
नाम पंचाशत्तमोऽध्यायः ॥
श्रीगुरुदत्तात्रेर्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥