GuruCharitra.in

Guru Charitra Adhyay 32 | गुरुचरित्र अध्याय बत्तीस

गुरुचरित्र अध्याय 32 में बताया गया है कि कैसे गुरु ने एक मृत वैद्य को जीवनदान दिया। यह अध्याय हमें सिखाता है कि गुरु के लिए कुछ भी असंभव नहीं है। हमें गुरु के चरणों में समर्पण करना चाहिए और उनकी कृपा प्राप्त करने का प्रयास करना चाहिए। इस अध्याय में, हम देखते हैं कि कैसे एक वैद्य की मृत्यु हो जाती है। वैद्य एक बहुत ही अच्छा वैद्य था और वह सभी लोगों की निस्वार्थ भाव से सेवा करता था। वैद्य की मृत्यु से सभी लोग बहुत दुखी हुए। वैद्य के शिष्य गुरु के पास गए और उनसे मदद मांगी। गुरु ने वैद्य के शिष्यों को बताया कि वह वैद्य को जीवनदान दे देंगे। गुरु ने वैद्य के शरीर पर अपनी कृपा की और वैद्य को पुनर्जीवित कर दिया।

श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः ।

पतिव्रतेचि आचाररीति । सांगे देवांसी बृहस्पति ।

सहगमन केलिया फळश्रुति । येणेंपरि निरोपिला ॥ १ ।।

विधवापणाचा आचारु । सांगता झाला देवगुरु ।

पुसती देव ऋषेश्र्वरु । ऐका श्रोते एकचित्तें ॥ २ ॥


जवळी नसतां आपुला पति । त्यातें जाहली असेल मृत्युप्राप्ति ।

काय करावें त्याचे सतीं । केवीं करावें सहगमन ॥ ३ ॥


अथवा असेल गरोदरी । असे तान्हा कुमारकुमरी ।

काय करावें तैसिये नारीं । म्हणूनि विनवीती गुरुसी ॥ ४ ॥


ऐकोनि देवांचें वचन । सांगता झाला विस्तारोन ।

एकचित्त करुनि मन । ऐका श्रोते सकळिक ॥ ५ ॥


पति जवळी असतां जरी । सहगमना जावें तये नारीं ।

असेल आपण गरोदरी । करुं नये सहगमन ॥ ६ ॥


स्तनपानी असेल कुमर । तिणें करितां पाप थोर ।

पुरुष मेला असेल दूर । सहगमन करुं नये ॥ ७ ॥


तिणें असणें विधवापणे । विधिपूर्वक आचरणें ।

सहगमनासमान असे पुण्य । एक चित्तें परियेसा ॥ ८ ॥


विधवापणाचा आचार । करितां असे पुण्य थोर ।

निवर्ततां आपुला भ्रतार । केशवपन करावें ॥ ९ ॥


ज्या कां विधवा नारी केश राखिती । त्याची ऐका फलश्रुती ।

तिचे केश पुरुषा बांधिती । नरकाप्रती नेती जाणा ॥ १० ॥


याकारणें वपन । करावें तिणें नित्य स्नान ।

एक वेळ भोजन । करावें तिणें परियेसा ॥ ११ ॥


एक धान्याचे अन्न । करावें तिणें भोजन ।

तीन दिवसां उपोषण । करावें तिणें भक्तिनें ॥ १२ ॥


पांच दिवसां पक्ष-मासीं । करावें तिणें उपोषणासी ।

अथवा चांद्रायणग्रासीं । भोजन करणें परियेसा ॥ १३ ॥


चंद्रोदय बीजेसी । एक ग्रास तया दिवसीं ।

चढत घ्यावें पंधरा ग्रासीं । पौर्णिमेसी भोजन ॥ १४ ॥


कृष्णपक्षीं येणेपरी । ग्रास घ्यावें उतरत नारी ।

अमावास्या येतां जरी । एक ग्रास जेवावें ॥ १५ ॥


शक्ति नाहीं वृद्धाप्येसीं । एकान्न जेवावें परियेसीं ।

अथवा फल-आहारेसीं । अथवा शाकाहार देखा ॥ १६ ॥


अथवा घ्यावें क्षीर मात्र । अधिक न घ्यावें पवित्र ।

जेणें राहे प्राणमात्र । श्र्वासोच्छ्वास चाले ऐसे ॥ १७ ॥


शयन करी मंचकावरी । पुरुषा घाली रौरव घोरीं ।

भोगी नरक निरंतरी । पतीसहित परियेसा ॥ १८ ॥


करुं नये मंगलस्नान । अथवा देहमर्दन ।

गंध परिमळ तांबूल जाण । पुष्पादि तिणें वर्जावें ॥ १९ ॥


पुत्रावीण असेल नारी । करणें तर्पण पुत्रापरी ।

तीळ-दर्भ-कुशाधारीं । गोत्र नाम उच्चारावें ॥ २० ॥


विष्णुपूजा करावी नित्य । आपुला पुरुष हाचि म्हणत ।

पुरुषरुप आठवी चित्त । विष्णुस्थानीं आरोपिजे ॥ २१ ॥


पुरुष असतां जेणेंपरी । पतिनिरोपें आचार करी ।

तेणेचि रीतीं विष्णु अवधारीं । त्याचे निरोपे आचरावें ॥ २२ ॥


तीर्थयात्रा-उपावासव्रत । विष्णुनिरोपें करणें पवित्र ।

अथवा गुरु द्विज असत । त्यांचे निरोपें करावें ॥ २३ ॥


आपण असतां सुवासिनी । जे जे प्रीति अंतःकरणीं ।

तैशीं वस्तु द्यावी झणी । विद्वद् ब्राह्मण पूजोनियां ॥ २४ ॥


वैशाख-माघ-कार्तिकमास । असे आचार विशेष ।

माघस्नान तीर्थास । विष्णुस्मरणें करावें ॥ २५ ॥


वैशाखी जळकुंभदान । कार्तिकी दीपाराधन ।

घृतदान द्यावें ब्राह्मणां । यथानुशक्त्या दक्षिणेसीं ॥ २६ ॥


माघमासीं तिळघृतेसी । दान द्यावें ब्राह्मणासी ।

वैशाखमासीं अरण्यासी । पोई घालिजे निर्मळोदकें ॥ २७ ॥


शिवालयीं ईश्र्वरावरी । गळती ठेविजे निर्मळ वारीं ।

गंध परिमळ पूजा करी । अनंत पुण्य असे देखा ॥ २८ ॥


ब्राह्मणाचे घरोघरीं । उदक घालिजे शक्त्यनुसारीं ।

अन्न द्यावें अवधारीं । अतिथिकाळीं विद्वज्जना ॥ २९ ॥


तीर्थयात्रे जात्यां लोकां । त्यातें द्याव्या छत्रपादुका ।

येतील आपुले गृहातिका । पादप्रक्षालन करावें ॥ ३० ॥


वारा घालिजे विंझणेसीं । द्यावें वस्त्र परिधानेसीं ।

गंध तांबूल परिमळेसीं । कर्पूरविडा परियेसा ॥ ३१ ॥


जलपात्र द्यावें शक्तीसीं । गुड-आम्लपानकेसीं ।

द्राक्ष-कर्दळी-फळेसी । ब्राह्मणा द्यावें मनोहर ॥ ३२ ॥


जें जें दान देतां द्विजां । आपुले पतीच्या नामीं सहजा ।

संकल्प करावा पुरुषकाजा । धर्म करणें येणेंपरी ॥ ३३ ॥


कार्तिकमासीं जवाचे अन्न । अथवा जेविजे एकान्न ।

वृतांक सेवगा सुरण । तैलादि मधु वर्जावें ॥ ३४ ॥


न जेवावें कांस्यपात्रेसीं । त्यजावें द्विदाळिक समस्ती ।

मनीं असावें पवित्र । एकमास परियेसा ॥ ३५ ॥


पलाशपात्री भोजन करणे । मग करणें उद्यापन ।

जें जें व्रत धरी आपण । तेणेंपरी परियेसा ॥ ३६ ॥


घृत भरुन कास्यपात्र । विप्रा द्यावें मनोरथ ।

भूमिशयन केलें व्रत । मंचक द्यावा ब्राह्मणासी ॥ ३७ ॥


जें जें लक्षण त्यजिलें आपण । समस्त द्यावें तें ब्राह्मणा ।

रसद्रव्य एक महिना । त्यागे करावें परियेसा ॥ ३८ ॥


त्यजूनिया दधि क्षीरा । तेणें उद्यापन करा ।

असेल जरी शक्त्यनुसारा । धेनु द्यावी सालंकृत ॥ ३९ ॥


विशेष असे आणिक व्रत । दीपदान असे ख्यात ।

वर्णितां महिमा अनंत । देवांसी म्हणे बृहस्पति ॥ ४० ॥


दीपदान भाग सोळा । वरकड नव्हती धर्म सकळा ।

याकारणें अनंतफळ । दीपदान करावें ॥ ४१ ॥


माघस्नान माघमासीं । करणें सूर्योदयासी ।

येणेंपरी एक मासीं । आचरावें भक्तीनें ॥ ४२ ॥


लाडू तिळवे खर्जुरेसीं । करुनि पक्वान्नें ब्राह्मणासी ।

द्यावीं तिणें भक्तीसीं । विप्रवर्गा परियेसा ॥ ४३ ॥


शर्करा मिरें एळेसीं । तळून अपूप घृतेसीं ।

दान द्यावें यतीसी । भोजन द्यावें तापसियातें ॥ ४४ ॥


व्हावया शीतनिवारण । काष्ठें द्यावीं ब्राह्मणा ।

हेमंतऋतु येतां जाण । वस्त्रें द्यावीं द्विजांसी ॥ ४५ ॥


पर्यंक द्यावा सुषुप्तीसी । एकाद्या भल्या ब्राह्मणासी ।

चित्र-रक्तवस्त्रेसी । कंबळ द्यावें विप्रवर्गा ॥ ४६ ॥


व्हावया शीतनिवारण । औषधें द्यावी उष्ण उष्ण ।

तांबूलदान परिपूर्ण । द्यावें एळाकर्पूरेसीं ॥ ४७ ॥


गृहदान द्यावें ब्राह्मणांसी । संवत्सर एक ग्रासेसीं ।

जाती तीर्थवासासी । पादरक्षा घेऊन द्याव्या ॥ ४८ ॥


गंध-परिमळ-पुष्पेसीं । पूजा करावी केशवासी ।

रुद्राभिषेक-विधीसीं । संतोषवावा गौरीहर ॥ ४९ ॥

धूप-दिप-नैवेद्येसीं । पूजा करावी षोडशी ।

प्रीति बहु शंकरासी । दीपमाळा उजळितां ॥ ५० ॥


आपुला पुरुष ध्यावोनि । नारायण तो म्हणोनि ।

पूजा करावी एको मनीं । भक्तिभावें परियेसा ॥ ५१ ॥


नेमें असावें ते नारीं । न बैसावें बैलावरी ।

लेंवू नये चोळी करीं । श्र्वेतवस्त्र नेसावें ॥ ५२ ॥


रक्त-कृष्ण-चित्रवस्त्र । नेसतां जाण दोष बहुत ।

आणिक असे एक व्रत । पुत्राचे बोलें वर्तावें ॥ ५३ ॥


‘ आत्मा वै पुत्र नाम ‘ । म्हणून बोलती वेदागम ।

पतीपासाव पुत्रजन्म । पुत्रअनुज्ञें असावें ॥ ५४ ॥


ऐसा आचार विधवेसी । असे शास्त्रपुराणेसीं ।

जरी आचरती भक्तीसीं । सहगमन केलें फळ असे ॥ ५५ ॥


पापी जरी पति आपुला । असेल पूर्वीं निवर्तला ।

नरकामध्यें वास केला । पापरुपें भुंजत ॥ ५६ ॥


विधवापणें येणेपरी । आचार करी जे नारी ।

मरण होतांचि अवसरीं । पतीसी घेवोनि स्वर्गी जाय ॥ ५७ ॥


येणेंपरी बृहस्पति । सांगे समस्त देवांप्रति ।

लोपामुद्रेची केली स्तुति । पतिव्रताशिरोमणि ॥ ५८ ॥


जितुक्या पतिव्रता नारी । समस्त भागीरथीसरी ।

त्यांचे पुरुष शंकरापरी । पूजा करावी दोघांची ॥ ५९ ॥


ऐसें बृहस्पतीचें वचन । सांगितलें मुनि विस्तारोन ।

ऐक बाळे तुझें मन । ज्यावरी प्रीति तें करीं ॥ ६० ॥


दुःख सकळ त्यजोनि । माझे बोल ठेवीं मनीं ।

सांगितले तुज मार्ग दोनी । परलोकाचें साधन ॥ ६१ ॥


धैर्य असेल आपणासी । करीं सहगमन पतीशीं ।

विधवापणें आचार करिसी । तेंहि पुण्य तितुकेंचि ॥ ६२ ॥


जे आवडी तुझे मनीं । सांगावें विस्तारोनि ।

हस्त मस्तकीं ठेवूनि । पुसतसे प्रेमभावें ॥ ६३ ॥


ऐसें म्हणतां अवसरीं । केलें नमन तिये नारीं ।

विनवीतसे करुणोत्तरीं । भक्तिभावेंकरुनियां ॥ ६४ ॥


जय जया योगीश्र्वरा । तूंचि पिता सहोदरा ।

माझ्या प्राण-मनोहरा । जनक जननी तूंचि होसी ॥ ६५ ॥


आल्यें आपण परदेशांत । जवळी नाही बंधुभ्रात ।

भेटलासि तूं परमार्थ । अंतकाळींचा सोहरा ॥ ६६ ॥


सांगितले आचार दोनी । कष्ट अधिक विधवापणीं ।

अशक्य आम्हां न-टाके स्वामी । अपार असे दातारा ॥ ६७ ॥


तरुण्यपण आपणासी । लावण्य असे या देहासी ।

निंदापवाद शरीरासी । घडेल कलि-वर्तमानीं ॥ ६८ ॥


संतोष होतो माझे मनीं । पुण्य अपार सहगमनी ।

पतीसवें संतोषोनि । जाईन स्वामी निर्धारें ॥ ६९ ॥


म्हणोनि मागुती नमस्कारी । माथा घांसूनि चरण धरी ।

स्वामी मातें तारीं तारीं । भवसागरीं बुडतसे ॥ ७० ॥


करुणाकृपेचा सागर । उठवीतसे योगेश्र्वर ।

देता जाहला अभयकर । म्हणे पतीसवे असावें ॥ ७१ ॥


जोडा होवोनि पुरुषासी । जाय माते संगमासी ।

सांगेन तुज विशेषीं । ऐक माते एकचित्तें ॥ ७२ ॥


आलेति तुम्ही दुरोनि । श्रीगुरुभेटीलागोनि ।

आरोग्य पतीसी व्हावें म्हणोनि । भक्तिभावेंकरुनियां ॥ ७३ ॥


होणार झाली ब्रह्मकरणी । काळासी जिंकिलें नाहीं कोणीं ।

जैसें ईश्र्वर निर्माणी । तेणेंपरी होतसे ॥ ७४ ॥


ब्रह्मलिखित न चुके जाण । जें जें असेल कारण ।

तैसे घडतें श्रुतिवचन । दुःख कोणीं करुं नये ॥ ७५ ॥


हरिश्र्चंद्र राजा देखा । डोंबाघरीं वाहे उदका ।

राजा होता बळी ऐका । तोही गेला पाताळीं ॥ ७६ ॥


सहा कोटि वर्षे ज्यासी । आयुष्य असे रावणासी ।

तोही झाला ग्रास काळासी । दुर्योधना काय जाहलें ॥ ७७ ॥


भीष्मदेवो इच्छामरणी । तोही पडला महारणीं ।

परीक्षिती सर्पाभेणीं । लपतां काय झालें तया ॥ ७८ ॥


अनंत अवतार येणेंपरी । होऊनि गेले संसारीं ।

देव दानव तेणेंपरी । समस्त काळाआधीन ॥ ७९ ॥


याकारणें काळासी । नाही जिंकिलें कोणीं क्षितीसी ।

समस्त देवदानवांसी । काळ जिंकिता निर्धारे ॥ ८० ॥


काळा जिंकिता नाही कोणी । सर्व एक गुरुवांचोनि ।

भाव असे ज्याचे मनीं । त्यासीं प्रत्यक्ष असे जाणा ॥ ८१ ॥


आतां तुम्ही ऐसें करणें । जावें त्वरित सहगमनें ।

अंतःकाळ होतां क्षणें । गुरुदर्शना जाईं माये ॥ ८२ ॥


इतुकें दूर येऊनि । श्रीगुरुचरण पाहें नयनीं ।

मग तेथोनि येऊनि । पतीसवें जाईं म्हणे ॥ ८३ ॥


म्हणोनि भस्म तयेंवेळीं । लाविता झाला कपाळी ।

रुद्राक्ष चारी त्तकाळी । देता जहाला तियेसीं ॥ ८४ ॥


योगेश्र्वर म्हणती तियेसी । रुद्राक्ष बांधी गळसरीसी ।

दोनी प्रतकर्णासी । बांधोनि दहन करावें ॥ ८५ ॥


आणिक एक सांगेन तुज । गुरुदर्शना जासी सहज ।

रुद्रसूक्त म्हणती द्विज । श्रीगुरुचरण प्रक्षाळितां ॥ ८६ ॥


तेंचि तीर्थ घेवोनि । आपुले देहीं प्रोक्षोनि ।

प्रेतावरी आणोनि । प्रोक्षण करी भक्तीनें ॥ ८७ ॥


मग जावें सहगमनीं । वाणें द्यावीं सुवासिनीं ।

अनेक द्रवें वेंचूनि । ब्राह्मणमुखीं अर्पावें ॥ ८८ ॥


ऐशापरी तियेसी । सांगोनि गेला तो तापसी ।

पतिव्रता भावेंसीं । करी आयती तये वेळीं ॥ ८९ ॥


भले विप्र बोलावूनि । प्रेता प्रायश्र्चित देवोनि ।

षोडश कर्म आचरोनि । औपासन करविताति ॥ ९० ॥


सुस्नात होऊनि आपण । पीतांबर नेसोन ।

सर्वाभरणें लेवोन । हळदी कुंकुम लावीतसे ॥ ९१ ॥


औपासन प्रेतासी । करविताति विधीसीं ।

प्रेत बांधोनि काष्टेसीं । घेऊनि गेले गंगेत ॥ ९२ ॥


अग्नि घेऊनि तळहातेसीं । निघाली पतिव्रता कैसी ।

आनंद बहु मानसीं । प्रेतापुढें जातसे ॥ ९३ ॥


सोळा वरुषें तारुण्यपण । सुंदर रुप लावण्य ।

ल्याइली असे आभरणें । लक्ष्मीसारखी दिसतसे ॥ ९४ ॥


मिळोनियां नगरनारी । पहावया आल्या सहस्त्र चारी ।

माथा तुकिती सुरवरी । पतिव्रता पाहोनियां ॥ ९५ ॥


एक म्हणती काय नवल । पूर्ववयेसीं असे बाळ ।

काय दैव पूर्वफळ । पतिसमागमें जातसे ॥ ९६ ॥


देखिलें नाहीं पतीचे सुख । नाहीं जहालें बाळ एक ।

कैसा जीव झाला ऐक्य । आनमदरुपें जातसे ॥ ९७ ॥


एक म्हणती शिकवा इसी । वायां कां वो जीव देसी ।

परतूनि जाईं माहेरासी । आपुले मातापित्याजवळी ॥ ९८ ॥


एक म्हणती ज्ञानवंता । सत्य नारी पतिव्रता ।

बुद्धि दे गा जगन्नाथा । समस्त स्त्रियांसी ऐसीच ॥ ९९ ॥


धन्य इचीं मातापिता । बेचाळीस उद्धरील आतां ।

प्रेतापुढें असें जातां । एकेक पाउला अश्र्वमेधफळ ॥ १०० ॥


येणेंपरी नदीसी । गेली नारी पतीसरसीं ।

कुंड केलें अग्नीसीं । काष्टें शेणी अपरिमित ॥ १०१ ॥


अग्निकुंडसंनिधेसीं । ठेविलें तया प्रेतासी ।

बोलावोनि सुवासिनींसी । देती झाली वाणें देखा ॥ १०२ ॥


सुपें चोळी कुंकुमेसीं । हळदी काजळ परियेसीं ।

तोड-कंठसूत्रेसीं । सुवासिनींसी देतसे ॥ १०३ ॥


गंधपुष्प-परिमळेसीं । पूजा केली सुवासिनींसी ।

द्रव्य दे ती अपारेसी । समस्त ब्राह्मणां तये वेळीं ॥ १०४ ॥


नमन करुनि समस्तांसी । निरोप मागतसे हर्षी ।

आपण जात्यें माहेरासी । लोभ असो द्यावा म्हणतसे ॥ १०५ ॥


माझा पिता शूलपाणि । माता गौरी अंतःकरणीं ।

आम्हां बोलाविलें सगुणीं । प्रेमभावेंकरुनियां ॥ १०६ ॥


आला सण दिपवाळी । आम्ही जातों मातेजवळी ।

पतीसहित मन निर्मळीं । जात्यें लोभ असों द्यावा ॥ १०७ ॥


समागमी लोक आपुले । होते जे कां सवें आले ।

त्यांसी सांगतसे बोलें । जावें परतोनि ग्रामासी ॥ १०८ ॥


पुसतां श्र्वशुरमामीसी । त्यांतें तुम्हीं न सांगावें ऐसी ।

प्राण देतील आम्हांसरसी । वंशहत्या तुम्हां घडेल ॥ १०९ ॥


त्यांसी तुंम्हीं म्हणावें ऐसें । क्षेम आहेति तीर्थवासें ।

भीमातीर स्थान असे । श्रीगुरुचें संनिधानीं ॥ ११० ॥


आल्यें श्रीगुरुदर्शनासी । आरोग्य झालें पतीसी ।

राहिलीं आपुले संतोषीं । म्हणोनि सांगा आमुचे घरीं ॥ १११ ॥


ऐसें सासूश्र्वशुरासी । तैसेंचि आमुचे मातापित्यासी ।

इष्ट-जन-सोइरियांसी । सांगा येणेंपरी तुम्ही ॥ ११२ ॥


ऐसें वचन ऐकोन । दुःख करिती सकळ जन ।

आपण असे हास्यवदन । प्रेताजवळी उभी देखा ॥ ११३ ॥


अग्निकुंडीं तत्क्षणीं । घलिताति काष्ठें शेणी ।

तों आठवण झाली तिचे मनीं । योगेश्र्वराचा उपदेश ॥ ११४ ॥


रुद्राक्ष काढोनियां दोनी । बांधीतसे प्रेतश्रवणीं ।

कंठसूत्री ठेवूनि दोनी । पसतसे ब्राह्ंमणांसी ॥ ११५ ॥


विनवीतसे द्विजांसी । संकल्प केला मीं मानसीं ।

श्रीगुरुमूर्ति आहे कैशी । आपले दृष्टीं पाहीन ॥ ११६ ॥


दर्शन करुनि स्वामीसी । त्वरित येईन अग्निकुंडापाशी ।

आज्ञा झालिया वेगेसीं । त्वरित येईन म्हणतसे ॥ ११७ ॥


ऐकोनि तियेचें वचन । म्हणती समस्त विद्वजन ।

दहना न होतां अस्तमान । त्वरित जाऊनि तुम्हीं यावें ॥ ११८ ॥


पुसोनियां ब्राह्मणांसी । निघाली नारी संगमासी ।

जेथें असे हृषीकेशी । श्रीनृसिंहसरस्वती ॥ ११९ ॥


सवें येती नगरनारी- । सह-ब्राह्मण नानापरी ।

कौतुक पाहती मनोहरी । पतिव्रता स्त्रियेचे ॥ १२० ॥


जातां मार्गी स्तोत्र करी । म्हणे स्वामी नरकेसरी ।

अभाग्य आपुलें पूर्वापरी । म्हणोनि आम्हां अव्हेरिलें ॥ १२१ ॥


तूंचि दाता सर्वेश्र्वर । शरणांगता आधार ।

ऐसें तुझें ब्रीद थोर । कामीं आपणा न लाधेंचि ॥ १२२ ॥


हेळामात्रें त्रिभुवनासी । रचिसी रजपगुणेसीं ।

सत्वगुणें सृष्टिसी । प्रतिपाळिसी तूंचि स्वामी ॥ १२३ ॥


तमोगुण असे ऐसी । प्रलय समस्त जीवांसी ।

तीनी गुण तूंचि होसी । त्रिमूर्ति तूंचि देवा ॥ १२४ ॥


तुजपाशीं सर्व सिद्धि । वळंगत राहती नवनिधि ।

देखिली आमुची कुडी बुद्धि । म्हणोनि मातें अव्हेरिलें ॥ १२५ ॥


एखादा नर बाधा करी । जावोनि सांगती राजद्वारीं ।

क्षण न लागतां अवसरीं । साह्य करिती तयांचे ॥ १२६ ॥

रोग येतां मनुष्यासी । घेऊनि जाती वैद्यापाशीं ।

औषधें करिती तात्काळेसीं । आरोग्य होय तयांतें ॥ १२७ ॥


तूं त्रैमूर्तीचा अवतार । ख्याति झाली अपरांपर ।

भक्तजनां आधार । म्हणोनि वानिती सकळ जन ॥ १२८ ॥


अपराध आपण काय केले । वीस गांवें भेटीसी आल्यें ।

मातापित्यांते विसरल्यें । तुझ्या ध्यानें स्वामिया ॥ १२९ ॥


होसील तूंचि मातापिता । म्हणोनि आलों गा धांवतां ।

भेटी होतां आरोग्यता । पतीस होईल म्हणोनि ॥ १३० ॥


आपुले समान असती नारी । त्यांसी असती पुत्र कुमरी ।

आपण जाहल्यें दगडापरी । पुत्र नाही आपणांसी ॥ १३१ ॥


पति आपुला सदा रोगी । कैंचा पुत्र आपुले अंगीं ।

म्हणोनि याचि काम्यालागीं । निघोनि आल्यें स्वामिया ॥ १३२ ॥


आरोग्य होईल पतीसी । पुत्र होतील आपणासी ।

आशा धरुनि मानसीं । आल्यें स्वामी कृपासिंधु ॥ १३३ ॥


पुरला माझा मनोरथ । आरोग्य जाहला प्राणनाथ ।

पुत्र जाहले बहुत । नवस जाहला स्वामिया ॥ १३४ ॥


मनोरथ जाहला आम्हांसी । म्हणोनि येत्यें पुसावयासी ।

जाऊं आतां परलोकासी । कीर्ति तुझी घेऊनियां ॥ १३५ ॥


ऐसेपरी ध्यान करीत । आली अमरजासंगमा त्वरित ।

वृक्ष असे अश्र्वत्थ । देखती झाली स्वामियासी ॥ १३६ ॥


उभी ठाकोनियां दुरी । साष्टांगी नमन करी ।

श्रीगुरु म्हणती तये आवसरीं । सुवासिनी होईं ध्रुव ॥ १३७ ॥


ऐसें म्हणतां मागुती । नमन करी एकभक्तीं ।

पुनरपि स्वामी तेणेंच रीतीं । अष्टपुत्री होय म्हणतसे ॥ १३८ ॥


ऐसें वचन ऐकोन । हास्य करिती सकळ जन ।

सांगताति विस्तारोन । श्रीगुरुपाशी तयेवेळी ॥ १३९ ॥


विप्र म्हणती स्वामियासी । इचा पति पंचत्वासी ।

पावला परंधामासी । सुवासिनी केवीं होय ॥ १४० ॥


नेलें प्रेत स्मशानासी । हे आली असे सहगमनासी ।

निरोप घ्यावया तुम्हांपाशी । आली असे स्वामिया ॥ १४१ ॥


तुमचा निरोप घेऊनि । अग्निकुंडा जाऊनि ।

समागमे पतिशयनीं । दहन करणें इयेसी ॥ १४२ ॥


ऐकोनि ब्राह्मणांचे वचन । श्रीगुरु म्हणती हांसोन ।

इचें स्थिर अहेवपण । मरण कैचें घडे इसीं ॥ १४३ ॥


म्हणती श्रीगुरु तये वेळीं । आणा प्रेत आम्हांजवळी ।

प्राण गेला कवणें काळी । पाहूं म्हणती त्या अवसरीं ॥ १४४ ॥


श्रीगुरु म्हणती द्विजांसी । आमुचे वाक्य जाहलें ऐसी ।

अहेवपण स्थिर इयेसी । संदेह न धरा मनांत ॥ १४५ ॥


या बोलाचा निर्धारु । करील आतां कर्पूरगौरु ।

नका प्रेत संस्कारु । आणा म्हणती आपणाजवळी ॥ १४६ ॥


श्रीगुरुचा निरोप होतां । आणूं गेले धांवत ।

लोक कौतुक पहात । अभिनव म्हणती सकळही जन ॥ १४७ ॥


इतुकें होतां अवसरीं । आले तेथें विप्र चारी ।

पूजा करिती मनोहरी । श्रीगुरुची भक्तीनें ॥ १४८ ॥


रुद्रसूक्त म्हणोनि । अभिषेक करिती गुरुचरणीं ।

षोडशोपचार विस्तारोनि । पूजा करिती भक्तीसी ॥ १४९ ॥


तीर्थपूजा नानापरी । पूजा करिती उपचारी ।

इतुकें होतां अवसरीं । घेऊनि आले प्रेतासी ॥ १५० ॥


प्रेत आणोनियां देखा । ठेविलें श्रीगुरुसन्मुखा ।

श्रीगुरु म्हणती विप्रलोकां । सोडा दोर वस्त्र याचें ॥ १५१ ॥


चरणतीर्थ तये वेळीं । देती तयां विप्रांजवळी ।

प्रोक्षा म्हणती तात्काळीं । प्रेत सर्वांगीं स्नपन करा ॥ १५२ ॥


श्रीगुरुनिरोपें ते ब्राह्मण । प्रेतासी करिती तीर्थस्नपन ।

अमृतदृष्टीं श्रीगुरु आपण । पाहती प्रेत सर्वांगीं ॥ १५३ ॥


पाहतां सुधादृष्टीनें । प्रेत जाहलें संजीवन ।

उठोनि बैसला तत्क्षण । अंग मुरडीत परियेसा ॥ १५४ ॥


नग्न म्हणोनि लाजत । प्रेता झालें सर्व चेत ।

नवीं वस्त्रें नेसत । येवोनि कडे बैसला ॥ १५५ ॥


बोलावूनि स्त्रियेसी । पुसतसे विस्तारेसी ।

कोठें आणिलें आपणासी । यतीश्र्वर कवण सांग ॥ १५६ ॥


इतुके लोक आले असतां । कां वो न करसी तूं चेता ।

निद्रा आली मदोन्मत्ता । म्हणोनि पुसे स्त्रियेसी ॥ १५७ ॥


ऐकून पतीचें वचन । सांगती झाली विस्तारुन ।

उभीं राहून दोघेजण । नमन करिती श्रीगुरुसी ॥ १५८ ॥


चरणावरी माथा ठेवून । स्तोत्र करिती दोघेजण ।

पहाती सकळही जन । महानंद प्रवर्तला ॥ १५९ ॥


म्हणती पापरुपी आपण । पाप केलें दारुण ।

पापवासना अनुसंधान । जन्म जाहला स्वामिया ॥ १६० ॥


दुर्बुद्धिने पापीं वर्तलों । पापसागरीं बुडालों ।

तुझें स्मरण विसरलों । त्रयमूर्ति जगद्गुरु ॥ १६१ ॥


समस्त जीवमात्रासी । रक्षिता शंकर तूंचि होसी ।

ख्याति तुझी त्रिभुवनासी । शरणागता रक्षका ॥ १६२ ॥


त्राहि त्राहि जगद्गुरु । विश्र्वमूर्ति परात्परु ।

ब्रह्मा-विष्णु-महेश्र्वरु । सच्चिदानंदस्वरुपा ॥ १६३ ॥


त्राहि त्रहि विश्र्वकर्ता । त्राहि त्राहि जगद्भर्ता ।

कृपासागरा गुरुनाथा । भक्तजनवरप्रदा ॥ १६४ ॥


जय जया गुरुमूर्ति । जटाजूटा पशुपति ।

अवतरलासी तूं क्षितीं । मनुष्यदेह धरुनियां ॥ १६५ ॥


त्राहि त्राहि पिनाकपाणी । त्राहि देवा तूं शिरोमणि ।

भक्तजनां पाळोनि । रक्षितोसि निरंतर ॥ १६६ ॥


सर्वां तूंचि वससी । नमन तुझे चरणांसी ।

मज ऐसा गमलासी । मातारुपी वर्तत ॥ १६७ ॥


विश्र्वकरणी तूंचि करिसी । हेळामात्रें सृष्टि रचिसी ।

मज ऐसा गमलासी । ज्ञानरुपें वर्तत ॥ १६८ ॥


त्रिभुवनीं तुझी करणी । माथा ठेविला तुझे चरणीं ।

निश्र्चय केला माझे मनीं । पुनरपि जन्म नव्हे आतां ॥ १६९ ॥


तुझें नायके एखादा जरी । कोपसी त्वरित तयावरी ।

माझें मनीं येणेंपरि । अकलंकरुप दिसतोसि ॥ १७० ॥


क्रोध नाहीं तुझे मनीं । आनंदमूर्ति तूंचि सगुणी ।

भक्तजनातें करी रक्षणी । कृपासागरा स्वामिया ॥ १७१ ॥


जीवमात्रा कृपा करिसी । शरणागतातें रक्षिसी ।

इहपर सौख्य देसी । चतुर्विध पुरुषार्थ ॥ १७२ ॥


तूंचि कारुण्य-सागरु । चिन्मात्राचा आगरु ।

श्रीनृसिंहसरस्वती गुरु । क्षमा करणें स्वामिया ॥ १७३ ॥


ऐसें नानापरीसी । स्तोत्र केलें श्रीगुरुसी ।

श्रीगुरुमूर्ति संतोषीं । आश्र्वासिती तये वेळीं ॥ १७४ ॥


अष्ट पुत्र पूर्णायुषी । हो कां श्रीमंत अतिहर्षी ।

गेले तुमचे सर्वदोषी । देहांतीं मुक्ति तुम्हां ॥ १७५ ॥


चतुर्विध पुरुषार्थ । लभ्य झाले तुम्हां सत्य ।

सांडोनियां संदेह त्वरित । सुखें असा म्हणती देखा ॥ १७६ ॥


इतुकें होतां अवसरीं । मिळाल्या होत्या नगरनारी ।

जयजयकार अपरांपरी । प्रवर्तला तये वेळीं ॥ १७७ ॥


नमन करिती सकळही जन । स्तोत्र करिती गायन ।

करिताति निरांजन । जयजयकार प्रवर्तला ॥ १७८ ॥


तयांमध्ये विप्र एक । होता कुबुद्धिक ।

याचें गृह होतें नरकीं । म्हणोनि पुसे श्रीगुरुसी ॥ १७९ ॥


विप्र म्हणे श्रीगुरुसी । विनंति स्वामी परियेसीं ।

संशय आमुच्या मानसीं । होतसे स्वामिया ॥ १८० ॥


वेदशास्त्र-पुराण । बोलताति सनातन ।

‘ ब्रह्मलिखित सत्य ‘ जाण । म्हणोनि वाक्य निरंतर ॥ १८१ ॥


घडला नाहीं अपमृत्यु यासी । दिवामरण सुखांतरेसीं ।

त्याचा आला प्राण कैसी । ब्रह्मलिखित सत्य कीं मिथ्या ॥ १८२ ॥


न कळे याच्या अभिप्राया । निरोपावें गुरुराया ।

श्रीगुरु सांगती हांसोनियां । तया मूर्ख ब्राह्मणासी ॥ १८३ ॥


श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी । सांगेन तुज विस्तारेसीं ।

पुढें जन्म होय त्यासी । एकचित्तें परियेसा ॥ १८४ ॥


आम्हीं तया ब्रह्मयापाशीं । मागून घेतलें कारणेसीं ।

पुढील जन्मांत परियेसीं । वर्षे तीस संख्या ते ॥ १८५ ॥


भक्तजन रक्षावयासी । मागितलें आम्ही ब्रह्मयापाशीं ।

म्हणूनि सांगती विस्तारेसीं । तया विप्रवर्गापुढें ॥ १८६ ॥


तटस्थ झाले सकळही जन । साष्टांग करिती नमन ।

गेले आपुलाले स्थाना । ख्याति झाली चहूं राष्ट्रीं ॥ १८७ ॥


पतिव्रतेनें पतीसहित । स्नान केलें संगमांत ।

अंतःकरणीं संतोष बहुत । पूजा करिती भक्तिनें ॥ १८८ ॥


अपार द्रव्य वेंचून । करिती तेथें आराधन ।

सूर्य गेला अस्तमाना । आले श्रीगुरु मठासी ॥ १८९ ॥


स्त्रीपुरुष नमस्कार । करिताति वारंवार ।

पूजासामग्री उपचार । आरति करिती श्रीगुरुसी ॥ १९० ॥


सिद्ध म्हणे नामधारका । पुढें जाहलें अपूर्व ऐका ।

कथा असे अति विशेषा । सांगेन एकचित्तें ॥ १९१ ॥


म्हणोनि सरस्वती-गंगाधर । सांगे गुरुचरित्र विस्तार ।

ऐकतां होय मनोहर । सकळाभीष्ट पाविजे ॥ १९२ ॥

॥ इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ

श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे

मृतविप्रसंजीवनं नाम द्वात्रिंशोऽध्यायः ॥

श्री गुरु चरित्र के सभी अध्याय