GuruCharitra.in

Guru Charitra Adhyay 21 | गुरुचरित्र अध्याय इक्कीस

गुरुचरित्र अध्याय 21 में बताया गया है कि कैसे गुरु के ज्ञान से मुक्ति का मार्ग प्राप्त होता है। यह अध्याय हमें सिखाता है कि हमें गुरु के चरणों में समर्पण करना चाहिए और उनका ज्ञान प्राप्त करने का प्रयास करना चाहिए। गुरु का ज्ञान हमें मोक्ष प्राप्त करने में मदद करता है और हमें जीवन में सभी तरह के कष्टों से मुक्ति दिलाता है।

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥

सिद्ध म्हणे नामधारका । ब्रह्मचारी तो कारणिका ।

उपदेशिले ज्ञानविवेका । तया प्रेतजननीसी ॥ १ ॥

ब्रह्मचारी म्हणे नारी । मूढपणें दुःख न करी ।

कवण वाचला असे स्थीरी । या संसारी सांग मज ॥ २ ॥


उपजला कवण मेला कवण । उत्पत्ति जाहली कोठोन ।

जळांत उपजे जैसा फेण । बुदबुद राहे कोठे स्थिर ॥ ३ ॥


तैसा देह पंचभूतीं । मिळोनि होय देहनिर्मिती ।

वेगळे होतांचि पंचभूती । अव्यक्त होय देह जाणा ॥ ४ ॥


तया पंचभूतांचे गुण । मायापाशें वेष्टोन ।

भ्रांति लाविती देह म्हणोन । पुत्रमित्रकलत्रवास ॥ ५ ॥


रज-सत्त्व-तमोगुण । तया भूतांपासोन ।

वेगळाले लक्षण । होती ऐक एकचित्तें ॥ ६ ॥


देवत्व होय सत्त्वगुण । रजोगुण मनुष्य जाण ।

दैत्यांसी तमोगुण । गुणानुबंधे कर्में घडती ॥ ७ ॥


ज्याणे जें कर्म आचरती । सुकृत अथवा दुष्कृति ।

तैसी होय फळप्राप्ति । आपुली आपण भोगावी ॥ ८ ॥


जैसी गुणांची वासना । इंद्रियें तयाधिन जाणा ।

मायापाशें वेष्टोन । सुखदुःखा लिप्त करिती ॥ ९ ॥


या संसारवर्तमानीं । उपजती जंतु कर्मानुगुणीं ।

आपुल्या आर्जवापासोनि । सुखदुःख भोगिताति ॥ १० ॥


कल्पकोटी वरुषें जयांसी । असती आयुष्यें देवऋषीं ।

त्यांसी न सुटे कर्मवशी । मनुष्या कवण पाड सांगे ॥ ११ ॥


एखादा नर देहाधीन । काळ करी आपुले गुण ।

कर्म होय अनेक गुण । देहधारी सर्व येणेंपरी ॥ १२ ॥


जो असेल देहधारी । त्यासी विकार नानापरी ।

स्थिर नव्हे निर्धारी । आपुले आपण म्हणावया ॥ १३ ॥


याकारणें ज्ञानवंते । संतोष न करावा उपजतां ।

अथवा नर मृत होता । दुःख आपण करुं नये ॥ १४ ॥


जघीं गर्भसंभव होतां । काय दिसे आकारता ।

अव्यक्त असतां दिसे व्यक्ता । सवेंचि होय अव्यक्त पैं ॥ १५ ॥


बुदबुद दिसती जैसे जळीं । सवेंचि नासती तात्काळी ।

तैसा देह सर्वकाळी । स्थिर नव्हे परियेसा ॥ १६ ॥


जघीं गर्भउद्भव झाला । नाश्य म्हणोनि जाणती सकळा ।

कर्मानुबंधने जैसे फळ । तैसा भोग देहासी ॥ १७ ॥


कोणी मरती पूर्ववयसीं । अथवा मरती वृद्धाप्येसी ।

आपुले आर्जव असे जैशी । तेणेपरी घडे जाण ॥ १८ ॥


मायापाशें वेष्टोनि । म्हणती पिता सुत जननी ।

कलत्र मित्र तेणे गुणी । आपुले आपुले म्हणती मूढ ॥ १९ ॥


निर्मळ देह म्हणो जरी । उत्पत्ति रक्त-मांस-रुधिरीं ।

मळमूत्रांत अघोरी । ऊद्भव झाला परियेसा ॥ २० ॥


कर्मानुवशे उपजतांचि । ललाटी लिहितो विरंचि ।

सुकृत अथवा दुष्कृतेंचि । भोग भोगी म्हणोनि ॥ २१ ॥


ऐसें या कर्म काळासी । जिकिलें नाही कोणी परियेसी ।

याकारणे देहासी । नित्यत्व नाही परियेसा ॥ २२ ॥


स्वप्नीं निधान दिसे जैसे । कवणे करावें भरंवसे ।

इंद्रजाल गारुड जैसे । स्थिर केवीं मानिजे ॥ २३ ॥


तुझे तूंचि सांग वहिले । कोटी जन्म भोग भोगिले ।

मनुष्य अथवा पशुत्व लाधले । पक्षी अथवा कृमिरुप ॥ २४ ॥


जरी होतीस मनुष्ययोनीं । कोण कोणाची होतीस जननी ।

कोण कोणाची होतीस गृहिणी । सांग तुवां आम्हांपुढे ॥ २५ ॥


कवण तुझीं मातापिता । जन्मांतरींची सांग आतां ।

वायां दुःख करिसी प्रलापिता । पुत्र आपुला म्हणोनि ॥ २६ ॥


पंचभूतात्मक देह । चर्म-मांस-अस्थि-मेद ।

वेष्टोनियां नवम देह । मळबद्ध शरीर जाणावें ॥ २७ ॥


कैचा पुत्र कोठे मृत्यु । वायां कां भ्रमोनि रडसी तूं ।

सांडोनि द्यावे कैचे प्रेत । संस्कारिती लौकिकार्थी ॥ २८ ॥


येणेपरी ब्रह्मचारी । सांगे त्वरित विस्तारीं ।

परिसोनि त्या अवसरीं । विनवीतसे तयासी ॥ २९ ॥


विप्रवनिता तया वेळीं । विनवीतसे करुणाबहाळी ।

स्वामी निरोपिलें धर्म सकळी । परी स्थिर नव्हे अंतःकरण ॥ ३० ॥


प्रारब्ध प्रमाण म्हणो जरी । तरी कां भजावा श्रीहरि ।

परीस-संपर्के लोह जरी । सुवर्ण नव्हे कोण बोले ॥ ३१ ॥


आम्ही पहिलेचि दैवहीन । म्हणोनि धरिले श्रीगुरुचरण ।

अभय दिधले नाही मरण । म्हणोनि विश्र्वास केला आम्हीं ॥ ३२ ॥


एखाद्या नरा येतांचि ज्वरा । धांवत जाती वैद्याचिया घरा ।

औषधी देऊनियां प्रतिकारा । सवेंचि करी आरोग्यता ॥ ३३ ॥


एके समयी मनुष्यासी । आश्रय करिती करुणेसी ।

साह्य होय भरंवसी । आला आपदा परिहारी ॥ ३४ ॥


त्रयमूर्तीचा अवतारु । श्रीनरसिंहसरस्वती असे गुरु ।

तेणें दिधला असे वरु । केवीं असत्य होय सांग मज ॥ ३५ ॥


आराधिले मी तयासी । वर दिधला गा आम्हांसी ।

त्याचा करुनियां भरंवसी । होतों आपण स्वस्थचित्त ॥ ३६ ॥


विश्र्वासोनि असतां आपण । केवीं केले निर्वाण ।

कैसे माझे मूर्खपण । म्हणोनि स्वामी निरोपिसी ॥ ३७ ॥


याकारणे आपण आतां । प्राण त्यजीन सर्वथा ।

समर्पीन गुरुनाथा । वाढो कीर्ति तयाची ॥ ३८ ॥


ऐकोनि तियेचे वचन । ओळखुनियां भाव मन ।

सांगे बुद्धि तिसी ज्ञान । उपाय एक करी आतां ॥ ३९ ॥


विश्र्वास केला त्वां श्रीगुरुसी । पुत्र लाधला पूर्णायुषी ।

जरी आला मृत्यु त्यासी । घेऊनि जाई श्रीगुरुस्थाना ॥ ४० ॥


जेथे जाहला असेल तुज वर । तेथें समर्पी तूं कलेवर ।

पंचगंगाकृष्णातीर । औदुंबरवृक्षातळी ॥ ४१ ॥

ऐसे वचन ऐकोनि । विश्र्वास जाहला तिचे मनीं ।

पोटीं शव बांधोनि । घेऊनि गेली औदुंबराप्रति ॥ ४२ ॥


जेथे होत्या गुरुपादुका । आफळी शिर ते बालिका ।

रुधिरें भरल्या पादुका । आक्रोश करी ते नारी ॥ ४३ ॥


सकळ दुःखाहुनी अधिक । साहवेना पुत्रशोक ।

क्षयरोग तोचि ऐक । मातापित्या मृत्युमूळ ॥ ४४ ॥


ऐसे करितां जाहली निशी । विप्र मागती प्रेतासी ।

म्हणती आक्रोश कां वो करिसी । संस्कारुनि जाऊं आतां ॥ ४५ ॥


मनुष्य नाही अरण्यांत । केवीं राहूं जाऊं म्हणत ।

जाळूं दे आतां प्रेत । ऐक कर्कशे म्हणताति ॥ ४६ ॥


कांहीं केलिया नेदी प्रेत । आपणासवे जाळा म्हणत ।

पोटी बांधोनियां प्रेत । लोळतसे पादुकांवरी ॥ ४७ ॥


म्हणती विप्र ज्ञाती लोक । राहूं नये रानीं निःशंक ।

तस्करबाधा होईल ऐका । जाऊं आता घरासी ॥ ४८ ॥


जाऊं आतां स्नान करुनि । उपवास हो कां आजिचे दिनीं ।

प्रातःकाळी येऊनि । दहन करुं म्हणती ऐका ॥ ४९ ॥


आजिचे रात्री प्रेतासी । सुटेल वास दुर्गंधीसी ।

आपोआप दहनासी । देईल जाणा ते कर्कशा ॥ ५० ॥


म्हणोनि निघती सकळ लोक । राहिलीं तेथे जननीजनक ।

प्रेतासहित करिती शोक । होती रात्री परियेसा ॥ ५१ ॥


निद्रा नाहीं दिवस दोन्ही । शोक करितां जनकजननी ।

याम तीन होतां रजनी । झोंप आली तियेसी ॥ ५२ ॥


देखतसे सुषुप्तींत । जटाधारी भस्मांकित ।

व्याघ्रचर्म परिधानित । रुद्राक्षमाळा सर्वांगीं ॥ ५३ ॥


योगदंड त्रिशूळ हातीं । आला औदुंबराप्रती ।

कां वो शोक करिसी सती । आक्रोशोनि आम्हांवरी ॥ ५४ ॥


काय जाहलें तुझे कुमरा । आतां त्यासी करुं प्रतिकारा ।

म्हणोनि दे तो अभय करा । भक्तवत्सल श्रीगुरु ॥ ५५ ॥


भस्म काढोनि प्रेतासी । लावीतसे सर्वांगेसी ।

मुख पसरी म्हणे तिसी । वायु पुरस्करुं म्हणे ॥ ५६ ॥


प्राण म्हणजे वायु जाण । बाहेर गेला विसरुन ।

घालितों मागुतीं आणून । पुत्र तुझा सजीव होय ॥ ५७ ॥


इतुकें होतांचि भयचकित । जाहली नारी जागृत ।

म्हणे आपणा कैसी भ्रांत । लागली असे प्रेतावरी ॥ ५८ ॥


जे कां वसे आपुले मनीं । तैसे दिसे निद्रास्वप्नी ।

कैचा देव नरसिंहमुनि । भ्रांति आपणा लागली असे ॥ ५९ ॥


आमुचे प्रारब्ध असतां उणें । देवावरी बोल काय ठेवणे ।

अज्ञान आम्ही मूर्खपणें । श्रीगुरुवरी काय बोल ॥ ६० ॥


येणेंपरी चिंता करीत । तंव प्रेतासी झालें चेत ।

सर्वांगीं उष्ण बहुत । सर्वसंधींसी जीव आला ॥ ६१ ॥


म्हणे प्रेतासी काय झाले । किंवा भूत संचरलें ।

मनीं भय उपजलें । ठेवी काढूनि दूर परतें ॥ ६२ ॥


सर्व संधी जीव भरला । बाळ उठोनि बैसला ।

म्हणे क्षुधा लागली मला । अन्न देईं म्हणतसे ॥ ६३ ॥


रुदन करी तया वेळीं । आला कुमर मातेजवळी ।

स्तन घालितां मुखकमळीं । क्षीर निघे बत्तीस धारा ॥ ६४ ॥


संतोष भय दोनी प्रीतीसी । संदेह मागुती असे मानसीं ।

कडिये घेऊनि बाळकासी । गेली आपुले पतीजवळी ॥ ६५ ॥


जागृत करुनि पतीसी । सांगे वृतांत आद्यंतेसी ।

पति म्हणे तियेसी । चरित्र असे श्रीगुरुचें ॥ ६६ ॥


म्हणोनि दंपती दोघेजण । करुनि औदुंबरा प्रदक्षिणा ।

साष्टांगी करिती नमन । स्तोत्र करिती नानापरी ॥ ६७ ॥


जय जया वरदमूर्ति । ब्रह्मा-विष्णु-शिव यति ।

भक्तवत्सला तुझी ख्याति । वास पहासी भक्तांच्या ॥ ६८ ॥


तूं तारक विश्र्वासी । म्हणोनि भूमीं अवतरलासी ।

अशक्य तुज वर्णावयासी । क्षमा करणें स्वामिया ॥ ६९ ॥


कोपेंकरुनि मातेसी । निष्ठुर बोले बाळ कैसी ।

तैसे अविद्यामायेसीं । तुम्हां वोखटें बोलिलों ॥ ७० ॥


सर्वस्व आम्हां क्षमा करणें । म्हणोनि घालिती लोटांगणे ।

विनवूनियां करुणावचनें । गेली स्नाना गंगेंत ॥ ७१ ॥


स्नान करुनि बाळकासहित । धुती झाली पादुकांचे रक्त ।

औदुंबरा स्नपन करीत । लाविती दीप तये वेळी ॥ ७२ ॥


पूजा करिती भक्तीसीं । मंत्रपूर्वक विधीसीं ।

शमीपत्र-कुसुमेंसी । पूजा करिती परियेसा ॥ ७३ ॥


नीरांजन तया वेळी । करिती गायन परिबळी ।

अतिसंतोष तये बाळीं । भक्तिभावें स्तुति करिती ॥ ७४ ॥


इतुकें होतां गेली निशी । उदय जाहला दिनकरासी ।

संस्कारुं म्हणोनि प्रेतासी । आले विप्रज्ञाती सकळ ॥ ७५ ॥


तंव देखतांचि कुमारासी । विस्मय जाहला सकळिकांसी ।

समाराधना करिती हर्षी । महानंद प्रवर्तला ॥ ७६ ॥


ऐसा श्रीगुरुस्थानमहिमा । अखिल लोक लाधले कामा ।

एकेकाची सांगतां सीमा । विस्तार होईल बहु कथा ॥ ७७ ॥


सिद्ध म्हणे नामधारका । स्थानमहिमा ऐसा ऐका ।

अपार असे सांगतां आणिका । साधारण तुज निरोपिले ॥ ७८ ॥


तया औदुंबरातळीं । श्रीगुरुवास सर्वकाळीं ।

काम्य होत तात्काळीं । आराधितां श्रीगुरुसी ॥ ७९ ॥


पुत्रापत्य वांझेसी । श्रियायुक्त दरिद्रियासी ।

आरोग्य होय रोगियासी । अपमृत्यु कधीं नोहे जाणा ॥ ८० ॥


भाव असावा आपुले मनीं । पूजा करावी श्रीगुरुचरणीं ।

जे जे वासना ज्याचे मनीं । त्वरित होय परियेसा ॥ ८१ ॥


कुष्ठी असेल अंगहीन । त्यानें अर्चावे गुरुचरण ।

सुवर्ण होय अंग जाण । संशय मनीं न धरावा ॥ ८२ ॥


हृदयशूळ गंडमाळा । अपस्मारादि रोग सकळा ।

परिहरती तात्काळा । श्रीगुरुपादुका अर्चिता ॥ ८३ ॥


जो का असेल मंदमति । बधिर मुका पांगूळ रक्ती ।

औदुंबरी सेवा करिती । सुदेह होय सत्य माना ॥ ८४ ॥


चतुर्विध पुरुषार्थ । तेथे होय निश्र्चित ।

प्रत्यक्ष असे श्रीगुरुनाथ । औदुंबरी सनातन ॥ ८५ ॥


जया नाम कल्पतरु । प्रत्यक्ष जाणा औदुंबरु ।

जें जें मनीं इच्छिती नरु । साध्य होय परियेसा ॥ ८६ ॥


किती वर्णू तेथील महिमा । सांगतां असे अशक्य आम्हां ।

श्रीगुरु ‘ नृसिंहसरस्वती ‘ नामा । प्रख्यात असे परियेसा ॥ ८७ ॥


गंगाधराचा नंदन । सांगे गुरुचरित्र कामधेनु ।

भक्तिपूर्वक ऐकती जन । सकलाभीष्टें पावती ॥ ८८ ॥


म्हणोनि सरस्वतीगंगाधरु । सदा ध्यातसे श्रीगुरु ।

उतरावया पैलपारु । इहसौख्य परागति ॥ ८९ ॥

॥ इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ

श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे

मृतपुत्रसंजीवनं नाम एकविंशोऽध्यायः ॥

श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥

श्री गुरु चरित्र के सभी अध्याय